आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातला पाऊस...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाने कोकणावर सौंदर्याची लयलूट केली आहे. अतिशय मोहक वातावरण. कोकणात आम्ही रत्नागिरीला वास्तव्यास होतो. कोकणात जसा अविरत पाऊस पडतो, तसा पाऊस आम्ही कुठेच बघितला नव्हता. पावसाचं रौद्ररूपही बघितलं, तसंच शांत, सोज्वळ रूपही कोकणातच अनुभवलं. एकदा तो बरसायला लागला की चार-पाच दिवस विश्रांती घेत नसे. पाऊस पडून गेल्यावर सगळी धरती जणू हिरवाकंच शालू नेसून बसली आहे, असंच वाटायचं. त्या हिरव्या रंगात पण वेगवेगळ्या छटा, कुठे पोपटी रंग, कुठे गडद हिरवा. कुठे शेवाळी हिरवा. भातशेती बघण्याची मजाही औरच. इवलीइवली रोपं पावसाच्या सरीबरोबर डोलत असतात. असं वाटतं, पाऊस आल्याने झालेला हर्ष ती नाचून-गाऊन दाखवत आहेत. कोकणातल्या टुमदार कौलारू घरांच्या कौलावरून पाऊस अगदी लयीत धरतीवर झेप घेतो.

पावसात समुद्रावर फिरायला जाणं एक अवर्णनीय आनंद. लाटांना उधाण येतं. पाऊस नसताना अवखळ वाटणार्‍या लाटा पाऊस आल्यावर वेगाने किनार्‍यावर आपटतात. ते दृश्य डोळ्यात किती साठवू आणि किती नाही असं होऊन जातं. दाट वनराईच्या पार्श्वभूमीवर नारळी, पोफळीची झाडं मन प्रसन्न करतात. कोकणात कितीही वेळ पाऊस पडला तरी विश्रांती घेतल्यावर तो आपल्या खाणाखुणा मागे ठेवत नाही. सगळं वातावरण कसं स्वच्छ, नितळ करून टाकतो आणि समुद्रात मिसळून जातो.

अशा या नितांतसुंदर कोकणातील, अतिशय मनोहारी असं ठिकाण म्हणजे शंकराचं देवस्थान मार्लेश्वर. उंच डोंगरमाथ्यावर हे ठिकाण आहे. चारी दिशांना मोठमोठे डोंगर, दाट हिरवी वनराई आणि आत गुहेत श्रीशंकर, भैरवनाथ यांचं स्थान. पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य वर्णनातीत आहे. चारी बाजूंना कोसळणारे दुधाळ धबधबे पाहून मन उल्हसित होते. आम्ही एकदा पावसाची मजा घेत मोठ्या धबधब्याजवळ आलो. मन भारावून गेलं होतं. पावसात मनसोक्त खेळलो.

पायर्‍या उतरल्यावर खाली हॉटेलमध्ये सगळ्यांनी गरमागरम भजी खाल्ली. पावसात, आजूबाजूचं सौंदर्य न्याहाळत ती भजी खाताना खूप मजा आली. इतका वेळ दाटून आलेलं आभाळ आता मोकळं होऊ लागलं. सूर्याची किरणं जमिनीवर येऊ लागली. कोवळ्या लालसर सोनेरी किरणांनी सगळा आसमंत देदीप्यमान झाला. मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.