आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी करणारी आई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई नोकरी करणारी असेल तर तिची मुलगी करिअरमध्ये यशस्वी होण्याची व चांगली नाती विकसित करण्याची शक्यता अधिक असते, असा निष्कर्ष काढून संशोधकांनी नोकरदार महिलांवर मोठेच उपकार केले आहेत, असं म्हणायला हवं. मुलगा असेल तर तो घरातल्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्यापैकी पार पडू शकतो, असंही हा निष्कर्ष सांगतो.

नोकरदार महिलांपैकी बहुतेकींमध्ये अपराधाची मोठी भावना असते की, आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. त्यांना आवश्यकता असते तेव्हा आपण त्यांच्यासोबत नसतो. ती आजारी असतानाही आपल्याला कामावर जावं लागतं, हा विचार त्यांचं मन कुरतडत असतो. अनेकदा घरचे लोकही काय पैशाच्या मागे लागून मुलांकडे दुर्लक्ष करतेय ही बाई, अशा नजरेने पाहत असतात. अशा बायांसाठी हा निष्कर्ष महत्त्वाचा आहे. त्यांच्या नोकरीचा घराला आर्थिक फायदाच होतो असं नाही, तर अप्रत्यक्षपणे त्यांची मुलंही स्वावलंबी व स्वतंत्र होण्यासाठी आईची घरातली काही ठरावीक तासांची अनुपस्थिती कारणीभूत ठरते. तिच्या अपराधगंडाला समाजही मोठ्या प्रमाणावर खतपाणी घालत असतो. खरं तर, तिला अपराधी वाटण्याची काहीच आवश्यकता नसते. ती काही मुलांना कायमचं सोडून गेलेली नसते वा घरच्या जबाबदाऱ्याही तिने नाकारलेल्या नसतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं काम तिला आवडत असतं. नोकरी सांभाळून ती घर, मुलं, कुटुंब, मैत्रिणी, नातलग, सणसमारंभ, आजारपणं, सगळ्यांचं आरोग्य, मनोरंजन, शेजारणी, गप्पा, स्वत:चा एखादा छंद, असं सगळं आनंदाने पार पाडत असते. नोकरीचा अपराधगंडच काय तो तिला या सगळ्याचा १०० टक्के आनंद घेण्यापासून दूर ठेवत असतो.

या नोकरदार महिला शिकलेल्या असतात, त्यांच्याकडे व्यवस्थापनाची किंवा इतर कौशल्यं असतात जी त्या उपयोगात आणत असतात. नोकरीच्या अपराधगंडातून जर त्या नोकरी सोडून बसल्या तर शिक्षण वाया घालवल्याबद्दल त्यांना अपराधी वाटत राहतं, असा सगळा गोंधळ आहे.

पण अपराधगंडाला मागे टाकायचं, नोकरी नि घर दोन्ही मस्त एंजाॅय करायचं, हाच या पिढीसाठी आवश्यक मंत्र आहे. पटतंय ना?

mrinmayee.r@dbcorp.in