आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्‍या पावसातली बाईंची सोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांना पावसाच्या डबक्यात आनंदात उड्या मारताना पाहते, तेव्हा मला माझ्या बालपणीचा एक क्षण डोळ्यासमोर उभा राहतो.

चौथीत असतानाची गोष्ट. शाळेची घंटा वाजली आणि शाळा सुटली. आम्ही सगळी लहान मुलं धावत-पळत, एकमेकांना ढकलत पायर्‍यांवरून उतरू लागलो. रिक्षामध्ये कडेला बसण्याचा एक उत्साह जो असतो तो खरंच त्याच वयात कळतो आणि हक्काने अनुभवताही तेव्हाच येतो. अंगणात आलो तर रिक्षा अजून आलेलीच नव्हती. मग काय, एका कडेला दप्तरांचा मोठा ढीग केला आणि शिवणापाणी खेळायला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणेच सगळ्यांनी मिळून माझ्यावर राज्य टाकलं.

खरं तर शिवणापाणी खेळण्याची निराळीच मज्जा असते. त्यातून मला पळायचा सगळ्यात जास्त कंटाळा. त्यामुळे राज्य नेहमी माझ्यावर. मी पण हुशार, टाइम प्लीज घ्यायचे आणि खेळ थांबवायचे. असेच आम्ही खेळत होतो. थोड्या वेळाने कंटाळा यायला लागला. मग माझ्या मैत्रिणीने तिच्या बाटलीतून माझ्यावर पाणी उडवलं. मग हा खेळ सुरू झाला.

खेळ सुरू असतानाच अचानक पाऊस सुरू झाला. ढगाने त्याच्या बाटलीतून पाणी उडवायला सुरुवात केली. सगळे इतके आनंदात भिजत होते, पण ही गोष्ट मी कधीच अनुभवली नव्हती. कारण मला राग यायचा पावसाचा. त्यानंतरचे रस्ते वगैरे खूप भयानक वाटायचे. म्हणून मी एका शेडखाली जाऊन उभी राहिले.

तितक्यात आमची रिक्षा आली. सगळ्यांनी आपापली दप्तरं घेतली आणि ते सर्व रिक्षाकडे धावले, पण मी तिथे तशीच उभी राहिले होते. घरी तर मलादेखील जायचं होतं, पण मी आणि रिक्षा यामध्ये जो पाऊस येतो तो मला नको होता. म्हणून मी तशीच थांबले.

आमच्या बाई घरी जाण्यासाठी शाळेतून बाहेर येत होत्या. मी एकटी उभी राहिलेली पाहून त्या माझ्याकडे आल्या. मला म्हणाल्या, ‘दीक्षा, काय झालं? रिक्षा आलीये, मग बाळा घरी का जात नाहीयेस?’ मी म्हटलं, ‘बाई, मला नाही जायचं.’ ते वाक्य बोलताना माझा तो निरागस चेहरा पाहून त्या वेळी त्यांना दया आली. त्या म्हणाल्या, ‘का जायचं नाहीये?’ ‘पाऊस पडतोय आणि मला पाऊस नाही आवडत. म्हणून मी इथं थांबलेय.’ त्या म्हणाल्या, ‘पाऊस का नाही आवडत?

हे बघ काका वाट बघतायत, जा लवकर आणि घरी आई-बाबा पण वाट बघत असतील ना.’ ‘नको, मला नाही जायचं.’ त्या म्हणाल्या, ‘बरं ठीक आहे, मी घेऊन जाऊ तुला रिक्षापर्यंत? मग तर येशील ना?’ मी म्हटलं, ‘हो चालेल!’
त्यांनी माझं दप्तर डाव्या हातात घेतलं आणि त्यांच्या उजव्या हाताचं मी बोट धरलं. बाई म्हणाल्या, ‘चल, घाबरू नको. मी आहे ना.’ मी पण होकारार्थी मान हलवली. मग काय, त्या प्रचंड पावसामध्ये मी पहिल्यांदा भिजत होते, तेही माझ्या बार्इंसोबत आणि त्या बालपणातला हा निष्पाप आनंद खूप भारी होता. मी त्यांचं बोट घट्ट धरलं होतं. कारण विजांच्या आवाजाने मला भीती वाटत होती. मग त्यांनी मला रिक्षात कडेला बसवलं. माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, ‘सावकाश घरी जा.’

रिक्षा सुरू झाली. अजूनही मी पावसात पहिल्यांदा भिजले, यावर माझा विश्वास बसत नव्हता. रिक्षाच्या खिडकीतून मागे वळून पाहिलं तर बाई त्यांची गाडी घेऊन आमच्या मागे येत होत्या. त्या पावसात इतक्या भिजल्या होत्या. मात्र चेहर्‍यावर सुख होतं पहिल्या पावसात भिजल्याचं. त्या वेळी मी विचार केला की, प्रत्येक जण उपभोगणार्‍या या सुखद आनंदाला मी का नको म्हणतेय? मनात खूप उत्साह निर्माण झाला आणि अलगद खिडकीतून हात बाहेर काढला... ते पावसाचे चार थेंब अनुभवले.

रिक्षा घरापाशी येऊन थांबली. मी उतरले आणि समोरच्या डबक्यात खेळणार्‍या मुलांमध्ये जाऊन रमले. आई मी अजून का आले नाही म्हणून बाहेर आली; तर मी त्या डबक्यात खेळत होते, होड्या करून सोडत होते. आज पहिल्यांदा तिला राग नव्हता मी कपडे मळकट केल्याबद्दल. उलट तिच्या चेहर्‍यावर समाधान होतं. कारण आज तिच्या मुलीनेदेखील पावसासारख्या सुंदर गोष्टीला आपलंसं केलं होतं...

आता जेव्हा जेव्हा पाऊस पडताना पाहते, तेव्हा नकळतच हात खिडकीच्या बाहेर जातो. परत एकदा भिजावंसं वाटतं. तेव्हा वाटतं की, आता या क्षणी पंचवाडकर बाई शेजारी असायला हव्या होत्या. परत एकदा भिजता आलं असतं. खरंच घरात बसून चहाचा कप हातात घेऊन पाऊस पाहण्यापेक्षा तो बाहेर जाऊन अनुभवणं वेगळंच असतं.