आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अमृता'चा वसा (अर्धे आकाश)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीला मुलाखतीसाठी भेटायला जाताना त्या व्यक्तीचं नाव, पद, कुटुंब यावरून आपले काही आडाखे बांधलेले असतात. अनेकदा ते खरे ठरतात, पण कधीकधी ते साफ चुकतातही. अमृता फडणवीसांना भेटलो गेल्याच शुक्रवारी, तेव्हा असेच आडाखे चुकले, पण त्याचा आनंदच वाटला. दोनतीन दिवसांपासून रोज तीन तासांहून कमी झोप, चार ते पाच तास अॅक्सिस बँकेच्या कर्मचा-यांसाठीच्या परिसंवादातला सक्रिय सहभाग, घरी ‘वर्षा’वर पाहुणे आल्याचा फोन, थोड्याच वेळात मुंबईच्या दुस-या टोकाला असलेली मीटिंग या पार्श्वभूमीवर त्या भेटल्या. सव्वातास आमच्याशी गप्पा मारताना त्या शांत, स्वस्थ होत्या. जो माणूस sorted असतो ना, ज्याच्या डोक्यात विचारांचा गुंता नाही, तोच असा स्वस्थचित्त असू शकतो. अमृता फडणवीस यांना नक्की ठाऊक आहे, त्यांना काय करायचंय, काय हवंय, कसं करायचंय ते. उत्तम नियोजन, जबाबदा-यांचं योग्य वाटप, दिलेल्या कामात झोकून देण्याची वृत्ती, स्वत:शीच स्पर्धा या त्यांच्या सकारात्मक बाबी या गप्पांमधून ठळकपणे जाणवल्या. त्यातून समोर आली एक संयत, संतुलित व्यक्ती.

अमृता नागपूरहून मुंबईला आल्या, त्याला तीन महिने झालेत. त्यांच्या मुलीला जशी तिच्या तिथल्या शाळेतल्या मैत्रिणींची आठवण येते, तशीच त्यांनाही येते. ‘नागपुरात असताना कधीही मैत्रिणी भेटायला यायच्या, मी त्यांच्याकडे जायचे, कधी आईकडे चक्कर मारायचे, कधी मुलीला तिच्याकडे सोडायचे, ते इथे काहीच नाही. हे शहर फार व्यावसायिक वृत्तीचं आहे. लोक येतात भेटायला, मिठाई वगैरे घेऊन; पण मिठाईच्या पुड्यासोबत असते कामाची चिठ्ठी,’ असं त्या म्हणतात तेव्हा आपलीच एखादी, नव-याच्या बदलीमुळे शहर बदलायला लागलेली, सर्वसामान्य मैत्रीण तिची व्यथा सांगतेय असं वाटतं. नवरा घरी म्हणजे ‘वर्षा’वर असला तरी अधिका-यांसोबतच असतो, कामात असतो, फोनवर नाहीतर लॅपटाॅपवर काम करत असतो, असं त्या सांगतात, पण त्यात तक्रारीचा सूर नसतो. ती वस्तुस्थिती आहे, याची स्पष्ट जाणीव त्यातून समोर येते.

अमृता अनेक वर्षांपासून गायनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत, रोज पंधरा मिनिटं तरी तानपुरा लावून सूर लावल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. मुंबईत आल्यावरही त्यांनी गाण्याची शिकवणी सुरू ठेवलीच आहे. एकटं असताना, गाडीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत त्यांची सोबत करतं. मुलींना जगू द्या, असा संदेश देणारं एक गाणंही एका स्वयंसेवी संस्थेसाठी त्यांनी नुकतंच ध्वनिमुद्रित केलंय.
असा हा ‘अमृता’चा साधेपणाचा, स्पष्ट विचारांचा, कामाच्या धडाक्याचा वसा. आपण सर्वांनीच घ्यावा असा. हो ना?
mrinmayee.r@dbcorp.in