आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परसबागेचा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणापासून मला बागेची आवड. अंगणात असलेला पारिजात, त्याच्या केशरी दांड्याच्या नाजूक फुलांचा सडा सभोवार पडायचा. नंतर ती वेचणे. जाई, जुईंचे गजरे करणे, पेरूच्या झाडावर चढून हिरवटसर गाभुळे पेरू खाणे. खरं तर त्याची हिरवाईच फार आवडायची. लग्नानंतर आमच्या घराच्या परसदारी माझी आवडती निवडक रोपे लावली. त्यामध्ये कढीलिंब, कागदी लिंबू, कोरफड, पुदिना, शेवगा यांसारखी नेहमी स्वयंपाकघरात लागणारी व उपयुक्त झाडे लावली. देवासाठी घरची फुले म्हणून सदाफुली, गुलाब, तगर, अशी कायम फुलणारी झाडे लावली. त्याबरोबर तुळस होतीच. परसात दृष्टी टाकल्यास मन मोहरून जाई.

याबरोबरच सेंद्रिय खताचा वापर करू लागले. दोन खड्डे तयार केले. एकामध्ये रोजचा ओला कचरा. त्याबरोबर परसातील थोडी माती, गांडूळ खत, शेणकुट व पाण्याचा शिडकावा याप्रमाणे थर चालू केले. खड्डा भरल्यानंतर बंद करून, दुसरा खड्डा भरणे चालू केले. पहिला खड्डा झाकून टाकला. ३ महिन्यानंतर पहिल्या खड्ड्यात मातीसारखे बारीक, स्वच्छ खत तयार झाले. हे खत व गोमूत्राची शिंपण यामुळे झाडे भरघोस वाढू लागली. माझी परसबाग मैत्रिणींनाही आवडू लागली. पावसाळ्यात दुधी, दोडकी, घोसाळे यांचे वेल चढवले. माझ्या मैत्रिणी व मंडळात सेंद्रिय खताचे महत्त्व पटवून दिले. बऱ्याच मैत्रिणींनी अशा सेंद्रिय खताची सुरुवात केली. असे स्वस्त आणि मस्त खत स्वत: तयार करून परसबाग फुलविणे, हा आनंद होता.

ब्रह्मकमळांची आठवण
स्मिता माहेश्वरी, नाशिक

गेल्या दहा वर्षांपासून चालू केलेल्या माझ्या या कामामुळे सुंदर फुललेली माझी परसबाग मला खूपच आनंद देत आहे. आमच्या फ्लॅटला एक छोटी टेरेस असल्याने आम्ही त्यात काही कुंड्या सजविलेल्या आहेत. त्यात तुळस, सुपारी, अळूची पाने, गवती चहा, कढीपत्ता व वर्षभर हिरवी राहणारी काही झाडं आहेत. एका झाडाला दोन-तीन वर्षांपूर्वी फक्त पानं फुटली. घरातील मंडळींना ते बघून जरा नवलच वाटले की, हे असं काय झाड हिने लावले आहे? त्याला ना फूल ना काही. पण जून-जुलैत पाऊस पडला न् काय आश्चर्य! त्या पानांवर एक-एक करून कळ्या यायला लागल्या. हा अनुभव पहिलाच असल्याने आम्ही सर्वच जण रोज त्या कळ्यांना बघायचो. अन्् बघता बघता त्या कुंडीत अठरा कळ्या लागल्या. त्यातल्या तीन कळ्या आषाढी एकादशीला संध्याकाळी उमलल्या. पानावर कळी लागते, ती इतकी मोठी होते, रात्री उमलते, दिसायला अतिशय सुंदर फूल आणि सुगंध तर अप्रतिमच. असं हे ब्रह्मकमळ बघून आम्ही सर्वच भारावून गेलो. नंतर परत अकरा कळ्या गुरुपौर्णिमेला उमलल्या. त्या दिवशी तर संपूर्ण घरात त्या फुलांचा सुगंध दरवळला. एकदम अकरा फुलं आल्याने आम्ही खूप फोटो काढले. खास दिवशी ही खास ब्रह्मकमळे आल्याने आमची सर्वांचीच आठवणीतली अन् आवडीची झाली.

डिस्टेंपरच्या बादल्यांमधली झाडं
धालवाणी विमल, नाशिक
प्रथम दिव्य मराठीचे सर्व सदरांसाठी अभिनंदन! माझ्या परसबागेची सुरुवात मजेशीर आहे. वर्षासाठी आणलेली मिरची निवडल्यावर बऱ्याच बिया उरलेल्या होत्या, त्या लावून पाहाव्यात, म्हणून परसबाग सुरू झाली. वर्षभर टवटवीत, हिरव्या मिरच्या मिळाल्या, सर्वांना सोसायटीत वाटल्या! त्यानंतर अनेक रोपं लावलीत. यंदा मात्र सेंद्रिय खत तयार करते आहे, सर्व भाज्या व फळांच्या साली इ. बारीक कापून त्यात लाकडाचा भुसा, राख, पालापाचोळा टाकून छान खत तयार झाले आहे. आता वाट पाहते पावसाची. त्याचप्रमाणे अमेरिकेतून लवेंडर, लेट्यूसच्या बिया व खतेही आणली आहेत. कुंड्या फार महाग व फूटतूटही फार म्हणून सुमंतरावांनी डिस्टेंपरच्या बादल्या वापरायचा सल्ला दिला. स्वस्त व टिकाऊ, दिसायला चांगल्या! परसबाग जोपासणाऱ्यांना टीप- डिस्टेंपरच्या बादल्या आणा, सेंद्रिय खत तयार करा व परसबागेचा आनंद घ्या.
बातम्या आणखी आहेत...