आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या रुचकर शुभेच्छा! (अर्धे आकाश)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवस लहान झालाय, हवेत काहीसा गारवा येऊ लागलाय पहाटेचा. दिवाळी दोनतीन दिवसांवर आलीय म्हणताना घरोघरी चिवडा, लाडू, चकल्या, करंज्या, अनारसे, शेव करायची तयारी सुरू आहे, काहींचा फराळ तर डब्यात गेलायसुद्धा. साफसफाई झालीय बहुतेक घरची. कंदील नवा घ्यायचाय का, दिव्यांची माळ लागतेय का गेल्या वर्षीची, की दुरुस्त करायला हवीय? रांगोळी, रंग आहेत का भरपूर? पणत्या शोधून ठेवायच्यात, वाती वळायच्यात. एक ना दोन, अनेक प्रश्न.

दिवाळी हा सण कुटुंबाने एकत्र साजरा करण्याचा, homecoming festivel. जशी ईद, जसा नाताळ. त्यामुळे घरोघरी नेहमीचे सदस्य वगळता पाहुणे असतात या दिवसांत. म्हणून मग बाकीची सगळी तयारी झाली की विचार येतो जेवणाचा. सगळेजण दोनतीन दिवस घरी असतात, जेवायला काहीतरी वेगळं करावंसं वाटतं. भाऊबीजेला अनेक घरी भावंडं एकत्र येतात. त्या दिवसापर्यंत फराळाचं खाऊन कंटाळा आलेला असतो. लाडू, करंजीचं नावही नको वाटतं. मग काय करायचं? काहीतरी वेगळं हवं. या वेगळंच उत्तर आजच्या मधुरिमाच्या या अंकात मिळेल. दिवाळी भारतभर साजरा केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने. त्या सणाशी निगडित पक्वान्नंही वेगळी. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन या पदार्थांची ओळख या अंकातून करून देतोय. पटकन करता येतील असे हे वेगळ्या चवीचे पदार्थ आहेत. सोपेही. दिवाळीतल्या दिवसांत वा एरवीही नक्की करून पाहण्याजोगे. त्यासोबत असलेल्या आपल्या मैत्रिणींच्या आठवणी त्या पाककृतींची लज्जत वाढवणाऱ्या आहेत.

खाणं हा आपल्या उत्सवांचा, समारंभांचा - लग्नापासून श्राद्धापर्यंतच्या - वैशिष्ट्यपूर्ण घटक. तसा तो जगभरच आहे म्हणा. परंतु, आपले सणच एवढे की पदार्थही तेवढेच. म्हणूनच सणात थोडं नावीन्य आणायला हा रुचकर मधुरिमाचा अंक.

भरपूर खा, खूप लोकांना भेटा, मनसोक्त गप्पा मारा, कामाच्या दिवसांसाठी शरीरात ऊर्जा भरून घ्या, असं सांगण्यासाठी खास.

शुभ दीपावली.

mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...