आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श आणि वास्तव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्या ‘महिला दिन’ विशेषांकात ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’च्या निमित्ताने स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी आपण बोललो होतो. आजच्या अंकात याविषयीच्या संसदेत विचारार्थ असलेल्या विधेयकाच्या निमित्ताने पुन्हा तोच मुद्दा मांडतोय. सेक्सॉलॉजिस्ट डॉ. प्रभूंच्या अभ्यासाबद्दल व अनुभवाबद्दल आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळेच ते जे म्हणतात ते महत्त्वाचे आहे; आणि त्यावर बोलणे त्याहून महत्त्वाचे व अटळ आहे. आता लैंगिकता, लैंगिक वर्तन हा विषय न बोलण्याचा राहिलेला नाही. आपण पालक बोललोच नाही तर मुलांना त्याचं महत्त्व कळणारच नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. आदर्श आणि वास्तव यांतलं अंतर आपल्याला न झेपण्याइतकं वाढत चाललं आहे, पण म्हणून वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. मुलांनी आदर्श वर्तन करावं असं वाटत असेल तर वास्तवाचीही जाणीव त्यांना करून देणं आवश्यक आहे.


लैंगिक वर्तनातील संभाव्य धोक्यांबद्दल आपण कदाचित बोलतोही, विशेषत: मुलींशी. पण मुलगे मोठे होताना, वयात येताना त्यांच्याशीही बोलणं तितकंच आवश्यक आहे. मुलींना आपण लहानपणापासून सतत लग्न झाल्यावर असं वागशील का, अशा प्रकारची भीती घालत असतो. पण मुलाला मात्र कधीच याची जाणीव करून दिली जात नाही की तुझंही लग्न होणार आहे, ती जबाबदारी आहेच, पण एक सुखाचा प्रवासही आहे. त्यासाठी योग्य वर्तणूक काय आहे, वगैरे. म्हणूनच मधुरिमाचा एक विशेषांक ‘मुलगा वाढवताना’ या विषयावर करावा, असा विचार आहे. मात्र त्यासाठी आपल्या सर्वांकडून आपापली मते, अनुभव, विचार आमच्यापर्यंत पोचले पाहिजेत. आपला प्रतिसाद वा लेख (शब्दमर्यादा 700 शब्द) 10 एप्रिलपर्यंत आमच्याकडे पाठवा, फॅक्स, ई-मेल, टपालाद्वारे वा प्रत्यक्ष दैनिक दिव्य मराठीच्या तुमच्या जवळच्या कार्यालयांमध्ये येऊन. त्यातील योग्य साहित्याला प्रसिद्धी दिली जाईल. तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतोय. कारण त्यातून वाचकांसोबत आम्हालाही खूप शिकायला मिळणार आहे, याची जाणीव आहे.
.............................
महिला दिनाच्या निमित्ताने अनेक वाचकांनी आपले विचार मधुरिमाकडे पाठवले होते. ते सर्व प्रसिद्ध करणे जागेअभावी अशक्य आहे. मात्र, त्यातील निवडक विचार प्रसिद्ध करण्यास आम्हाला आनंद होत आहे...


तू खरी गृहमंत्री- तू सगळ्या घराची काळजी घेतेस, प्रत्येकाची गरज पुरवतेस. तू शिकलेली असूनही नोकरी न करता घर सांभाळत असतेस. तुझ्या मुलांना तू उत्तम प्रकारे वाढवतेस. आल्यागेल्याचा अगत्याने पाहुणचार करतेस. आजारपणात सर्वांची काळजी घेतेस. त्यामुळे तू घराचा कणा आहेस, कुठेही स्वत:ला कमकुवत समजू नकोस. तू घरात आहेस म्हणून मुलांचा अभ्यास नीट होतोय. नव-या ला मुलांच्या वा त्याच्या आईवडिलांच्या आजारपणातही शांतपणे ऑफिसला जाऊन काम करता येते. तू घरी आहेस म्हणून वास्तूला घर म्हणतात. येणा-या प्रत्येकाला तू हसत सामोरी जातेस त्यामुळे घराचे लॉजिंग-बोर्डिंग होत नाही. म्हणून तूच आहेस खरी गृहमंत्री, तुला सलाम.- रेवती दीक्षित, नाशिक

महिला दीनच- सध्याच्या एकविसाव्या आधुनिक शतकातही स्त्रीला गृहीत धरण्याची व तिचा उपभोग घेण्याचीच मानसिकता पुरुषांमध्ये दिसून येते. तिने अर्थार्जनाचा भार उचलला आहे; परंतु मनाचे, निर्णयाचे, शरीराचे स्वातंत्र्य तिच्याकडे अजूनही नाही. तिला आत्मभान आले असले तरी खरी गरज पुरुषाला ते येण्याची आहे. स्त्री एकाच वेळी अनेक मार्गांनी व अनेक विषयांचा विचार करू शकते. पुरुष एका वेळी एकाच मुद्द्याचा विचार करू शकतो. स्त्रिया एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढतात.परंतु तरीही तिला दुर्बल म्हणून हिणवले जाते. आता पुरुषांनी प्रगत, सुशिक्षित, सुसंस्कृत होण्याची गरज आहे, अन्यथा महिला कायम दीनच राहतील.- सुजाता हिंगे, नाशिक

प्रौढ स्त्रियांची कुचंबणा- आज पंचावन्न ते साठ वयोगटात असलेल्या महिला विचित्र अवस्थेत आहेत. आम्ही फक्त चूल व मूल यांत रमत नाही व फक्त करिअरवर डोळा ठेवून घराकडे दुर्लक्ष करू शकत नाही. एक पाय तळ्यात तर एक मळ्यात अशी आमची अवघड अवस्था आहे. आम्ही शिकलेल्या आहोत पण आमच्यात आत्मविश्वास नाही. जुन्याशी जुळवून घेण्यात आमचे आयुष्य गेले नि आता तरुण पिढीशी आम्हाला जुळवून घ्यावे लागते. आमच्या सुना/मुली नोक-या करतात, त्या आमच्यावर फार जास्त अवलंबून असतात किंवा दुस-या गावी असतात. मग सणवार, पाहुणेरावळे, परंपरा एकटीच्या जिवावर करायला झेपत नाही आणि सोडवतही नाही. आमचे आयुष्य आम्हाला उरलेलेच नाही. मुली/सुना स्वतंत्र असतात, पण आम्हीही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहोत याचा त्यांना विसर पडतो. प्रत्येक वेळी आम्हालाच तडजोड करावी लागते. आमची फार कुचंबणा होते आहे. स्वातंत्र्याचे जे बीज आम्ही मुलींमध्ये रुजवले त्याला आता फळे आली आहेत. त्या फळांवर आमचाही अधिकार आहे, हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.- अनुराधा सुभेदार, औरंगाबाद

मदतनीस महिलांची आठवण ठेवा- माझ्याकडे घरकामाला येणा-या बाईला महिला दिनाविषयी सांगितल्यावर मला एकदम वाटले की तिच्या वस्तीत जाऊन दरवर्षी या दिवशी असे काम करणा-या एखाद्या बाईचा सत्कार केला पाहिजे. तिला तो बहुमान वाटेल. खेरीज इतर महिलादेखील त्यातून प्रेरणा घेतील. जिचा सत्कार होईल तिच्या घरातलेही तिच्याकडे कौतुकाने पाहू लागतील, तिचा मान ठेवतील. या सगळ्या जणी खूप कष्ट करून मुलांना शिकवत आहेत, चांगली पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर दु:खाचे डोंगर कोसळले तरी त्या हिंमत हरत नाहीत. अशांमध्ये आपण महिला दिनाच्या निमित्ताने जागृती घडवून आणून त्यांचं आयुष्य काहीसं सुकर करू शकतो.- अदिती वाघमारे, नाशिक

स्वसंरक्षण अत्यावश्यक- महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला एकच सांगणं आहे. स्वत:च्या संरक्षणासाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याचा हा काळ नाही. त्यामुळे स्वत:चं रक्षण स्वत:च करायला शिका. मात्र त्याचवेळी आपल्या मोकळेपणाच्या वागण्यामुळे समोरचा मोकाट तर सुटत नाही ना, याचा विचार करा. गावातील स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणा-या पाटलाचे हात कलम करणा-या शिवाजी महाराजांचा काळ आता नाही, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे इतर महिलांवर ओढवलेल्या प्रसंगांतून हे शिकलंच पाहिजे की आपणच आपल्याला जपण्याचं कौशल्य प्राप्त केलं पाहिजे.- मधुवंती यार्दी, नाशिक

स्त्रियांच्या आरक्षणावर अजूनही खल सुरू आहे. पण ‘33 टक्के आरक्षणावर विचार आहे सुरू, घरामध्ये मात्र पतिदेवा, सांगा काय सेवा करू?’ हीच आजची परिस्थिती आहे. ती बाहेर कितीही कर्तबगार असू दे, कोणत्याही क्षेत्रात काम करू दे, घरी मात्र पतीचीच सत्ता चालते. घरातले निर्णय तोच घेतो, साडी घ्यायची असो की तिला दोन दिवस माहेरी जायचे असो. अगदी रोजची भाजीही नव-या च्याच आवडीची असते. मग तिला बरोबरीचं स्थान आहे, असं कसं म्हणू शकतो आपण? म्हणूनच 33 टक्के आरक्षणाऐवजी घराघरातलं पत्नीपद मानाने दिलं तर ते खरं स्त्रीस्वातंत्र्य असं मला वाटतं.- अर्चना दंडे, नाशिक

शिकलेली आई, घर पुढे नेई- महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना सांगावेसे वाटते की मुलींना आनंदाने जन्म द्यावा. त्यांच्यावर उत्तम संस्कार करून त्यांना वाढवावे. मुलीला शिकवावे, विवाहाची घाई करू नये. हुंडा देऊ वा घेऊ नये. आज महिलांची मजल चुलीपासून अंतराळापर्यंत गेली आहे. धुळीवर अक्षरे गिरवण्यापासून संगणकापर्यंत, डोक्यावर भाकरी घेऊन नव-या कडे शेतात जाण्यापासून विविध क्रीडाक्षेत्रांपर्यंत तिने उडी घेतली आहे. देशाचा कारभारही ती तितक्याच समर्थपणे सांभाळते आहे. परंतु या सा-या त तिला तिच्या पतीची साथ फारशी लाभलेली दिसत नाही. ते होईल तो खरा सुदिन व आपण ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी’ऐवजी म्हणू शकू, ‘स्त्री जन्माची गौरवगाथा.’- शोभा वळसंगकर, बीड

महागाईशी सामना कठीण- महागाईच्या भस्मासुराच्या तोंडी बळी जातोय तो गृहिणीचा. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे खर्चाचा ताळमेळ जमवताना आमची तारांबळ उडतेय. महिन्याचा खर्च वाढतच चालला आहे. नव-या चा पगार हे आमचे बजेट. पण महागाईमुळे त्या बजेटमध्ये खर्च बसवणे अवघडच नव्हे तर अशक्य होऊन बसले आहे. कोणाला पाहुणे म्हणून या असेही म्हणावेसे वाटत नाही. काटकसर करावी लागत असल्यामुळे गृहिणीच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आहे. - सुनीता सुरडकर, उंडणगाव

भावना दाटल्या- ‘बायकांनी काय हुक्का ओढावा?’ आवडला. मनात भावनांच्या असंख्य छटा दाटून आल्या. अशा प्रकारचे लेखन मराठीत क्वचितच होते. इकडे झिम्बाब्वेमध्ये बसून लिहिताना कदाचित हे धाडसी विधान असेल. पण माझ्या वाचण्यात मराठी वृत्तपत्रसृष्टीत असा प्रयोग कधीच आला नव्हता. मुंबई विद्यापीठात माझे शिक्षण झाले आहे. त्यामुळे मराठीशी खूपच जवळीक आहे.- रेखा सिंह, झिम्बाब्वे

अंगावर शहारा आला- गिरीश अवघडे यांचा मधुरिमा महिला दिन विशेषांकातील लेख वाचला. शहरी आणि ग्रामीण महिलांमधील प्रचंड तफावतीबद्दल जाणून होतो. मात्र हेमराजच्या पत्नीबद्दल वाचून मन सुन्न झाले. लेख वाचून मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. ग्रामीण भागातले हे वास्तव वाचून अंगावर शहारा आला. खरंच काय होणार हेमराजच्या पत्नीच्या पुढील आयुष्याचे? संसाराच्या रथाचे एक चाक तर निखळून पडलेले आणि समोर कमी वयातील वैधव्य उभे आहे तिच्या. साताजन्माची सोबत एका क्षणात सुटली तिची. आणि हे सर्व कमी म्हणून समाजाच्या नजरा. असे एक ना असंख्य प्रश्न जणू विस्तवाचे निखारेच...- चित्रा गोरखा