आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धे आकाश : अंशू की गुंज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Not just a piece of cloth असं जिचं ब्रीदवाक्य आहे, त्या गूँज या संस्थेबद्दल मधुरिमाच्या मासिक पाळी विशेषांकात लिहिलं होतं. आज पुन्हा त्याबद्दल लिहायला निमित्त झालं गूँजचे संस्थापक अंशू गुप्ता यांना जाहीर झालेला मॅगसेसे पुरस्कार. त्यांच्या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे - केवळ कापडाचा तुकडा नाही. भारतातल्या ग्रामीण भागातल्या महिला मासिक पाळीचा स्राव शोषून घेण्यासाठी राख, गवत, कागदाचे बोळे इत्यादि अतिशय धोकादायक वस्तू वापरतात. सॅनिटरी नॅपकिन्स तर सोडाच, स्वच्छ सुती कापडही ज्यांना वापरता येत नाही, वापरल्यानंतर धुतलेलं कापड उन्हात वाळवायची जिथे सोय नाही, अशा अवस्थेत आयुष्यातला मोठा काळ भारतीय महिला काढतात. कसा काढत असतील, याची कल्पनाच अंगावर शहारा आणते.
अशा महिलांना मदत करण्यासाठी गूँजने स्वस्त, सहज धुता येतील असे सॅनिटरी नॅपकिन्स जुन्या कापडापासून तयार करायला सुरुवात केली. गूँज हे जुने कपडे लोकांकडून गोळा करते. ते स्वच्छ धुऊन ते निर्जंतुक करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्यापासून नॅपकिन्स तयार केले जातात. या नॅपकिन्सना मायपॅड्स असं छान नाव दिलंय त्यांनी. ते परवडणाऱ्या दरात विकले जातात. मुख्य म्हणजे ते जास्तीत जास्त ग्रामीण महिलांपर्यंत कसे पोचतील, या महिला इतर अनारोग्यकारक वस्तू न वापरता हे नॅपकिन्सच वापरतील, याचीही गूँज काळजी घेते.
गूँज अर्थात इतरही काम करते, त्यात आपत्तीग्रस्तांचं पुनर्वसन हा मुख्य मुद्दा असतो. रोटी, कपडा और मकान या माणसाच्या आवश्यक गरजा आहेत हे आपल्याला ठाऊक आहे. यातील कपडा या घटकावर गूँज प्रामुख्याने काम करते. जुने परंतु न फाटलेले, वापरण्याजोगे, कपडे गूँज गोळा करते, आणि त्यातील एक चिंधीही वाया जाऊ देत नाही. अगदी फाटकं काही आलंच असेल तर त्याच्या पिशव्या शिवल्या जातात, किंवा आणखी छोटं काही. पण कापड वाया जात नाही.
आपल्याला किती शिकण्यासारखं आहे ना अंशू गुप्ता आणि त्यांच्या गूँजकडून?
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...