आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्‍मणरेषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्राच्या पत्नीनं ज्या शिस्तीचा उल्लेख केला तो मुद्दा थोडा खोलात शिरून समजून घेण्यासारखा आहे. ही स्वयंशिस्त नसून हा संस्काराचा भाग आहे. संस्कार म्हणजे केवळ वरवरचं वर्तन नव्हे. ड्रॉइंग रूममध्ये आलेल्या पाहुण्यांशी होणारं बोलणं किंवा त्यांच्याशी होणारं वर्तन हा केवळ बाह्य-उपचार असतो. त्यावरून संस्कारांचं वा शिस्तीचं मूल्यांकन करता येणार नाही.
घ रात पाऊल टाकल्यावर पादत्राणं जागेवर ठेवण्यापासून स्नानाला जाताना स्वत:चा टॉवेल स्वत: घेणे यातली सहजता ही शिस्त आहे. उठणं, बसणं, बोलणं यासारख्या नित्यकर्मात मर्यादा राखणं कशाला म्हणायचं आणि मोकळेपणा कशाला म्हणायचं हे कळणं ही शिस्त आहे. ही पायाभूत शिस्त मुलांना शिकवणं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं. वयात येऊ घातलेल्या मुलामुलींशी आईवडिलांनी चर्चा करावी, सगळ्यांनीच आपलं मत मांडावं, त्याचं समर्थनही करावं. पण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ही शिस्त हवी की मतभेद किंवा वादविवाद विसंवादाचं कारण बनता कामा नये. इथे पित्याची कुटुंबप्रमुखाची भूमिका महत्त्वाची ठरते. अशा वेळी पित्यानं आपल्या ज्येष्ठत्वाचा वापर करणं हा शिस्तीचाच भाग असतो. त्याला अहंकार किंवा रेजिमेंटेशन म्हणता येणार नाही.
कौ टुंबिक संबंधात स्वातंत्र्य असणं वेगळं आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वच्छंद वागणं हे पूर्णपणे वेगळं आहे. या दोहोतील लक्ष्मणरेषा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीनेच आखायला हवी. आपल्या ज्येष्ठतेतून आलेल्या शहाणपणाचा वापर करून त्यांनी जी रेषा आखून दिली असेल त्याचा सर्वांनी स्वीकार करायला हवा. जोवर मुलांचे स्वतंत्र परिवार आणि व्यवहार सुरू होत नाहीत तोवर या शिस्तीचाच अंमल व्हायला हवा.
जी कुटुंबं तुटलेली आहेत किंवा कुरूप ठिगळं लावल्याप्रमाणे जोडलेली आहेत, त्यात चैतन्य नसतं. सद्भावना, स्नेह-माया नसते. काही वेळा एकमेकांबद्दलची अप्रीती अशा थराला जाते की साधं व्यवहारापुरतं बोलणंसुद्धा उरत नाही. ज्या कुटुंबातील मोठ्यांनी ही शिस्त थोडं कडक वागून का होईना शिकवली नाही किंवा ज्या कुटुंबातल्या तरुण पिढीनं आईवडिलांच्या सौम्य स्वभावाचा गैरफायदा घेऊन स्वच्छंदतेलाच स्वातंत्र्य मानलं आहे, अशी कुटुंबं सामाजिक प्रदूषणात भरच घालतात.
मोठ्यांच्या अपेक्षांबद्दलही थोडं बोलायला हवं. मी मोठा आहे तेव्हा जेवणाच्या टेबलावर माझं ताट वाढून तयार असायला हवं आणि पाण्याचा पेलाही कुणीतरी तत्परतेनं भरून द्यायला हवा. अशा अपेक्षा राखणा-या वडीलधा-यांवर स्वत:च्या दुर्दैवाला दोष द्यायची पाळी आली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. स्वत:ची जी सहज करण्यासारखी कामे आहेत ती स्वत: कित्येक वर्षांत केली नसतील. तरीही अशी कामं करण्याची सवय लावून घेणं यातच भविष्यातला संभाव्य रागलोभ टाळण्याचं रहस्य दडलेलं आहे. पैशाच्या व्यवहारातही फार खोलात न शिरता स्वत:च समजून उमजून घरखर्चासाठी निश्चित अशी रक्कम देणं अगत्याचं असतं. त्यामुळे खर्च करणा-याला एक प्रकारे आश्वस्त वाटतं. ज्याच्याजवळ स्वत:ची अशी मिळकत नसेल त्यांच्याबाबतीत हा मुद्दा गैरलागू आहे.
काही वेळा ज्येष्ठ नागरिकांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. उठणं, बसणं, एकूण सगळ्याच हालचालींवर निर्बंध येतात. अशा वेळी फार कठीण प्रश्न निर्माण होतात. त्यांचा सगळा दिवस अंथरुणावर पडून राहण्यातच जातो. दुर्दैवानं त्यांना संगीत, वाचन अशा एखाद्या गोष्टीत रुची नसली तर हे पडून राहणं शिक्षेसारखं वाटतं. घरातल्या प्रत्येकाला, अगदी त्यांच्या जोडीदारालाही आपापली कामे असतात. त्यांचं हे अंथरुणाला खिळणं कायमचं झाल्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा मारायला प्रत्येकाजवळ वेळ नसतो. अशा वेळी त्यांना वाटायला लागतं की आपल्याला कुणी विचारत नाही, आपली कुणाला फिकीर नाही!
उद्योगधंद्यात असलेल्या ज्येष्ठांनी एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. नोकरदार माणसं वयाप्रमाणे निवृत्त होतात, पण व्यवसाय किंवा उद्योगधंद्यातील व्यक्ती साठीच काय, सत्तरीनंतरही आपली पकड घट्ट राखण्याचा प्रयत्न करतात. गेली अनेक वर्षं सारा कारभार त्यांच्या हातात असतो. मुलं मोठी झाली की वडिलांच्या व्यवसाय-धंद्यात सहभागी होतात. पण त्यांना स्वतंत्र निर्णयाचा अधिकार दिला जात नाही. खर्चासाठी त्यांना ठरावीक रक्कम देऊन काही ठिकाणी त्याचा हिशेबही मागितला जातो. याचा एक परिणाम असा की मुलांमध्ये आत्मविश्वास विकसित होत नाही आणि स्वत:चं आर्थिक परावलंबन त्यांना दु:सह वाटतं. यातून सुटण्यासाठी काही वेळा गुप्तपणे अनुचित मार्गही अवलंबले जातात. हे मुळीच हितावह नाही. खरं तर धंद्याचं योग्य विभागीकरण करून त्या त्या भागापुरते निर्णय घेण्याचे, खर्च करण्याचे आणि ठरावीक काळानंतर त्याचे परिणाम जाहीर करण्याचे स्वातंत्र्य मुलांना द्यायला हवे. याबाबत वडिलांचाच आग्रह असावा.
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे काही प्राधान्यक्रम असतात आणि काळाबरोबर ते बदलतातही! सत्तरी गाठलेल्या वृद्धाचे आणि तिशीतल्या तरुणाचे प्राधान्यक्रम वेगळेच नव्हे तर विरुद्ध असू शकतात.
नोकरी-धंदा, अर्थार्जन, सामाजिक प्रतिष्ठा, पत्नी आणि मुलांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे वयाच्या 30 ते 50 वर्षामधील अग्रक्रम असतात. अशा वेळी मुलांनी स्वत:चे अग्रक्रम बाजूला ठेवून ज्येष्ठांबरोबर अधिक वेळ घालवावा, गप्पा मारत बसावं अशी अपेक्षा करणं चूकच! मुळात या काळात त्यांच्यापाशी वेळ नसतो, इच्छा असली तरीही, तेव्हा आपली उपेक्षा केली जात आहे असे न मानण्यातच शहाणपण आहे.
आयुष्याची समाप्ती केव्हा हे कुणालाच ठाऊक नसतं. पण वयाची ऐंशी ओलांडल्यानंतर धंद्यात वा कामकाजात लक्ष घालणं हा काळ आणि शक्ती दोन्हीचा अपव्यय आहे. आजच्या अत्यंत गतिमान काळात पुढच्या दशकाकडे पाहण्याची तळभूमी आपल्या पायाखाली नाही, ती तरुणांच्या पायाखाली आहे. तेव्हा आता पुढचं आयोजन त्यांना करू द्या. आता वृक्ष त्यांना लावू द्या.
लक्षात असू द्या; बीज उत्तम असेल तर घनदाट, डेरेदार वृक्षाची निर्मिती होते.
अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर
dinkarmjoshi@rediffmail.com