आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Experience Sharing By Senior Drama Artist Dinu Pednekar

असा रंगलो नाट्यरंगी...(नाट्यदिनू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीस वर्षांहून अधिक काळ मराठी नाट्यव्यवसायात वावरत असलेले प्रयोगशील व धाडसी मराठी नाट्यनिर्माते दिनू पेडणेकर आपल्या नानाविध अनुभवांची लड या पाक्षिक सदरातून उलगडणार आहेत...
माझे बाबा उत्तम पेडणेकर नोकरीसाठी कोकणातून मुंबईला आले. पोस्टातली नोकरी सांभाळून नाट्यगृहात पार्टटाइम डोअरकिपरचं काम करता करता तिकीट विक्री व्यवस्थापनाचं काम करू लागले. पुढे ते नाट्यनिर्मातेही झाले, पण तिकीट विक्री व्यवस्थापनाचं काम मात्र त्यांनी कधीच सोडलं नाही. (बाबांना व्यवसायात मामा पेडणेकर या नावाने सारे जण ओळखतात.) त्यामुळेच नाट्यव्यवसायातला माझा प्रवेश विनासायास झाला, असं म्हणावं लागेल. बाबांनी शून्यातून उभ्या केलेल्या या व्यवसायात मी आणखी थोडी मेहनत घेतली आणि व्यवसाय पुढे नेत कारकिर्दीच्या या टप्प्यापर्यंत पोहोचलो.

बारावी नापास झाल्यानंतर पुढे शिक्षणातला रस संपल्यामुळे आता काय करायचं, हा प्रश्न बाबांच्या प्रिंटिंग प्रेसमुळे सुटला. या प्रेसमधे फक्त नाटकाचीच तिकिटे छापली जात. रीतसर कंपोझिंगचं शिक्षण घेऊन प्रेसवर जाऊ लागलो. सहा वाजता प्रेस बंद झाला की, वेळ घालवायला मुंबईतील दादर विभागातल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात जाऊ लागलो. त्या काळी बाबांकडे गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, नाट्यसंपदा, कलारंग, रंगयात्री, ओमनाट्यगंधा या आणि अशा इतर अनेक नाटक कंपन्यांचं बुकिंग कॉन्ट्रॅक्ट होतं. त्याकरता दोन जण पगारी कामावर ठेवले होते. भाऊ परमानंद त्या काळी फक्त करंट बुकिंग करत असे. मला बुकिंगला बसायला खूप आवडायचं. कधी कधी मी नाटकालाही जाऊन बसायचो. त्या काळी वसंत कानेटकर, जयवंत दळवी, मधुसूदन कालेलकर, रत्नाकर मतकरी यांची उत्तमोत्तम नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर जोरदार व्यवसाय करत होती. एक दिवस बुकिंगला ठेवलेल्या एकाने आजारपणामुळे येऊ शकत नसल्याचं कळवलं. आयत्या वेळी दुसरा माणूस कोण शोधायचा, या विवंचनेत बाबा पडले असताना मी जाईन बुकिंगला, असं मी त्यांना सांगितलं आणि त्या दिवसापासून मी दादरला शिवाजी मंदिर नाट्यगृहात रोज बुकिंगला जाऊ लागलो.

बुकिंगच्या सुरुवातीच्या काळात माझी खूप तारांबळ उडायची. कारण एका काऊंटरचे तीन प्लॅन एकच माणूस सांभाळत असे. जवळपास सर्वच नाटकं उत्तम व्यवसाय करत असल्यामुळे तिकीट काढण्यासाठी एकाच वेळी खूप गर्दी होत असे. मग एखाद्या व्यक्तीला तिकिटाचे शिल्लक पैसे परत देताना, माझा हिशोब चुकल्यामुळे जास्त पैसे जात असत. बुकिंग बंद झाल्यावर हिशोब काढल्यानंतर ही गोष्ट लक्षात येत असे. मग हे शॉर्ट आलेले पैसे बाबा स्वत:च्या खिशातून भरत असत. व्यवसायात माझ्या प्रामाणिकपणाचं उदाहरण दिलं जातं, पण हा प्रामाणिकपणा अंगी येण्याकरता सुरुवातीच्या काळातील एक घटना घडावी लागली. त्याचं झालं असं, तिकीट घेण्याकरता झालेल्या गर्दीच्या वेळी एक बाई तिकिटाचे उरलेले पैसे घ्यायला विसरली. मी त्यांना आवाज दिला, पण त्यांनी तो ऐकला नसावा बहुतेक. प्रयोगाच्या दिवशी परत देऊ, असं ठरवलं. पण क्षणिक मोहात पडून मी त्या बाईला पैसे परत दिलेच नाहीत. पुढचे आठ दिवस त्या पैशांच्या विचाराने झोप उडाली. दिवसरात्र तोच विचार. शेवटी एक दिवस देवळात गेलो आणि दानपेटीमध्ये ते पैसे टाकले आणि तिथेच आयुष्यात पुन्हा असं कधीही करणार नाही, अशी शपथ घेतली. चंद्रलेखाचे मोहन वाघ यांनी बाबांबरोबर पार्टनरशिपमध्ये मृत्यंुजय, पंखांना ओढ पावलांची, छावा, नटसम्राट, राजसंन्यास या नाटकांची निर्मिती केली होती.

मी बुकिंगला बसायला लागलो, तेव्हा त्यांनी ‘मामांचं नाव राख’ असं सांगितल्याचं मला आजही आठवतंय. नाट्यनिर्माते मोहन वाघ फक्त प्रयोगाच्या वेळेसच शिवाजी मंदिरला येत असत. एकदा त्यांच्या ‘प्रेमाच्या गावा जावे’ या नाटकाच्या हाऊसफुल प्रयोगाला निमंत्रित लोकांची संख्या वाढल्यामुळे कंपनीच्या राखीव जागा कमी पडू लागल्या. त्यांनी माझ्याकडे डबल नंबरसाठी राखून ठेवलेल्या आसन क्रमांकांची चौकशी केली. (बुकिंग क्लार्कने चुकून एकच आसन क्रमांक दोघांना दिल्यास त्यापैकी एकाला पुढे बसवावं लागे. याकरता प्रत्येक नाटकाच्या प्लॅनवर दहा जागा राखीव ठेवण्याची पद्धत आहे.) मी त्यांना माझे मित्र आलेत, त्यांना जागा दिल्यात आणि आता काहीच शिल्लक नाहीत, असं सांगताच कोणाला विचारून दिल्या, असे वाघ विचारू लागले. ‘या जागा डबल नंबरसाठी राखीव आहेत, त्या देताना तुम्हाला का विचारायचं?’ असं मी म्हणताच ते खूप चिडून, ‘कोणाशी बोलतो आहेस माहीत आहे का?’, असं बोलताच मीही जोरातचं ‘हो’ असं म्हणालो. त्यावर ते आणखी चिडून मामांकडे तुझी तक्रार करतो, असं म्हणाले. मीही शांतपणे ‘करा’ असं म्हणून खुर्चीत बसलो.

मोहन वाघांनी बाबांना फोन करून घडलेली घटना सांगितली. दुपारी जेवायला घरी गेल्यावर बाबांनी याबद्दल मला विचारल्यावर मीही माझी बाजू मांडली. बाबा शांतपणे म्हणाले, ‘अरे ते मोठे निर्माते आहेत. त्यांच्याशी अशा रीतीने बोलू नये.’ मी ताडकन उत्तर दिलं, ‘त्यांनाही यापुढे माझ्याशी या पद्धतीने बोलू नका, हे सांगा.’ माझा स्वभाव पूर्णपणे माहीत असल्यामुळे बाबांनी मोहन वाघांना फोन करून बुकिंगबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा, दिनूशी काही बोलू नका, असं सांगितलं. नंतरच्या एका अशाच हाऊसफुल प्रयोगाला निमंत्रित लोक वाढल्यावर मोहन वाघ डबल नंबरच्या जागा शिल्लक आहेत का, असं विचारायला आल्यावर हो आहेत, असं म्हणून मीही सर्व नंबर त्यांना वापरायला दिले. पुढे काही दिवसांनी त्यांचा एकदम खास माणूस झालो आणि त्यांना इतरांप्रमाणे ‘मोहनशेठ’ अशी हाक मारू लागलो. नाट्यव्यवसायात मी जसा रुळत गेलो, तसतशी अशी अनेक चांगली माणसे जोडण्याची संधी मिळाली. अनुभवांचे मोठे विश्व माझ्यासाठी खुले झाले होते...

dinupednekar1963@gmail.com