आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षक उर्जेचा सळसळता प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दि जीनियस’चे प्रवीण आणि मी एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलेलो. दोघेही अभियांत्रिकी सोडून नाट्य-सिनेक्षेत्रात उतरलो आणि अनेक वर्षांनी या कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र काम करण्याची संधी जुळून आली.
नाशिकमध्ये कायमस्वरूपी नाटकाची चळवळ बांधावी, ही आमची दोघांची इच्छा. हेतू हा की अशा शहरांमधून उभ्या राहणार्‍या नाट्य चळवळीतून प्रादेशिक रंगभूमी विकसित व्हावी. नाटकांचा आस्वाद घेणारा प्रेक्षकवर्ग तयार व्हावा. प्रेक्षकांना रंगभूमीपासून वेगळं काढता येत नाही, त्यांना कलाकाराइतकीच समज-उमज असते, फक्त ती आपण नीट समजून घेऊन नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, असं मला वाटतं. नाटक हा ऊर्जेचा खेळ आहे. त्यात सहभागी होणारा स्टेजवरून त्याची ऊर्जा प्रेक्षकापर्यंत पोहोचवत असतो, जो नाट्यचळवळीचा खरे तर एक अविभाज्य घटक असतो. प्रेक्षक त्यांची ऊर्जा कलाकारांना देतात. प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळाली नाही, तर कलाकाराला प्रयोगाचं समाधान मिळत नाही. पण माझा हा विश्वास आहे की, तिकीट काढून प्रेक्षागृहापर्यंत येणारा रसिक खरं तर नाटकाच्या खेळात सहभागी होण्यासाठीच आलेला असतो. जर कलाकार त्याला भिडणारं काही सांगू शकले तर तो सहज त्याची ऊर्जा त्यांना देऊ करतो. प्रेक्षक नवनवीन प्रयोगाचा स्वीकारही करू शकतो, हे मला मुंबईतील बोरिवली येथे झालेल्या आमच्या ‘काटकोन त्रिकोण’च्या प्रयोगानंतर लक्षात आलं. या नाटकात मी, डॉ. मोहन आगाशे आणि केतकी थत्ते असे तीनच कलाकार होतो. झालं असं की, त्या दिवशी डेंग्यूमुळे डॉक्टरांची तब्येत बिघडली होती. त्यांना सतत उलटी होत होती आणि खूप अशक्तपणाही आला होता. प्रयोग रद्द करावा असं वाटत होतं, पण डॉक्टर खूपच शिस्तशीर आणि बांधिलकी जपणारे कलाकार असल्याने आलेल्या प्रेक्षकाला प्रयोग न पाहता परत पाठवणं, त्यांना मान्य नव्हतं. हीच मुळात मोठी शिकवण होती. आम्ही प्रयोग चालू केला, पण डॉक्टरांना उलटीचा त्रास झाल्याने दोनदा मध्ये थांबावं लागलं. प्रेक्षक आमच्याबरोबर संयमाने थांबले होते. त्यांना दिसत होतं की, डॉक्टर मनापासून त्यांच्यासाठी झटत होते आणि म्हणून मनाने सर्व प्रेक्षागृह त्यांच्याबरोबर होतं. पहिला अंक पार पडल्यानंतर मी आणि केतकी ग्रीनरूममध्ये आडवे पडून राहिलेल्या डॉक्टरांकडे काळजीने पाहत होतो. त्यांना ग्लानी आली होती आणि दुसरा अंक सुरू करावा का नाही, या दुविधेत आम्ही होतो. पण डॉक्टर इच्छाशक्तीच्या बळावर उठले आणि प्रयोगाचा दुसरा अंक सुरू झाला. पुन्हा दोनदा थांबावं लागलं आणि शेवटी डॉक्टरांना शक्यच न झाल्याने पडदा पाडावा लागला. आम्ही उद््घोषणा केली, प्रेक्षागृहात कोणी डॉक्टर असल्यास त्याने ताबडतोब बॅकस्टेजला यावे. प्रेक्षकांमधून डॉक्टर पाध्ये ग्रीनरूममध्ये आल्या. योगायोग म्हणजे, त्या डॉ. आगाशेंच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्यांचं बोरिवलीत हॉस्पिटल होतं. त्यांनी डॉक्टरांना तपासलं आणि तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास लावलं. डॉक्टर गेल्यावर मी पडद्याबाहेर येऊन तोपर्यंत अर्धा तास चुळबूळ न करता शांतपणे वाट पाहणार्‍या प्रेक्षकांशी बोललो. त्यांना परिस्थिती सांगितली. तिकिटं परत मिळतील, हेही सांगितलं. पण तोपर्यंत प्रेक्षक बघे राहिले नव्हते. आपल्यासाठी कळकळीने काम करणार्‍या डॉक्टरांना पाहून ते आमच्याबरोबर आता या प्रयोगाच्या खेळातले सहकलाकार झाले होते. त्यांनी आधी डॉक्टरांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि नंतर म्हणाले, ‘आता पुढचं नाटक गोष्टीरूपाने तरी सांगा, पण आम्हाला शेवट कळू दे.’ माझ्या डोक्यात कल्पना आली की, मी व केतकी दोघं मिळून उरलेला प्रयोग सादर करू, फक्त स्क्रिप्ट हातात घेऊन. डॉक्टरांचे संवाद आम्ही आलटून पालटून स्क्रिप्टमध्ये पाहून म्हणू. ते जेव्हा केतकीशी बोलतात तेव्हा त्यांचे संवाद मी म्हणेन, आणि माझ्याशी बोलतात तेव्हा केतकी त्यांचे संवाद म्हणेल. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचा होकार दिला आणि एक अनोखा प्रयोग सुरू झाला...
मी आणि केतकीने काही अशा प्रसंगाची तालीम केली नव्हती, पण प्रेक्षकांनी दिलेली ऊर्जा आणि प्रयोग पूर्ण करण्याचा जोश, यामुळे आमचं ट्यूनिंग इतकं जुळलं की आम्ही बरोबर योग्य क्षणी एकमेकांकडे स्क्रिप्ट द्यायचो. डॉक्टरांची वाक्ये म्हणायचो. विशेष म्हणजे, आम्ही जे संवाद डॉक्टरांकडे पाहून म्हणायचो, त्या ठिकाणी अर्थातच कोणी नव्हतं. पण प्रेक्षकांनी त्यांची कल्पकता वापरून बरोब्बर त्या ठिकाणी अदृश्य डॉक्टरांना पाहण्याची किमया साधली. त्यामुळे तिसरा कलाकार स्टेजवर नसतानाही प्रेक्षकांनी इमॅजिन केल्यामुळे तो रंगमंचावर आमच्यामध्ये वावरत होता. जवळपास 30 मिनिटांचा हा प्रसंग योग्य तिथे हशे वसूल करत आणि ताणतणाव निर्माण करत सुविहितपणे पार पडला. प्रेक्षकांनी पडदा पाडताना जोरदार टाळ्या वाजवून आम्हाला दाद दिली, पण खरी दाद त्यांनाही होती ज्यांनी हे अशक्य वाटणारं शक्य करून दाखवलं!
अनुभव बोरिवलीतला होता, पण त्याने मला विविध ठिकाणच्या प्रेक्षकांबद्दलचे कितीतरी पैलू लक्षात आणून दिले. मानवी स्वभाव सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखाच असतो, त्याला रंगभूमीबद्दल आत्मीयता वाटायला लावणं अपेक्षित असेल, त्याला रंगभूमी त्रयस्थ न वाटू देण्यासाठी कलाकाराला झटावं लागतं, हेही कळलं. त्या दिवसापासून माझा प्रेक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलला आणि नाटकातील त्यांच्या स्थानाची जबरदस्त ताकद लक्षात आली. मला लक्षात आलं की, खरं तर हा प्रेक्षक नावाचा समूह नाटकात होणार्‍या कुठल्याही नवनवीन प्रयोगांमध्ये सहज सहभागी होऊ शकेल. फक्त त्याला त्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रेक्षकांना निर्बुद्ध समजणं किंवा त्यांना विनोदी, टाइमपास काहीतरी लागतं, हे गृहीत धरणं, ही ठोकताळे बांधणार्‍यांनी पसरवलेली अफवा आहे. ज्याला वेगळं काही घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल, त्याला फक्त योग्य पद्धतीने साद घातली पाहिजे. जर ती भाषा नस पकडणारी असेल, तर प्रेक्षक बघ्याची भूमिका सोडून सहज या ऊर्जेच्या खेळातले सहकलाकार होतात.