आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Experience Of Nepal Earthquak Rehabilitation By Krishna Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवनिर्माण माझा ध्‍यास...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर जशा जगभरातल्या संस्था-संघटना मदतकार्याला धावून गेल्या, तसेच नेपाळशी असलेल्या ऋणानुबंधाच्या जाणिवेतून अनेक जणांनी स्वयंस्फूर्तीने या भूकंपग्रस्त देशाकडे धाव घेतली. एव्हरेस्टसह जगातली सहा शिखरं सर केलेल्या कृष्णा पाटील, या पुरस्कारप्राप्त गिर्यारोहक अशाच काही मोजक्या वीरांगनांपैकी एक. सध्या त्या नेपाळमधल्या गावांमध्ये सुरू असलेल्या पुनर्निर्माणाच्या कार्यात गुंतल्या आहेत. त्यांचे हे मनोगत…
बरोबर एक महिन्यांपूर्वीची ती घटना आहे. टीव्हीवर नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या एका पाठोपाठ एक मन विषण्ण करणा-या बातम्या दिसत होत्या. मी, माझी आई आणि मावशी अस्वस्थपणे ते सगळं बघत होतो. न राहवून एका क्षणी दोघींनी मला विचारलं, ‘व्हेन आर यू गोइंग?’ त्या क्षणानंतर मी माझी राहिले नव्हते. मला कसंही करून कमीत कमी वेळात नेपाळमध्ये पोहोचायचं होतं. इतर कुणासाठी नव्हे, माझ्या स्वत:साठी! एव्हरेस्ट, मलालू अशी शिखरं सर केल्यामुळे २००९ नंतर नेपाळशी माझं व्यक्त-अव्यक्त नातं आकारास आलं होतं. माझा सहकारी गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी मला याही वर्षी ट्रेकिंगला येण्याचा आग्रह करत होता, मात्र मी या वर्षी नेपाळला न जाण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. पण भूकंपाची घटना घडली. त्यानंतर एक क्षणही मला घरी थांबवलं नाही.

नेपाळमध्ये पाऊल ठेवल्यानंतर काय बघायला मिळेल, याची मनात धास्तीच होती; पण आश्चर्यकारकरीत्या प्रत्यक्ष काठमांडूमध्ये फारशी पडझड दिसली नाही. नाही म्हणायला, भगपूर भागातली रेस्टॉरंट, मंदिरं आणि स्तूप अशा काही इमारती कोसळलेल्या होत्या. थामेल हा काठमांडूमधला आपल्या क्रॉफर्ड मार्केटसारखा सदा गजबजलेला भाग. इथे मी यापूर्वी अनेकदा मनसोक्त भटकले आहे. तिथली गाणी-बजावणी सुरू असलेली हॉटेलं, दुकानं माझ्या परिचयाची आहेत. पण एका संध्याकाळी मी या भागातून गेले, तेव्हा नुसता शुकशुकाट होता. कोलमडलेल्या इमारती, भग्नावस्थेतली दुकानं आणि सोबतीला नेहमीच्या कोलाहलाऐवजी सर्वत्र पसरलेली भयाण शांतता या सगळ्यांतून मार्ग काढत जाणं भयाण वाटत होतं. त्या वेळी मला पहिल्यांदा जाणीव झाली होती की, सारंच काही आलबेल नाहीये. पण स्वत:ला सावरत सगळ्यात आधी भारतीय गिर्यारोहकांची माहिती मिळवणे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे, याला माझी प्रायॉरिटी होती. पहिले दोन आठवडे निश्चित माहितीच उपलब्ध नव्हती. पण मी एव्हरेस्टवर गेलेल्या गिर्यारोहकांची यादी मिळवली आणि मेजर जनरल जे. एस. संधू आणि ब्रिगेडिअर जे. गॅम्लिन यांच्या मदतीने कामाला लागले.

जसजसे दिवस सरत गेले, शहरी भागांपेक्षा खेड्यांमध्ये हानी खूप मोठी झाल्याचं माझ्या लक्षात आलं. सगळी घरं अक्षरश: जमीनदोस्त झालेली होती. जिकडे तिकडे ढिगारेच ढिगारे दिसत होते. या घटनेत तब्बल सहा हजार शाळा जमीनदोस्त झाल्या होत्या. तीन हजार शाळांची विलक्षण पडझड झाली होती. एकच गोष्ट समाधानाची होती. ती म्हणजे, शनिवारी भूकंप झाला होता. हीच घटना शुक्रवारी घडली असती, तर होणारी हानी अकल्पित असती. आमची १५ जणांची टीम होती. एका गावात गेलो. जेमतेम १५ घरांचं ते गाव. गावातले सगळे पुरुष रोजगारानिमित्त परदेशी गेलेले. गावात भूकंपाला तोंड देणा-या बाया आणि त्यांची कच्चीबच्ची. मदत म्हणून आम्ही त्यांना काही वस्तू देऊ केल्या. त्या म्हणाल्या, इथे सगळं काही आहे. आम्हाला काहीही नको, फक्त रस्ता तेवढा बनवून द्या. ते बोल मनाला खूप लागले. सगळं काही आहे, पण गावाशी प्रत्यक्ष संपर्काचा मार्गच नाही. अडीअडचणीला या बाया-बापड्यांनी करायचं काय? दुस-या एका गावात गेल्यानंतर आम्ही गावक-यांना म्हटलं, आम्ही ढिगारे उपसतो, गाडल्या गेलेल्या तुमच्या वस्तू शोधून देतो. तर म्हणाले, हात लावू नका, तुम्ही जर आताच काही केलंत, तर आंतरराष्ट्रीय मदत मिळायची नाही. माझ्यासाठी हे हिशेबी वागणं थोडंसं धक्कादायक होतं.
तसं पाहता सामान्य नेपाळी माणसं खूप कष्टाळू आहेत. प्रामाणिक आणि सौजन्यशील आहेत, पण या देशाला सतत विविध आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांची आरोग्य-शिक्षण-रोजगार-पर्यटन अशा स्वरूपाची मदत मिळत आली असल्याने त्यांचे म्हणून काही आडाखे तयार झाले आहेत. एरवी, नेपाळची खेडी भारतातल्या खेड्यांपेक्षा खूपच पुढारलेली आहेत. टापटीपपणा हा इथल्या जीवनशैलीचा भाग आहे. इथल्या शाळेत जाणा-या मुलांचे युनिफॉर्म अत्यंत व्यवस्थित असतात. मोज्यांची लांबीदेखील एकसारखी असते. मुलींनी व्यवस्थित वेण्या घातलेल्या असतात. अस्वच्छ, गबाळग्रंथी मुलं नेपाळमधल्या खेड्यात शक्यतो बघायला मिळत नाहीत. आश्चर्य म्हणजे, हे चित्र भूकंपानंतरही कायम होतं.

भूकंपानंतर अन्नधान्य, कपडे औषधे आदी जीवनाश्यक वस्तूंचा नेपाळमध्ये ओघ वाढला. ते स्वाभाविकही होतं म्हणा. पण मला विचाराल, तर नेपाळला या क्षणी सर्वाधिक गरज आहे ती, रोजगाराच्या संधींची. गावखेड्यांतल्या बाया-माणसांच्या हातांना काम मिळण्याची. हीच गरज ओळखून आम्ही कमीत कमी किमतीत सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करणा-या अरुणाचलम मुरुगनांथम यांच्या मदतीने नॅपकिन निर्मिती यंत्र बसवण्याच्या प्रयत्नांत आहोत. हा रोजगाराचा मोठा स्रोत आहेच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा घटक आहे. अरुणाचलम हे भारतातले आघाडीचे ‘सोशल आंत्रप्रेन्योर’ आहेत. आज अशाच सहृदयी माणसांची नेपाळला अधिक गरज आहे. आणि मीसुद्धा अशाच लोकांच्या प्रतीक्षेत आहे. रोजगाराच्या जोडीने नेपाळला भेडसावणारी दुसरी मोठी समस्या आहे, मानवी तस्करीची. भूकंपाची घटना तस्करीला धग देणारी आहे. पण मी मनेका थापा यांच्या स्वयंसेवी संस्थेसोबत तस्करी रोखण्यासंदर्भात काम करते आहे. इथेसुद्धा तस्करीपासून रोखलेल्या महिलांना रोजगार देण्याची गरज आहे. त्यासाठी मला वाटतं, कुटिरोद्योग पुरवणं हाच व्यवहार्य मार्ग असणार आहे.

टिकाऊ आणि स्वस्त घरं ही यापुढची नेपाळची पहिली मोठी गरज असणार आहे. या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर काम होतंच आहे, पण मी स्वत: यात योगदान द्यायचं ठरवलंय. ‘हिमालयन क्लायमेट इनिशिएटिव्ह’च्या मदतीने प्लास्टिक बाटल्यांपासून घरं बनवण्याच्या कामी, मी स्वत: रस घेत आहे. सध्या काठमांडू इथे एक ‘डेमो’ घर बनवणं सुरू आहे. साधारणपणे एक टन बाटल्यांपासून सहा नेपाळी पद्धतीची घरं उभारता येतात. एका घरासाठी साधारण आठ हजार बाटल्यांची गरज भासते. नेपाळमध्ये दरवर्षी जगभरातून पर्यटक-गिर्यारोहक येत-जात असतात. प्लास्टिकच्या बाटल्यांचा इथे खच पडत असतो; जो पर्यावरणाच्या दृष्टिने घातक आहे, परंतु त्याचा विधायक वापर करायचं आम्ही ठरवलंय. नेपाळ टीव्हीमध्ये काम करणारा माझा एक मित्र यावर एक फिल्म बनवतोय. हेतू हा आहे की, भविष्यात ज्यांना कुणाला अशी ‘इको फ्रेंडली’ घरं बनवायची असतील, त्यांना या संदर्भात विनामूल्य मार्गदर्शन मिळावं.

एकूणच नवनिर्माण हा या क्षणी माझा ध्यास झाला आहे. असं नाही की, सेवा शुश्रूषा मला जमत नाही; पण अगदी खरं सांगायचं, तर मी मदतकार्यापेक्षा नवीन काही करण्यात अधिक रमणारी आहे. गेले महिनाभर माझे अनेक मित्र ढिगा-याखालून मृतदेह काढण्याच्या कामी गुंतले होते. जखमींना उपचारासाठी मोलाची मदत करत होते. त्यांचं मला कौतुकच आहे. मी मात्र वेगळा मार्ग अनुसरला आहे. मला मुलांमध्ये रमायला आवडतं. त्यामुळे जेव्हा खेड्यांत जाते, नेपाळी मुलांचे निरागस चेहरे बघितले की माझं मन सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. ही मुलंच मला सकारात्मक जगण्याचं प्रतीक भासतात. त्यांच्याचमुळे नेपाळ पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहील, याची मला पुरेपूर खात्री पटते. शेवटी, जेवढा आनंद मला शिखरं सर करताना मिळतो, तितकेच आंतरिक समाधान नेपाळच्या नवनिर्माणात योगदान देताना मिळत आहे.

https://www.facebook.com/krushnaa.patil