आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणातून परिवर्तन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीटिंगमध्ये प्रशिक्षणाबाबत सैनीचे विचार ऐकण्यात गुंग झालेला सुरेश भानावर आला तो त्याच्यासमोर आलेल्या चहामुळे. चहाचा आस्वाद घेता घेता विचार करत होता. रमेश आणि सैनी ‘येतोच’ म्हणून कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडले. सुरेश विचारात अजून जास्त गढून गेला. त्याला आठवले द्रोणाचार्य आणि त्यांचे पट्टशिष्य. होय, केवढ्या पुराणकालापासून मानवाला प्रशिक्षणाचे महत्त्व पटले होते. मनात डोकावला एकलव्य. धनुर्विद्येचे प्रचंड आकर्षण असल्यामुळे आणि गुरूंनी प्रशिक्षण देण्यास नकार दिल्याने निराश न होता त्याने गुरूंचा पुतळा तयार करून केलेल्या स्वअध्ययनाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. पण आपल्याला असे काही जमले नाही. खरे तर गुरूही मिळाले होते. त्यांची शिकवण्याची तयारीसुद्धा होती. पण माझीच तयारी नव्हती.
केवढा मोठा कालखंड मी स्वविकासापासून वंचित राहिलो ही खंत वाटत होती. ती खंत, एक निराशा त्याच्या डोळ्यातून प्रतीत होऊ लागली. एक विचार विजेसारखा चमकला. का मी निराश होतोय? अनेक वर्षांनी का होईना, मी मला गवसलो आहे. गेल्या वर्षभरात किती प्रगती केलीय? निराश न होता वाया गेलेली वर्षे भरून काढता येतील का, हाच विचार मी करायला हवा. कशी काढायची ही वर्षे भरून? एक स्मित त्याच्या ओठावर उमटले.
आठवली एक गोष्ट. पूर्वी कधीतरी वाचलेली. एक होता कळप मेंढ्यांचा. माळरानावर चरत होता तो. एक डरकाळी सिंहिणीची. गाभण होती ती. शिकारीसाठी आलेली. मेंढ्यांच्या कळपावर झडप घालायची होती तिला. पण सुरू झाल्या प्रसूतिवेदना. बाळाला जन्म देताना मरून गेली बिचारी. त्या छोट्या बाळाचे पालनपोषण सुरू झाले मेंढ्यांच्या कळपात. गवत खात, बेंबे करत वाढत होता तो छोटा सिंह. आपणही शेळी आहोत हीच भावना झालेली त्याची. एके दिवशी एक मोठा सिंह त्या माळरानावर आला. मेंढ्यांसारखा वागणारा एक सिंहाचा बछडा पाहून खूप आश्चर्य वाटले त्याला. त्याच्याजवळ जाऊन सिंह म्हणाला, अरे, तू सिंह आहेस. असे मेंढ्यांसारखे काय वागतोस? त्या बछड्याला काही ते पटले नाही. तो खेळण्यात, गवत खाण्यात दंग झाला. दुसºया दिवशी तो सिंह माळरानावर आला. बछड्याला घेऊन पाणवठ्यावर गेला. पाण्यातली प्रतिमा पाहून बछडा थक्कच झाला. मी वेगळा आहे. याची जाणीव त्याला झाली. ही जाणीव महत्त्वाची... तो सिंहाबरोबर निघाला जंगलात. जंगलात त्या सिंहाबरोबर प्रशिक्षणातून त्या बछड्यात झाले परिवर्तन. एक सिंह सिंहासारखा वागायला शिकला. गोष्टीत रमलेल्या सुरेशला त्याच्यात आणि त्या बछड्यात साम्य दिसले. दरवाजा उघडून आत आलेला रमेश त्याला त्या मोठ्या सिंहासारखाच भासला. मनापासून हसू आले सुरेशला. त्याच्या हसण्याचे कारण कळताच रमेशही हसू लागला. या गोष्टीतून सैनींनाही हसू आवरता आले नाही.
प्रशिक्षणाचा आराखडा तर सैनीना आवडला होता. ते म्हणाले, पूर्वीच्या काळी असे मानले जायचे की व्यवस्थापक जन्माला येतात. आज ही विचारांची परिस्थिती बदलली आहे. ते म्हणाले, कुशल कार्यकर्ते, कामगार घडवलेच पाहिजेत. ते शक्य होते प्रशिक्षणातून. प्रशिक्षणाची चार उद्दिष्टे असतात. कर्मचाºयांना त्यांचे स्वत:चे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रवृत्त करणे व ती पूर्ण करण्यासाठी मदत करणे हे पहिले उद्दिष्ट. याचा उपयोग संस्थेलासुद्धा होतोच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी.
प्रत्येक जणाची परिणामकारकता वाढवणे आणि संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करणे हे प्रशिक्षणाचे दुसरे उद्दिष्ट. संस्थेच्या प्रत्येक विभागात एकसूत्रता आणणे हे तिसरे उद्दिष्ट. संस्थेला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत करणे हे चौथे उद्दिष्ट. सैनींचे हे बोलणे ऐकताना सुरेशला जाणवले की मी प्रशिक्षणाचा आराखडा तयार करताना केलेला विचार योग्य होता.
सैनी म्हणाले, ‘‘या सर्व गोष्टींचा विचार करून तू आराखडा तयार केला आहेस याचा मला आनंद झाला. तो मी तुमच्याजवळ व्यक्तही केला. सुरेश, तू हा जो विचार केलास तो स्वअध्ययनातून. परंतु याची सुरुवात जी झाली ती रमेशने तुला प्रशिक्षित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात. हा प्रशिक्षण ते स्वअध्ययन हा प्रवासच प्रत्येकाला आयुष्यात पुढे नेत असतो. त्याच्याकडून मोठी कार्ये घडवून आणत असतो.’’ सैनींची रजा घेत सुरेश व रमेश पुढील कामाकडे वळले.
udayohale@hotmail.com