आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता शिक्षणाची : अपडेट शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपडेट शिक्षण
सालोसाल पेरलं
आणि मातीतच जिरलं
पाटीवर पेरलं तर फुलं येतात
पुस्तकं नोटांची झाडं होतात
गुरुजी सांगत होते
तेव्हा बापानं मला शाळंत घातलं
शिप्यांनं बेतावं कापड
तसं मी स्वप्न बेतून घेतलं
परीक्षांचे 18 हंगाम चांगले फळाफुलाला आले
डिग््रयांच्या डोळ्यांत स्वप्न
लाल गुलाबी झालं
मी म्हणालो
‘आता मी एम.ए. बीएड झालो आहे’
अक्षरांचे ठेकेदार म्हणाले
‘आऊट डेटेड आहे. अपडेट हो’
परवा पेरायला जाताना
पोरगं म्हणालं
संगणक नाही तर शिकून उपयोग नाही
मी म्हणालो ‘खरे आहे पोरा माणसं खोटं बोलतात
काळ खोटं बोलत नाही
जागा बदलतं गुप्तधन तसचं झालं शिक्षण
या संगणकाच्या काचेला
पावसाचा वास नाही
इथला हंगाम बारमाही
वाफसा सुद्धा लागत नाही
वर चामड्याची मूठ सुटते
आणि खाली काकरीला कणीस फुटते
तू हाताचा की बोर्ड
मेंदूचा स्क्रीन कर
हुंगून हुलकावणी देतं सुख
पासवर्ड देऊन सेव्ह कर
तसं हृदयाचं सॉफ्टवेअर
थोडं थोडं डेव्हलप कर
आभाळाच्या पाटीवर
तू चांदण्याचं पीकं घे
पण भूक लागल्यावर भाकरीसाठी
गावाकडल्या घरी ये
(कवी सुरेश शिंदे हे मंगळवेढा येथील महाविद्यालयात प्राध्यापक व प्रसिद्ध कवी आहेत)

शिक्षणावर आजपर्यंत लिहिलेल्या अनेक कवितांपैकी ही एक वेगळीच कविता आहे. या कवितेचा विषय शिक्षणाच्या वेगाविषयी आहेच पण त्याचबरोबर तो वेग कितीही वाढला तरीही तंत्रज्ञानाबरोबरच हृदयाची म्हणजे प्रेमाची गरजही अधोरेखित केलेली आहे. अस्सल गावरान शेतीचे रूपक वापरल्याने कवितेला अस्सल मातीचा सुगंध आहे.

पूर्वी सर्वात वरचे शिक्षण म्हणजे कॉलेजचे शिक्षण होते. कॉलेज शिकला म्हणजे त्याला अद्ययावत सर्व ज्ञान मिळाले असे समजले जाई. पण आता कशाला अद्ययावत ज्ञान म्हणायचे हेच कळेनासे झाले आहे. कोणतेही ज्ञान घ्यावे तर अजून अपडेट हो, असे म्हटले जाते. जसे कोणताही भारीतला मोबाइल घ्यावा तो आपल्याला जुनाट वाटावा असे नवे नवे मॉडेल येतच असतात, अगदी तसेच आज शिक्षणाचे झाले आहे. कुणीच नीट सांगत नाही की अपडेट अभ्यासक्रम नेमका कशाला म्हणायचा... अशा अपडेट होण्याच्या पिढीची कानउघाडणी करणारी ही कविता आहे. या पिढीला फक्त कौशल्ये शिकून घेण्यातच अपडेट व्हायचे आहे. पण मानवी मूल्ये, प्रेम यात त्यांना अपडेट मात्र व्हायचे नाही. त्यांना फक्त बुद्धी धारदार करायची आहे. भावना, मन मात्र तसलेच ठेवायचे आहे. या पिढीवर चिडणारी ही कविता आहे. त्यांना कवी त्यांच्याच तंत्रज्ञानाचे रूपक घेऊन शिक्षणापेक्षाही प्रेममय माणुसकीने जगण्याचे महत्त्व सांगतो.

पुन्हा ही कविता करिअर करणार्‍या पिढीलाही मातीचे महत्त्व सांगते. आज असे होते आहे की, जितके जास्त शिकावे तितके घरापासून गावापासून दूर जावे लागते. ही मूळ उखडलेली पिढी हीच समस्या आहे. ही त्रिशंकू पिढी हीच आजच्या नवमध्यमवर्गीयांची ओळख आहे. गावापासून तुटलेला आणि शहरी जीवनाचा एकरूप होऊन भाग होऊ न शकलेला हा नवमध्यमवर्ग आज अधांतरी आहे. आज पैसा मिळविणारा परंतु भावना परिपोष न होणारा हा वर्ग. या वर्गाला कवी सांगतो की, जेव्हा या तथाकथित यशस्वी जीवनात जेव्हा तुला खरचं एकटं वाटेल तेव्हा मायेची पाखर धरायलाही काळी माती तयार आहे. भावनिक आधाराला तेच खेडं तीच माती तेच शेत तेच खेड्यातले भाव असे ही कविता या नवशिक्षितांना आश्वस्त करते.