आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहंकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिलासा’मध्ये मार्गदर्शनासाठी आलेलं ते दांपत्य माझ्यासमोर बसलं होतं. त्यांची बाराव्या वर्गात शिकणारी मुलगी वेगळ्या जातीतल्या मुलाचा हात धरून घरातून पळून गेली होती. मुलीची आई बराच वेळ धाय मोकलून रडत होती. आणि वडील स्वत:ची अस्वस्थता लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. दोघांच्याही भावनांचा उद्रेक थोडासा ओसरल्यानंतर त्यांना मी हळूहळू एकेक प्रश्न विचारायला सुरुवात केली.
तुम्हा दोघांना नक्की कशामुळे एवढं दु:ख झालं आहे हे मला सांगू शकाल का?
माझा प्रश्न संपताक्षणीच दोघांचीही उत्तर देण्यासाठी चढाओढ सुरू झाली.
‘आमची समाजात किती मोठ्या प्रमाणात बदनामी होईल याची कल्पनाही आम्हाला करवत नाही. आमच्या मोहल्ल्यातील लोक काय म्हणतील? आमची सगळी प्रतिष्ठा मुलीने धुळीला मिळवली. आम्हाला घराबाहेर तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही.’
मुलीच्या वडिलांचा ‘मी’-‘आमचं’-‘आम्हाला’ असा प्रथमपुरुषी एकवचनी जप व आईचं गळे काढणं हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी अत्यंत श्रद्धेने सुरू होते. दोघांपैकी कोणाच्याही बोलण्यात मुलीच्या भवितव्याविषयी थोडीही काळजी व्यक्त झाली नाही. दोघांच्याही दृष्टीने फक्त एकच विषय अत्यंत महत्त्वाचा होता - ‘घराण्याची प्रतिष्ठा’.
मी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला. ‘तुम्हाला तुमच्या मुलीच्या विरहाचं दु:ख असह्य झालं आहे की तिच्या भवितव्याच्या काळजीने तुम्ही दोघं खचून गेला आहात?’ माझ्या या प्रश्नाने मुलीच्या पिताश्रींच्या संतापाचा स्फोट झाला आणि ते उद्गारले, ‘अहो, कसलं विरहाचं दु:ख आणि भवितव्याची काळजी घेऊन बसलात? घराण्याच्या प्रतिष्ठेसमोर मुलांचं काय महत्त्व?’ स्वत:ला मुलांचे वडील म्हणवणा-या पुरुषाच्या तोंडून संतापाच्या भरात नकळत आजच्या समाजातलं एक भयानक सत्य बाहेर पडलं. जबरदस्त अहंकाराने व घराण्याच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांमुळे त्या दोघांना इतकं आंधळं करून टाकलं होतं की त्यासमोर मुलांची किंमत शून्य होऊन गेली होती. का वागतो आम्ही असे? मुलामुलींची प्रेमप्रकरणं त्यांच्या जन्मदात्यांपर्यंत योग्य वेळी का पोहोचत नाहीत? दहावी-बारावीत शिकणा-या अपरिपक्व वयाच्या प्रेमवीरांची प्रेमप्रकरणं स्वत:च्या अपत्यांना विश्वासात घेऊन पालक स्वत: का हाताळत नाहीत? घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करण्याची मुलांवर का वेळ येते? पालक व मुलांमधील भिंती पाडण्याचे प्रयत्न वडीलधा-या मंडळींकडून का होत नाहीत? या सर्व प्रश्नांचा प्रवास फक्त एकाच उत्तरापाशी पोहोचतो आणि ते उत्तर आहे - ‘अहंकार!’
अहंकार - प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची व अत्यावश्यक गोष्ट. अहंकार हा कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असतो. मर्यादित अहंकार हा समाजात माणसाची एक प्रतिमा निर्माण करत असतो. अहंकार नसलेल्या व्यक्तींना आत्मसन्मान नसतो, स्वत:ची मतं नसतात व अशांना लोक ‘बिनबुडाचं भांडं’ म्हणतात. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक ज्याप्रमाणे वाईट त्याचप्रमाणे अहंकाराचाही. अति अहंकार माणसाला आंधळं बनवतो. पत्रिका, कुंडली, छत्तीस गुण वगैरे सर्व काही अगदी तंतोतंत जुळल्यानंतरही अनेक जोडप्यांचं वैवाहिक जीवन विवाहानंतर एक वर्षाच्या आतच घटस्फोटापर्यंत का येऊन ठेपतं? पत्रिका व कुंडल्यांपेक्षा पती-पत्नीने स्वत:च्या अहंकाराला काबूत ठेवून व एकमेकाला सन्मानाने वागवून केलेली तडजोडच वैवाहिक जीवनात सुख व समाधान निर्माण करत असते.