आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगमयी दीपावली (अर्धे आकाश)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांगोळी एरवीही अनेक दारांसमोर सजलेली असते, अगदी मुंबईपुण्यातल्या फ्लॅटसमोरसुद्धा असते. देव्हाऱ्यात असतेच बहुधा. ओवाळताना पाटाखाली काढलीजाते. उंबरठ्यांवरही असते. केळवण, वाढदिवस आदि प्रसंगी उत्सवमूर्तीच्या पानाभोवती, पंगतीभोवतीही असते. परंतु, दिवाळीतली रांगोळी वेगळीच. एरवी रांगोळी वगैरे मला नाही जमत, वेळ कुठेय, असं म्हणणारे लोकही - मुद्दामच स्त्रिया म्हणत नाहीये कारण अनेक पुरुषांनाही ही कला अवगत आहे -
दिवाळीत आवर्जून रांगोळी काढतातच. भले ती छोटीशी असेल, ठिपक्यांची असेल, पुस्तकात पाहून असेल, त्यात कलाकुसर नसेल. पण दाराभोवतीची जागा दिवाळीत रिकामी नसते.
म्हणूनच आजच्या या मधुरिमाच्या रांगोळी विशेष अंकाचं प्रयोजन. तो पाहून, वाचून दिवाळीत नवनवीन प्रयोग करायला भरपूर वाव आहे सगळ्यांना. कायआहे या अंकाचं वैशिष्ट्य? या रांगोळीच्या प्रसन्नतेचा, संस्कृतीचा इतिहास, तिची व्याप्ती, तिच्यात झालेले बदल, आजचे स्वरूप हे जाणून घेण्याचा प्रयत्नआम्ही केलाय. सोबतच आहेत तिच्या विकासवाटेतील महत्त्वाच्या टप्प्यांवरील याच कलेसाठी वयाची अनेक वर्षे अर्पण केलेल्या कलावंतांनी लिहिलेले टिपण, संस्कारभारतीची रांगोळी, रांगोळीवर पीएचडी करण्याचा पहिला मान पटकावणाऱ्या लेखिकेचे विशेष अनुभव, रांगोळी कलाकारांनी गजबजलेल्या मुंबईजवळच्या एका छोट्या गावाचा थक्क करणारा अनुभव, रांगोळीसाठी वेळ नाही असं म्हणणाऱ्या आजच्या पिढीसाठी काही सोप्या ट्रिक्स. आवडीने वाचता
येईल, रांगोळी काढण्यासाठी चटकन् हातात घेता येईल आणि जपून ठेवावासा वाटेल असा हा अंक. खास तुमच्यासाठी.

चला तर मग, रांगोळी आहे ना घरात भरपूर ते शोधा. रंग आणा नवीन विकत हवं तर. ठिपक्यांचा कागद आहे का मागच्या वर्षीचा की, आणायचाय? नाहीतर घरीच करा, लहानपणी उदबत्ती नि फूटपट्टी घेऊन करायचो तसा. पुस्तकंही शोधून ठेवा, अजून आहेत दोनतीन दिवस. रांगोळीने येणाऱ्या पाहुण्यांचं मन दारातच जिंकून घ्या.
ही दिवाळी तुम्हाआम्हा सगळ्यांना रंगमय, गंधमय, रसमय, सुखमय जावो.
शुभ दीपावली.
mrinmayee.r@dbcorp.in
मधुरिमा रांगोली विशेष संकल्पना : मंजिरी काळवीट
मांडणी व सजावट : महेंद्र वर्मा
फोटो : माजिद खान
बातम्या आणखी आहेत...