इजिप्तचा खजिना... / इजिप्तचा खजिना...

सदाशिव देवगावकर

Aug 10,2012 10:18:15 PM IST

कुठे सहलीला गेलं की, तुम्ही फोटो काढत असाल. कितीतरी वर्षांनंतरही हे फोटो पाहिले की, सहलीच्या आनंदाचा पुन:प्रत्यय येतो. गुलमोहोर रस्त्यावर असलेल्या देवगावकरांच्या ‘श्रावण’ बंगल्यात गेलं की, या कुटुंबानं विविध देशांत केलेल्या सहलींचे साक्षीदार दिसू लागतात. इजिप्तमधील पिरॅमिड््सपासून मॉरिशसच्या चमकदार शंख, शिंपल्यांपर्यंत अनेक गोष्टींचा खजिना आपले डोळे दिपवून टाकतो. सदाशिव देवगावकर हे बांधकाम व्यावसायिक असले, तरी त्यांना राजकारणात मोठा रस आहे. राजकारणातील तणाव घालवण्यासाठी पर्यटन हा उत्तम पर्याय. त्यामुळे गेल्या काही वर्षांत देवगावकरांनी भारतातील विविध राज्यांबरोबर परदेशांतही भरपूर भटकंती केली आहे. इजिप्त, मॉरिशस, श्रीलंका, थायलंड, इटाली, मलेशिया, फ्रान्स अशा देशांची सैर त्यांनी केली आहे. सहलीला गेल्यानंतर त्या देशाचं, प्रदेशाचं नेमकं वैशिष्ट्य हेरून स्मरणात राहील अशा वस्तू त्यांनी आणल्या आहेत. इजिप्तमधील महाकाय आकारांचे पिरॅमिडस् प्रसिद्ध आहेत. या पिरॅमिडस्च्या भिंतींवर पूर्वी लहान आकारांचे पिरॅमिडस् लावलेले असत. असेच काही पिरॅमिड देवगावकरांनी आणले आहेत. इजिप्तमध्ये प्राचीन काळी हायरोग्लिफक्स ही चित्रलिपी वापरली जात असे. या लिपीचा शोध सन 1799 मध्ये ज्या शिलालेखामुळे फ्रेंच सैनिकांना लागला तो ‘रोझेटा स्टोन’ सध्या लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. त्याची प्रतिकृती देवगावकरांच्या कलेक्शनमध्ये आहे. इजिप्तमध्ये पूर्वी नाईल नदीतील पाणवनस्पतीपासून तयार केलेल्या ‘पपॅरस’ नावाच्या कागदावर लिखाण केलं जात असे. या कागदावर काढलेली काही ओरिजनल चित्रं देवगावकर यांनी आणली आहेत. मॉरिशस येथील अनेकरंगी व्हलकॅनिक अ‍ॅशबरोबरच एक दुर्मिळ चीज त्यांच्याकडे आहे, ती म्हणजे क्लिओपात्राच्या राजवाड्यातील टेराकोटा पात्राचा एक अवशेष!
थायलंडहून आणलेलं काचेच्या बाटलीतलं काचेचं जहाज, रशियातील लेनिनची प्रतिमा असलेला मुमेंटो, मॉरिशसचे अनेकरंगी शंख आणि शिंपले यांनी देवगावकरांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवली आहे. संगमरवरात कोरलेला दिवाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगडांचे काही नमुने त्यांच्याकडे आहेत. यातील काळ्या रंगाचा दगड म्हणजे आकाशातून पडलेल्या उल्केचा अवशेष (अ‍ॅस्ट्रॉईड) आहे. त्याहीपेक्षा एक वेगळी चीज म्हणजे फॉसिल्स. हजारो वर्षे खडकाखाली दबलेल्या वृक्षांचं नंतर खडकसदृश पदार्थांत रूपांतर होतं. देवगावकर यांनी मध्यप्रदेशमधून आणलेले हे फॉसिल्स तब्बल सहा कोटी वर्षांपूर्वीचे आहेत! नगर-जामखेड रस्त्यावर कॅन्टोन्मेंट हद्दीत ‘विजयंता मेस’ आहे. तेथे काही वर्षांपूर्वी मोठ्या आकारांचे फॉसिल्स मी पाहिले होते. त्यांना स्पर्श करण्याची इच्छा अपुरी राहिली होती.
देवगावकरांकडील फॉसिल्स मात्र हातात घेऊन न्याहाळता आले. देवगावकर व्हेनिसला गेले असताना त्यांना रस्त्यावर बसलेला एक चित्रकार दिसला. पर्यटकांना तो चित्र काढून देत होता, पण असं रस्त्यावर बसण्यास तिथले पोलिस हरकत घेतात. पोलिस आलेला दिसताच त्या चित्रकारानं चंबूगबाळ आवरायला सुरुवात केली, पण त्याही गडबडीत त्यानं अनेक कुंचले वेगवेगळ्या रंगांत बुडवून एकाच फटका-यात चित्रलिपीत शोभेल असं देवगावकरांचं नाव रेखाटून त्यांना दिलं. अक्षरांच्या वरच्या बाजूला प्रसिद्ध असा उडणारा ड्रॅगनही काढला. हे सारं अवघ्या मिनिटभरात!

X
COMMENT