आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भरेशमी चित्कळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धहस्त कवयित्री म्हणून अवघ्या मराठी मनाला सुपरिचित असलेलं नाव म्हणजे इंदिरा संत.
फिरे हिरवा गारवा, नागवेलींच्या पानांचा कणाकणात भरला, वास ओलस रानाचा
असं मनोहरी वर्णन शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चित्कळा, वंशकुसुम, निराकार आदी कविता संग्रहातून करणा-या इंदिराबाईंनी अनेक कथासंग्रह व बालसाहित्यासोबतच ललित लेखनही केले आहे. त्यांच्या साहित्यातील संस्कारावर अनेक पिढ्या तयार झाल्या, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यांच्या कवितेतून प्रेम, पाऊस, विरह, संध्याकाळ, मावळतीनंतरची उगवती, कुरूपपणाला लगडलेले सौंदर्य आदी अंतर्मनातल्या भावभावना उलगडून दाखवण्यात हळवे झालेले मन प्रकट झाले आहे. एखाद्या मखमली कापडाचा पोत चाचपून पाहताना बोटांच्या तळव्यांना जी अनुभूती येते तीच इंदिरा संतांचे काव्य वाचताना येते.


कॉलेज जीवनात फर्ग्युसन कॉलेज वसतिगृहात असताना कॉलेजच्या नियतकालिकासाठी कविता मागण्याच्या निमित्तानं ना. मा. संत यांची भेट झाली. भेटी वाढत गेल्या, भेटीचं रूपांतर प्रेमात झालं नि मग लग्नात. संतांच्या सहवासात प्रेमजीवन बहरास आले. या काळात कविता लिहिण्यापेक्षा ती चाखण्याकडे, अनुभवण्याकडे त्या दोघांचाही कल अधिक असल्याने तुरळक काव्यनिर्मिती झाली ती झाली. त्यात ही प्रेमकाव्यच अधिक!


हालचालीने या तुझ्या, हाले माझा पारिजात
मोती पोवळ्याची रास, पायाखाली ओसंडत
दोघंही कवी. रसरसून जगताना क्षण अपुरे पडावेत, असे ते सहजीवन आणि म्हणूनच त्या दोघांच्या कवितांचा एकत्रित काव्यसंग्रह ‘सहवास’ 1940मध्ये प्रकाशित झाला. त्यात इंदिराबाईंच्या 37 कविता आहेत. सहजीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगत असताना सोनेरी किनार असलेले हळवे दिवस फुलपाखराचे पंख लावून उडून जावेत तशी वर्षे संपली नि अवघ्या दहा वर्षांत ना.मा. संतांच्या अकाली निधनाने इंदिराबाईंचे भावविश्व उद्ध्वस्त झाले.


तुजवीण आता, तुझ्या या संसारी, अंगाराच्या सरी, वर्षतात
आत बाहेरून, लागलिसे आग, तुझा घेत माग, येऊ कोठे?
अशी उद्विग्न अवस्था झाली असताना नोकरी, घर, संसार, मुलांची जबाबदारी सांभाळून पतीचा विरह सहन करण्यावाचून गत्यंतर नाही, याचं भान इंदराबाईंच्या समंजस मनाला होतं. अशा वेळी दु:खावर फुंकर घालण्याचं काम कवितेनं केलं. तरुण वयात आलेलं वैधव्य सोसताना ‘कारल्याच्या मांडवाखालून जाण्याचे प्रसंग घडीघडी त्यांच्या आयुष्यात आले.’ या प्रसंगांशी संघर्ष करताना त्यातील विचित्र अनुभवांनी संवेदनशील मन बोथट होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो, इंदिराबाईंच्या कवितेत मात्र असा कडकपणा, रुक्षपणा कुठेच जाणवत नाही.


हवा फुलांचा शेजार, बाई हासत राहावे
काळजाच्या कुपीमध्ये, हवाबंद दु:ख व्हावे.
इंदिरा संतांचे काव्यलेखन ज्या कालखंडात सुरू होते, त्याच्या आगेमागे शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे या महत्त्वपूर्ण कवयित्री कवितालेखन करत होत्या. भावकाव्याच्या समृद्धीचा हा काळ. इंदिराबाईंचा ‘शेला’ हा 1951ला स्वतंत्ररीत्या प्रकाशित झालेला पहिला काव्यसंग्रह. प्रेमानुभवाला सर्वाधिक महत्त्व इंदिराबाईंच्या काव्यात आढळते. मानवी नाते संबंध अधोरेखित करताना व विरह वेदना व्यक्त करताना निसर्गप्रतिमांचा काव्यातील आविष्कार पाहण्यासारखा आहे.


रक्तामध्ये ओढ मातीची, मनात मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन
आपल्याला निसर्गाची इतकी ओढ का याचा अन्वयार्थ लावता स्वत:ला त्यात शोधण्याचा प्रयत्न इथं दिसतो. ही कविता लिहितानाचा इंदिराबाईंचा अनुभव मोठा बोलका आहे. त्यांच्या घरापासून कॉलेजपर्यंतच्या वाटेवर एका इमारतीचं बांधकाम चालू होतं. त्या रोज जाता-येता पाहायच्या, तिथं पाया खणून मातीचा ढीग बाजूला टाकलेला होता. कोवळ्या उन्हात तो ढीग अतिशय छान दिसायचा. एकेदिवशी न राहवून मातीला हात लावून पाहिला तर मातीचा तो स्पर्श किंचित ओला, स्निग्ध आणि मऊमऊ असा. अगदी आताच ताजी माती खोदल्यासारखा. हा अनुभव कित्येक दिवस मनात तसाच राहिला. एकेदिवशी नकळत लिहिले गेले ‘मना मातीचे ताजेपण’.
स्त्री-पुरुष नातेसंबंधातील ‘प्रेमपत्र’ हा असाच हळवा कोपरा.
नको पाठवू अक्षरातुनि, शब्दांमधले अधिरे स्पंदन.
कागदांतुनि नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण।
असं सहज सुंदर त्या लिहून जातात.
इंदिराबाईंच्या काव्यातदेखील सतत मनातील वास्तवाशी झुंजताना दिसतात. बाह्यांगी वास्तवाबाबत त्या ब-याच तटस्थ, सौम्य प्रतिक्रिया देतात. त्यांच्या काव्यातून सामाजिक, सांस्कृतिक घुसमटीबद्दलचा असंतोष फारसा व्यक्त होत नाही. वास्तविक पन्नास, साठच्या दशकात इंदिराबाईंचे काव्यलेखन ऐन बहरात होते, त्या वेळची सामाजिक स्थिती स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी फारशी पोषक नव्हते. वेगवेगळ्या चळवळींनी समाजमन ढवळून निघाले होते. त्यांच्या अगोदरच्या कालखंडात सावित्रीबाई, लक्ष्मीबाई टिळक यांसारख्यांनी वेगळा विचार काव्यातून व्यक्त केला होता; पण इंदिराबाई या सगळ्यांपासून अलिप्त राहतात. तटस्थपणाने त्या सगळ्या घडामोडींकडे पाहतात व मनस्वीपणाने काव्यलेखन करताना दिसतात.


इंडो या विजापूर जिल्ह्यातील गावी जन्मलेल्या इंदिराबाईंपुढे नोकरीच्या निमित्ताने बेळगावसारख्या निसर्गरम्य ठिकाणी वास्तव्यास होत्या. सभोवतालच्या हिरव्याकंच निसर्गाची जादू त्यांच्या कवितेवर न झाली तर नवल. ती जादू पुढे सर्व कविताभर पसरून राहिली. अगदी शेवटच्या कवितेपर्यंत. उत्कंठ तनामनाचं भावकाव्य लिहिताना इंदिराबाईंच्या कवितेत निसर्ग असा काही नटून, थटून वावरताना दिसतो की त्याचे अधिराज्य आजही मराठी मनावर आहे. अनेक अभ्यासकांनी त्यांची कविता अभ्यासली असून समीक्षकांकडून गौरविली गेली आहे. शासनासहित अनेक संस्थांनी तिला सन्मानित केले. रसिकांच्या काळीज कोंदणात ती विराजमान झाली.


जवळजवळ सहा दशकं निष्ठापूर्वक कविता लेखन करून त्यांनी विविधांगी भावभावनांना आविष्कृत केले. शेवटच्या काळात मात्र काव्यात येणारे रितेपण, संज्ञेचा सर्जक प्रकाश हरवल्याची जाणीव, शब्दसृष्टीला पारखे झाल्याची सल, आणि निरुपायाने निरोप घेतानाची अगतिक तगमग ‘इंद्रायणीची वाहाणी’ व ‘रिक्ता’ या कविता वाचताना स्पष्ट जाणवते. हयातभर आपल्या भावकवितेने रसिकमन चिंब करणा-या इंदिराबाई अपल्या ‘निराकार’ या शेवटच्या कवितासंग्रहाच्या मनोगतात म्हणतात, ‘यापुढे माझ्या हातून कवितालेखन होईल असे वाटत नाही, हीच माझी शेवटची भेट समजावी, मानून घ्यावी, अशी रसिक वाचकांना विनंती.’
डोळा दाटला काळोख, मौन दाटले प्राणांत
आणि परतले मागे, रिक्ता कशी रिक्त रिक्त...


tadegawkarsanjiwani@yahoo.com