आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक वास्तव मांडणारा ‘चावडी’ लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा येथील प्राथमिक शिक्षक तथा कथालेखक राजेंद्र पारे हे गेल्या दीड दशकांपासून प्रबोधनात्मक व शैक्षणिक विषयांवर लेखन करत आहेत. आतापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अध्यापनाचे पवित्र कार्य करत असताना शाळाबाह्य कामांमुळे शिक्षकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांच्या अंतर्मनातील भाव-भावनांचे कंगोरे अन् जळजळीत शैक्षणिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न पारे यांनी ‘चावडी’ कथासंग्रहातून केला आहे. हे पुस्तक लवकरच चोखंदळ वाचकांच्या भेटीला येईल.


शिक्षक म्हणजे संस्कारित समाजनिर्मिती प्रमुख होय. आजच्या शिक्षकांना पूर्वी इतका मान-सन्मान मिळत नाही, हे विदारक सत्य स्वीकारणे अपरिहार्य आहे. मात्र, याचवेळी अशी स्थिती का बनली? याचाही विचार झाला पाहिजे. तो विचार नेमका काय आहे? हे ‘चावडी’ कथासंग्रहातून वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार वाटपातही दीड ते दोन तासांचा वेळ वाया जातो. या व्यतिरिक्त जवळपास 30 ते 40 प्रकारची शाळाबाह्य कामे वेगळीच. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा हट्ट शासनाकडून धरला जातो; पण ते शाळेत आल्यानंतर त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळतो की नाही? याचा विचार गांभीर्याने होत नाही, ही शोकांतिका आहे. खेड्यापाड्यात अन् सातपुड्यातील वस्त्यांमध्ये इंटरनेटची सुविधा अद्यापही पोहोचलेली नसताना आता शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षकांची हजेरी सक्तीची केली आहे. त्यासाठी साधनसामग्री शाळांमध्ये उपलब्ध नसल्याने नाइलाजाने का असेना, पण पदरमोड करावी लागते. या सर्व बाबींमुळे शिक्षकांची होणारी कुचंबणा कुठे तरी थांबली पाहिजे आणि वैचारिक लोकचळवळ उभी राहावी म्हणून लेखक राजेंद्र पारे यांनी ‘चावडी’ कथासंग्रहातून जळजळीत वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकी पेशा स्वीकारला असला तरी राजेंद्र पारे यांची लेखणी वैचारिक क्रांतीची बीजे पेरणारी आहे. ग्रामीण भागातील जीवन त्यांनी अनुभवलं आहे. त्यातील खाचखळगे भोगले आहेत. जातीपातीच्या कंगो-यांनी पोखरलेला समाज त्यांनी पाहिलेला आहे. समाजजीवनात वावरताना जे अनुभवलं, उपभोगलं ते त्यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘मागचं दार’ या कथासंग्रहात ताकदीने मांडलं आहे. दलित साहित्य प्रवाहामध्ये शैलीऐवजी विचारप्रवाह आणि आशयावर भर दिला जातो, परंतु कथालेखक राजेंद्र पारे हे दोन्ही गोष्टींचा अनुबंध जमवताना दिसतात. ‘परिवर्तन’ या कथेत लखुबा नावाचा नायक अंधश्रद्धेला टाळून विज्ञानाच्या मार्गाने आणि धम्माच्या मार्गाने कसा प्रवास करतो, संघर्ष व संकटातून आपल्या जीवन चिंतनाची वाटचाल कशी सुरू ठेवतो, याचे मार्मिक पण अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे. त्यांच्या कथालेखनातून प्रेम आणि प्रबोधन या पद्धतीची दुहेरी वीण वाचकांना अनुभवायला मिळते. अस्सल जाणिवेच्या दर्जेदार कथांमधून उद्बोधन व प्रबोधन होत असते. वैचारिक ग्रंथांनी किंवा विद्वत्ताप्रचूर भाषणांनी जो परिणाम साधला जाणार नाही, तो परिणाम मार्मिकपणे विशिष्ट संवाद व निवेदन शैलीमधून कथा साकार करते, असा प्रबळ आत्मविश्वास कथालेखक राजेंद्र पारे हे आवर्जून व्यक्त करतात.


त्यांची ‘पोटचा गोळा’, ‘संत गाडगे महाराज’, ‘रमा’ हे तीन कथासंग्रह निरंतर शिक्षणासाठी मान्यताप्राप्त आहेत. त्यातील ‘रमा’ कथासंग्रहातून त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वत:च्या पायावर कशी उभी राहू शकते? याची चिकित्सा केली आहे. ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘बुद्धाचा मार्ग’ ही त्यांची दोन वैचारिक पुस्तकेही वाचनीय ठरली आहेत. महाराष्‍ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे ‘जीवन शिक्षण’ मासिक व महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे ‘किशोर’ मासिकातही ते शैक्षणिक विषयावर सातत्याने लेखन करत आहेत. ‘कामगार गौरव’, ‘आदर्श कर्मचारी’ अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर ‘उपक्रमशील शिक्षक’ अशी त्यांची ओळख असल्याने शिक्षण व्यवस्थेवर शाब्दिक फटकारे मारणा-या ‘चावडी’ या नव्या कथासंग्रहाची वाचक आतुरतेने वाट बघत आहेत.


मुलाखत : आनंदा पाटील, भुसावळ