आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड : आधुनिक ऑलिम्पिकचे स्फूर्तीस्थान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉकी खेळात प्रतिस्पर्ध्याच्या थेट गोलात चेंडू टाकणारा खेळाडू हा संघाच्या विजयाचा शिल्पकार मानला जातो खरा, पण तोच चेंडू त्या गोलापर्यंत नेण्यात जे-जे खेळाडू एकमेकांना ‘पास’ देतात, तेच खरे तर त्या यशाच्या पडद्यामागचे तेवढ्याच तोलाचे सूत्रधार असतात. तसाच ऑलिम्पिकच्या पुनरुज्जीवनात इंग्लंडचा वाटा, चेंडू गोलपर्यंत नेणा-या त्या सूत्रधारांएवढा महत्त्वाचा आहे. अर्थात तसे आणखीही काही वाटेकरी आहेत, की ज्यांचा ‘चेंडू’ गोलात टाकता आला नाही तरी ऑलिम्पिकविषयी जनसामान्यात तशी ‘हवा’ निर्माण करण्यातील त्यांची कर्तबगारी जरूर उल्लेखनीय ठरावी. त्यातले एक नाव म्हणजे इव्हानजेलीस झापा. या ग्रीक दानशूर व्यापा-याने स्वखर्चाने अथेन्स येथे 1870 आणि 1875मध्ये स्पर्धा घेतल्या. तरीपण इंग्लंडमध्ये ‘डोव्हर टेकडी’च्या पायथ्याला होत असलेल्या ‘कोट्सवॉल्ड ऑलिम्पिक गेम्स’ने अभुतपूर्व इतिहास घडवला आहे. ती स्पर्धा इ. स. 1612मध्ये सुरू झाली. म्हणजेच आगामी ‘लंडन-2012’ जणू त्या स्पर्धेचा ‘चतुर्थशतक महोत्सव’ साजरा करत आहे!!
प्राचीन ऑलिम्पिक, रोमन सम्राटांच्या आज्ञेवरून इ. स. 393मध्ये बंद पडल्यानंतर जवळपास एक हजार वर्षे - एरवी बराचसा काळ धर्मयुद्धात गेला. त्यानंतर सतराव्या शतकाच्या प्रारंभापासून ‘ऑलिम्पिक’ शब्द पुन्हा चर्चेत आला. त्यात वर उल्लेख केलेल्या डोव्हर टेकडीच्या पाय-या लगतच्या मोकळ्या आणि उजाड मैदानावर रॉबर्ट डोव्हर या एका क्रीडाप्रेमीने निव्वळ करमणूक-प्रधान खेळांच्या स्पर्धा सुरू केल्या. त्याच्या दस्तऐवजातील उल्लेख इ.स. 1620 असा असला तर प्रत्यक्षात त्याच्या सात-आठ वर्षे आधीपासून ती सुरू झाली असावी. (लंडन-2012च्या पार्श्वभूमीवर तिचा प्रारंभ 1612 मानण्यास हरकत नाही.) मैदानावर स्टेडियम तर राहोच, पण कोणतीही इमारत तेथे नव्हती. जिमनॅस्टिक्स, एका हातातील लाकडी काठीने प्रतिस्पर्ध्यांशी करावयाची लढत-शिन किकिंग, रस्सीखेच वगैरे खेळांच्या दोन दिवसांच्या स्पर्धा - दरवर्षी होत - डोव्हर यांच्या मृत्यू (1650) नंतरही तब्बल दोनशे वर्षे त्या चालूच होत्या. त्यानंतर त्यात अनेक स्थित्यंतरे होत ती आजही होतेच आहे. त्याशिवाय म्यूच वेन्लॉक याने 1850 पासून सुरू केलेली वेन्लॉक ऑलिम्पिक गेम्स, लीव्हरपूल ऑलिम्पिक फेस्टिव्हल 1860 पासून, तर नॅशनल ऑलिम्पिक गेम्स - प्रारंभ 1865 आणि 1870 ते 1958 पर्यंत चाललेली ‘मोरपेथ ऑलिम्पिक गेम्स’, या इंग्लंडमधील मान्यवर आणि लोकप्रिय स्पर्धा. सर्वच ऑलिम्पिक नावाखाली होणा-या.
डॉ. विल्यम पेनी ब्रुक्स हे ऑलिम्पिक पुनरुज्जीवनाच्या विचाराने अक्षरश: पछाडले गेले होते. वेन्लॉक या अवघ्या अडीच हजार लोकवस्तीच्या खेड्यात वेन्लॉक ऑलिम्पिक सोसायटी, अ‍ॅथलॅटिक असो. वगैरे कार्य चालू असतानाच ते 1890च्या सुमारास कुबर्टिन यांच्या संपर्कात आले. पण ऑलिम्पिक स्पर्धेच्या प्रारंभाचे स्वप्न प्रत्यक्षात येत असतानाच्या अवघ्या चारच महिने आधी (10 डिसेंबर 1895) त्यांचे निधन झाले. ऑलिम्पिक पुनरुज्जीवनाच्या कार्यात हेलसिंगबोर्ग-स्वीडन (1834-36), पेर्गोस-ग्रीस (1838 पासून) वगैरेंचाही उल्लेख करावा लागेल.
अर्थात आधुनिक ऑलिम्पिकचा प्रारंभ झाल्यानंतर लंडनने स्पर्धा संयोजनाची पहिली जबाबदारी 1908मध्ये सांभाळली आणि ती अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी केली. एक तर त्या आधीच्या दोन्ही 1900(पॅरीस) आणि 1904 (सेंट लुईस) स्पर्धांचा पूर्ण फज्जा उडालेला होता. 1908ची मूळ जबाबदारी रोम शहराने घेतली होती. पण इटलीत झालेल्या एका धरणीकंपाच्या धक्क्याने त्यांना ऐन वेळी स्पर्धा संयोजन अशक्य बनले. तेव्हा नियोजित दिवसाच्या अवघ्या दहाच महिने आधी लंडनवर ती जबाबदारी सोपवण्यात आली. ते आव्हान यशस्वी करताना त्या शहराने शेफर्ड्स बुश येथे नवे प्रशस्त स्टेडियम बांधले. त्यातील धावण्याच्या ट्रकबरोबरच बाहेर सायकलींगचाही ट्रॅक, त्याच परिसरात फुटबॉलचे मैदान, जलतरणाचा तलाव, कुस्ती आणि जिमनॅस्टिक्ससाठी योग्य असे प्लॅटफॉर्म उभे केले. सर्वच देशांनी त्यांचे सर्वोत्तम खेळाडूच पाठवले होते. त्यामुळे सर्वच खेळात अटीतटीच्या लढती झाल्या.
डायव्हिंग आणि हॉकी या स्पर्धेत प्रथमच समाविष्ट झाले. विशेष म्हणून पुढे हिवाळी ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केलेला (बर्फावरील) फिगर स्केटींग त्याचे तांत्रिक संयोजन आणि खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने खूपच लोकप्रिय झाल्या. मॅरेथॉनच्या शर्यतीबद्दल शहरात कमालीची उत्सुकता होती. बेचाळीस किलोमीटर्स अंतरावर दोन्ही बाजूंनी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. शर्यतीचा प्रारंभ आणि शेवटही पाहता यावा म्हणून आठच दिवस आधी शर्यतीचा मार्ग 385 यार्ड्स अंतराने वाढवण्यात आला. त्यामुळे नियोजित विंडसर कॅसल (राजवाडा) पासूनच झाला. पण शर्यतीचा शेवट राणी अलेक्झांड्रा यांच्यासमोर व्हावा म्हणून शर्यतीचे एकूण अंतर 42.195 मीटर्स - तेच पुढेही कायम करण्यात आले आणि तीच शर्यत एकूण मॅरेथॉनच्या इतिहासातच सर्वाधिक नाट्यपूर्ण ठरली.
त्या शर्यतीने क्वचित विजेत्यापेक्षा पराभूतही प्रेक्षकांचा हिरो ठरू शकतो, हे तर दाखवून दिलेच, पण त्याबरोबर सारे ‘स्टेडियमच’ किती टोकाचे भावनोत्कट होऊ शकते, हेही त्यातून दिसले. इटलीचा पिएट्री डोरान्डो हा मोठी आघाडी घेऊन शर्यतीची अखेरची फेरी पूर्ण करण्यासाठी स्टेडियमवर पोहोचला तेव्हा तोच शर्यत जिंकणार हे गृहीत धरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पण त्यावेळी डोरान्डो एवढा कमालीचा थकला होता, की जेमतेम पंधरा वीस मीटर्स अंतर बाकी असताना तो ट्रॅकवर चक्क कोसळलाच. टाळ्यांच्या प्रोत्साहनातून तो उठला आणि कसाबसा सात-आठ मीटर अंतर चालतो तो पुन्हा कोसळला. एवढ्यात दुस-या क्रमांकाने आघाडीवर असलेला अमेरिकेचा जॉनी हेस स्टेडियमवर पोहोचला आणि मोठ्या आत्मविश्वासाने धावत राहिला. इकडे डोरान्डोचे उठणे आणि कोसळणे चालूच होते, तेव्हा प्रेक्षकांच्या उत्कंठतेने शिखर गाठले. त्याच क्षणाला कमालीच्या केविलवाण्या डोरान्डोच्या सहानभूतीनेही तर कमालच केली. डोरान्डे जॉनी हेसकडून पराभूत होणार ही कल्पना केवळ प्रेक्षकांना नव्हे तर शेवटाला उभ्या डॉक्टर्स आणि अधिका-यांनाही सहन होईना. तेव्हा आपण काय करतो आहोत याचे भान न राहता त्यांनी डोरान्डोच्या बकोटीला धरून त्याला चक्क फरफटतच शर्यत पूर्ण करविली! अर्थात हेसने शर्यत पूर्ण करून अधिका-यांविरुद्ध तक्रार नोंदवली. ती मान्य करून जॉनी भले विजेता म्हणून घोषित होवो, प्रेक्षकांच्या हीरो डोरान्डोच होता!
दुस-या महायुद्धाच्या ज्वाला पुरेशा थंडावलेल्या नसतानाही लंडनने 1948च्या स्पर्धेचेही संयोजन तेवढेच यशस्वी ठरवले. त्या स्पर्धेत जर्मनी आणि जपान संघाला स्पर्धेला प्रवेश नाकारला गेला.
त्या अर्थाने, तीन स्पर्धांचे यजमानपद मिळवणारे ‘लंडन’ हे पहिलेच शहर आहे. आगामी ‘2012’ स्पर्धेत खरे तरे फार मोठे म्हणावे असे आव्हान संयोजकांपुढे नसले तरी दोन गोष्टींची उत्सुकता नक्कीच आहे. एक तर आजवर कधी नाही एवढा सुरक्षेचा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे. दुसरी उत्सुकता एवढीच की, या आधीच्या (2008) बीजिंग स्पर्धेने संयोजन आणि क्रीडा कामगिरी अशा दोन्ही विभागात जे अभूतपूर्व यशाचे शिखर गाठले आहे, ‘लंडन’ त्याच्या कितपत जवळ पोहोचू शकेल?