आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामास सुरुवात कशी करावी...?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आपणास व्यायामातून कोणते ध्येय साध्य करावयाचे आहे हे ठरवणे सर्वात महत्त्वाचे ठरते. कारण प्रत्येक ध्येयानुसार व्यायामाचे नियोजन व भिन्न प्रकार ठरतात. ही विविध ध्येये म्हणजे चरबी कमी करणे, शरीराची लवचीकता वाढवणे, दैनंदिन कामातील स्फूर्ती वाढवणे, शारीरिक ताण कमी करणे असो वा वजन वाढवणे... यापैकी ध्येय ठरवून व्यायामाचे नियोजन करणे आवश्यक ठरते.
ध्येय ठरवताना आणखी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक ठरते. ती गोष्ट म्हणजे आपले ध्येय हे वास्तव व साध्य होण्याजोगे असावे. उदा. एक महिन्यात दोन किलो वजन कमी करणे, एक महिन्यात दहा किलो वजन कमी करणे. ठरवल्यास ते साध्य तर होणार नाहीच, पण त्यासाठीच्या प्रयत्नांमुळे उलट स्वत:च्या शरीरालाच हे हानिकारक ठरते. दीर्घकाळाने दुष्परिणाम संभवतात.
सर्वाधिक सोईस्कर काय आहे? : व्यायामाच्या नियोजनात दीर्घ काळासाठी चिकाटीने व्यायाम करणे होय. तो टिकवून ठेवण्याबाबतचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा व्यायामशाळेत जिममध्ये जात असाल तर तेथील सुविधा तुमच्यासाठी सर्वथा योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसे नसल्यास घरीच व्यायाम करता येईल का, त्यासाठी आपल्याकडे साधने आहेत का, सदर साधने आपणास हाताळण्याचे ज्ञान आहे का किंवा मित्रगट वा इतर जोडीदारांसोबत व्यायाम करणार आहात, त्यांचे ध्येय तुमच्या ध्येयाशी जुळते आहे का याची खातरजमा करावी. वैयक्तिक मार्गदर्शनासह व्यायामाचे नियोजन करावयाचे असल्यास आपण वैयक्तिक प्रशिक्षक (पर्सनल ट्रेनर) नेमावा. प्रशिक्षक निवडताना विशेष काळजी घ्यावी. जसे - त्याने स्वत: योग्य व संपूर्ण प्रशिक्षण घेतले आहे काय, त्याने अधिकृत संस्थेचे प्रमाणपत्र मिळवले आहे काय, त्याचे अधिकृत संस्थेचे प्रमाणपत्र वैध आहे काय, प्रशिक्षकास आहारोपचार (न्यूट्रिशियन) व व्यायामाचे संपूर्ण ज्ञान आहे काय इत्यादींची खातरजमा करणे गरजेचे आहे. योग्य माहिती व ज्ञान असणारा प्रशिक्षक तुमचे ध्येय, आवडी व गरजांनुसार तुमच्या कामाचे नियोजन करू शकतो. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व तुमच्या व्यायामाबाबत योग्य सल्ला तुम्हाला तो देऊ शकतो. त्याच्याकडून व्यायामाची विविध कौशल्ये ज्ञात होतील व तुम्हाला व्यायामाबद्दल प्रेरणा देतानाच तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हास तो मदत करेल.
वेळेचे नियोजन : अनेकांचा असा गैरसमज आहे की, व्यायाम हा विशिष्ट वेळी व विशिष्ट ठिकाणीच केला जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच व्यक्ती आपल्या व्यायामाचे नियोजन करत नाही. मात्र, असे नसून व्यायाम हा कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो. गरज आहे ती फक्त तुमच्या सोईनुसार वेळ काढण्याची. पहाटेचा व्यायाम हा तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करतो, ज्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहून स्फूर्तीने आपली कामे करू शकाल. संध्याकाळच्या व्यायामाने दिवसभरचा शीण घालवण्यास मदत होते.
व्यायामासाठी एक विशिष्ट वेळ ठरवल्यानंतर त्या वेळी नियमितपणे व्यायाम करणे व ती वेळ पाळणे आवश्यक ठरते. ही वेळ तुमच्या दैनंदिन कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग ठरवून इतर महत्त्वाच्या कार्याप्रमाणेच पूर्ण करायचेच असे ठरवावे.
वेळ काढणे अशक्य आहे, असे वाटत असले तरी व्यायामासाठी वेळ काढणे सोपे आहे. सलग वेळ काढणे बºयाचदा शक्य नसले तरी विविध कामांमधील फावल्या वेळात हलका व्यायाम करणे, घरातील करावयाचा कामांचा वेग वाढवणे. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करणे आदी. एकाच वेळी एक तासभर व्यायाम केल्याने व्यायाम होतो, असे नाही तर दहा-दहा मिनिटांचा व्यायाम दिवसातून चार-पाच वेळा केल्यासही त्याचे फायदे आपणास मिळतात, जे सलग एक तास व्यायाम केल्याने मिळतात.