आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खवय्यांची दिवाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अात्ताआत्तापर्यंत पाऊस पडत होता आणि अचानक दिवाळीच आली की पुढच्या आठवड्यात. एकीकडे मुलांच्या परीक्षाही सुरू आहेत. दुसरीकडे घराघरांतल्या मोठ्यांची दिवाळीसाठी लगबग चालू झालीय. घराची साफसफाई, खरेदी, फिरायला जायची तयारी, पाहुण्यांची सरबराई, रांगोळी नि रंग, कंदील, रोशणाई, इत्यादि इत्यादि. एक का गोष्ट असते त्यांच्यासमोर? या सगळ्याएवढाच किंबहुना थोडा अधिकच महत्त्वाचा असतो तो फराळ. चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, शेव, अनारसे, चिरोटे आदि पदार्थांचा घमघमाट आल्याशिवाय दिवाळीची खरी जाणीव होतच नाही. ठाऊक आहे, अजून फराळाला सुरुवात झाली नाहीये तुमच्याकडे, पण त्याचं नियोजन तर नक्कीच सुरू झालं असेल. आजचा अंक ही या नियोजनात आमची थोडी मदत समजा. म्हणजे वर उल्लेखलेले नेहमीचे यशस्वी कलाकार हवेतच दिवाळीत रंग भरण्यासाठी, पण त्यांच्यासोबत कोणी पाहुणे कलाकार असतील तर रंगत अधिक वाढेल म्हणून या अंकात देतोय फराळाच्या पदार्थांना एक ट्विस्ट, जरा वेगळी चव, थोडे वेगळे घटक, करायची जरा निराळी पद्धत. सोबतच्या छायाचित्रांमुळे ते तुम्हाला करावेसे वाटतील यात शंका वाटत नाही. या करण्यात घरातल्या सर्व सदस्यांना सहभागी करून घ्या. छोटी छोटी कामं, उदा. भाजलेले दाणे सोलणे, पोहे चाळणे, कढीपत्ता धुऊन देणे, इ. बच्चाकंपनीला द्या. पुरुषमंडळींकडे चकल्या/कडबोळी तळणे, लाडूचं मिश्रण फेटून देणे, चिवडा ढवळणे वगैरे कामं असतातच बहुतेक घरांमध्ये. पाक नीट झाला की नाही, कणीक सैल आहे की घट्ट, वगैरे पाहायची कामं घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडे सोपवा, त्यांचा अनुभव दांडगा. असं केलं म्हणजे नरक चतुर्दशीला पहिली अंघोळ झाल्यानंतर फराळ खाताना आपलाही हात या पदार्थांना लागला होता, अशी छान जाणीव सगळ्यांच्या मनात असेल. अंकातल्या पाककृती पाठवणाऱ्या बहुतेक सुगरणींनी ते पदार्थ मुद्दाम मधुरिमासाठी दिवाळीच्या आधीच करून मग त्यांच्या पाककृती पाठवल्या आहेत. त्यामुळे पदार्थ नीट होणारच याची खात्री बाळगा. ते करा आणि आम्हाला कळवा, कसे झालेत ते.
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...