आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्त करणारा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणीवरचा प्रत्येक प्राणी या पावसाची वाट बघतो नाही? प्रत्येकाच्या जाणिवा वेगळ्या, भावना वेगळ्या, गरजा वेगळ्या. पण हा पाऊस, या जलधारा, यांना एकच जाणीव असावी, सगळ्यांना तृप्त करण्याची! अगदी-शी, काय हा पाऊस, सगळीकडे चिकचिक लावून दिलीय नुसती, असे म्हणून नाक मुरडणार्‍यांचीही! जसे माणूस त्याचे आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये उपभोगतो-बालपण, यौवन, वृद्धत्व. त्यातल्या त्यात सगळ्यांना तरुणपण जास्त आवडते. कारण या वयाची बातच कुछ और असते! सगळ्या नकारात्मक गोष्टीसुद्धा, प्रयत्न करून सकारात्मक करण्याचा वेगळाच दृष्टिकोन या तरुणपणात असतो ना? तसेच या पावसाचे पण वाटते. बघा ना. अगदी सुरुवातीला तो हळूहळू आपली नुसती ओळख द्यायला येतो. मध्येच लपाछपी खेळतो. नंतर अगदी सुरू झाला की थांबता थांबत नाही. बेधुंद, मस्त! प्रत्येक भाषेतील कवींनी या पावसाला गाण्यात बंदिस्त केलंय. मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत व अगदी इंग्रजीतही. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा काय किंवा Rain Rain come soon काय, छोट्या दोस्तांकरिताही कविता तयार झाल्यात. चंचल वारा या जलधारा, आला पाऊस मातीच्या वासात गं..., रिमझिम पाऊस पडे सारखा अशी गाणी मोठ्यांसाठीही तयार झालीत. विरही जनांच्या मनाला हा पाऊस तर आपला सखाच वाटतो. अशा पावसात उभे राहून ते एकमेकांची आतुरतेने वाट बघत असतात. पावसालाच विनवत असतात की, तुझ्यासोबत माझ्या सख्यालाही घेऊन ये. पृथ्वीवर जर हा पाऊस नसता तर? कल्पनाच करवत नाही. त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. शेतकरी तर 100 टक्के पावसावर अवलंबून असतात. ज्या वर्षी भरपूर पाऊस, त्या वर्षी सगळीकडे सुकाळच सुकाळ! प्रत्येक राज्यातले शेतकरी या पावसाची पूजा बांधतात, त्याची गाणी गातात आणि वरुणदेवतेला प्रसन्न करून घेतात, त्याला आळवतात. माणसाप्रमाणेच पशुपक्षीही त्याची अशीच वाट बघत असतात. मोर, चकवा, कोकिळा इ. पक्ष्यांना तर त्याच्या आगमनाची चाहूल आधीच लागते, मग आपल्याला समजते. मोर-लांडोर पावसाच्या आगमनाच्या चाहुलीने अगदी मोहरून जातात, आपले सुंदर पिसारे फुलवून नाचतात! सगळ्यांना पाऊस येतोय, असे सांगतात. जंगलातील प्राणीही ग्रीष्म ऋतूच्या उन्हाने होरपळून निघालेले असतात. पाऊस आल्यावर पाण्यात डुंबून थंड विश्रांती घेतात.

असा हा पाऊस. सगळ्यांना हवाहवासा वाटणारा, तृप्त करणारा. ही सगळ्यांना तृप्त करणारी, आनंद देणारी किमया पावसाप्रमाणे आपल्या सगळ्यांनाही जमली तर किती छान होईल ना?