आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पर्यावरण अभियांत्रिकी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर महिन्याची महतीच तशी न्यारी. मुळात प्राचीन रोमन शब्द ‘सप्टेन’ म्हणजे (रोमन कॅलेंडर प्रमाणे) सातवा महिना. म्हणून त्याचा ‘सप्टेंबर’ महिना असे बोलले जाऊ लागले. प्राचीन रोमन लोकही श्रद्धाळू असल्यामुळे अग्निदेवतेला व याच महिन्यात येणा-या पिकांच्या लागवडीला परमेश्वर काळजीने पुढे वाढवतो असं त्यांचं म्हणणं. शिवाय याच महिन्यात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त पाच सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. 15 सप्टेंबरला आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून तर 16 सप्टेंबर रोजी ‘वर्ल्ड ओझोन डे’ साजरा करत असतो. थोडक्यात पर्यावरण, मानवी संस्कृती, आधुनिक समाज यांचे एक नाते प्रस्थापित झालेले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जगभरातूनच वेगवेगळ्या पातळ्यांवर उपक्रम होत आहेत. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही समस्या आपण गेल्या काही वर्षांपासून वाचत आहोत.


माणसाला उत्तम मानसिक, शारीरिक आरोग्य घडवायचे, टिकवायचे असेल तर पर्यावरण संतुलित, चांगले असायला हवे असे सर्वप्रथम रोमन लोकांना वाटले. पण त्यानंतर आधुनिक काळात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यंतरात जोसेफ बझलगेट यांनी लंडनमध्ये सांडपाण्याची एक विशिष्ट पद्धती सर्वप्रथम विकसित केली. त्यामुळे दूषित पाण्यापासून होणारे कॉलरासारखे रोग ब-याच प्रमाणात आटोक्यात आले. आधुनिक काळातील ‘पर्यावरणाचा रक्षक’ म्हणून जोसेफ बझलगेट यांना लोकमान्यता मिळाली.


लोकसंख्येचा भस्मासुर झालेल्या भारतासारख्या देशात तर पर्यावरणासंबंधी काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. जल, वायू, ध्वनी अशा कितीतरी माध्यमांतून प्रदूषण होत असतं आणि पर्यावरणाचा -हास होतो. हे दृष्टचक्र कमी करण्यासाठी आपल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी ह्या क्षेत्राचा एक करिअर म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही. पर्यावरण अभियांत्रिकीची शाखा चांगल्यापैकी प्रगतिपथावर आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि केमिकल इंजिरिअरिंगचे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. ‘सिव्हिल इंजिनिअर्स’ हायड्रोलॉजी, जलसंसाधन व्यवस्थापन, (वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट) किंवा कारखान्याची पर्यावरणाच्या दृष्टीने रचना करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. कच-याचे विस्थापन, घन कचरा, द्रव कचरा त्यांचा निचरा व त्यांना मार्गी लावण्याची व्यवस्था शिकून हे इंजिनिअर्स औद्योगिक क्षेत्राला खूप मदत करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअर्स पर्यावरणाला संतुलित राखणारे मशीन किंवा यंत्र डिझाइन करण्याचे, बनविण्याचे काम पाहू शकतात. यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या नियोजनासाठीची उपकरणं किंवा कारखान्याच्या आवारात पंप हाऊस तयार करणं, कचरा आणि सांडपाण्यासाठी आवश्यक ती यंत्रे तयार करण्याचे महत्त्वाचं असतं. पर्यावरण रासायनिक अभियंता अर्थात केमिकल इंजिनिअर पर्यावरणातील रसायनांचा, वायू व जल यामधील रासायनिक घटकांचा, त्यांच्या विधायक / विघातक उपयोगांचा अभ्यास करून उद्योग जगतामध्ये स्वत:चं वेगळेपणा दाखवू शकतो. भारतामधील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील मेकॅनिकल, सिव्हिल आणि केमिकल शाखांमधून हा विषय शिकविला जातो. ‘इंजिनिअर्स डे’च्या निमित्ताने तरुण, होतकरू भावी इंजिनिअर्सनी पर्यावरण अभियांत्रिकीसारखा कोर्स करून ग्लोबल वर्ॉमिंगपासून लोकांना वाचवायला काही हरकत नाही. जे आपले मित्र-मैत्रिणी अभियांत्रिकी शाखेत नाहीत त्यांच्यासाठी सायन्स किंवा बीएस्सी., एमएस्सीसुद्धा या विषयात करता येते. इथे स्पेशलायझेशन म्हणून ‘पर्यावरणशास्त्र’ हा विषय घेता येतो. यामध्ये बॅचलर्स आणि नंतर मास्टर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याशिवाय पर्यावरणविषयक कायदा आणि पर्यावरण पत्रकारितेचा कोर्सही करता येऊ शकतो.


टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन, त्यांचा पुनर्वापर अशा प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये, शिवाय खाण उद्योगांमध्ये, तेल, सोने, साखर इत्यादीच्या शुद्धीकरणाच्या कारखान्यांमध्ये, सूतगिरण्यांमध्ये, अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये तसेच रासायनिक खत तयार करण्याच्या उद्योगधंद्यांमध्ये बरेच रोजगार उपलब्ध आहेत. आपल्या देशात लोकसंख्या वाढते आहे. तसेच गाड्यांचेही प्रमाण वाढतेच आहे. पर्यायाने प्रदूषणात भरच टाकली जात आहे. गाड्यांमधून सोडला जाणारा कार्बन हवेत मिसळून आपल्याला शुद्ध हवा मिळणं कठीण झालं आहे. ओझोनचा कमी होणारा थर ही संपूर्ण मानवजातीला काळजीत टाकणारी (जीवघेणी) समस्या होऊ पाहतेय. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे पर्यावरणातील करिअरचा जरूर विचार करावा.