आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल- अनपेक्षित प्रेमकथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परग्रहवासीयांची व्यूहयोजना, अवकाशयानाच्या फोर्सफिल्डमुळे संभवणारे बदल, बंडखोरांच्या युद्ध पुकारण्याच्या विविध योजना, बॉडी स्नॉचर्स या लोकप्रिय चित्रपट संकल्पनेप्रमाणे परग्रहवासीयांनी केलेली संभाव्य वेषांतरे असे अशा चित्रपटातले अनेक मुद्दे एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअलच्या कथेत बेमालूमपणे समाविष्ट झाले आहेत. इतक्या बेमालूमपणे की, आपल्याला परग्रहवासीयांचे अस्तित्व खरोखर जाणवायला लागावे.
काही विषय हे खासच मोठे बजेट आणि नेत्रदीपक निर्मिती गृहीत धरणारे असतात. सायन्स फिक्शन आणि फँटसी चित्रपटांचा क्रमांक अशा चित्रपटांच्या यादीत खूपच वरचा लागावा. या चित्रपटांच्या आशयाच्या व्याख्येतच काही अपरिचित, एरवी पाहायला न मिळणारे काही अभिप्रेत असल्याने अशा चित्रपटांचा प्रेक्षकही त्या तयारीने चित्रपटांना येतो. अशा चित्रपटांच्या मूळ स्वरूपाशी खेळणे, ते बदलून टाकणे, हे एक आव्हानच असते. अपेक्षित गोष्ट पाहायला न मिळाल्याने गोंधळलेल्या प्रेक्षकाला जर दिग्दर्शक वेळीच आपल्या कथानकात गुंतवू शकला, तर हे चित्रपट वाचण्याचा संभव असतो. हे आव्हान पेलणे सोपे नसल्याने दरेक दिग्दर्शक ते पेलू शकत नाही. आपल्या आशयाच्या दर्जावर आणि कथनकौशल्यावर पूर्ण विश्वास असलेले मोजके दिग्दर्शकच हे करू पाहतात. कालांतराने या दिग्दर्शकांच्या कामाची प्रेक्षकांनाही सवय होते आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोनही थोडा उदार होतो. एम नाइट श्यामलन (सिक्स्थ सेन्स, साइन्स, अनब्रेकेबल), स्पाइक जोन्ज (बीइन्ग जॉन मालकोविच, अ‍ॅडॅप्टेशन), एडगर राइट ( शॉन ऑफ द डेड, हॉट फझ) ही अशा सांकेतिक बिग बजेट चित्रप्रकारातून वेगळा, अनपेक्षित चित्रपट घडवणा दिग्दर्शकांची काही उदाहरणे. मात्र, त्यातही आपल्या मिनिमलिझममुळे खासच वेगळे वाटणारे उदाहरण हे श्यामलनचे.
सध्याच्या हॉलीवूडच्या अन् काही अंशी सार्वत्रिक पसरलेल्या ‘मोअर इज मोअर’ हे मानणा परिभाषेत, मिनिमलिझम हा कमी प्रमाणात आढळतो. दृश्य संकल्पनांपासून भावदर्शनापर्यंत दरेक गोष्टींच्या पडद्यावर होणा अतिरेकाची आपल्याला सवय झालीय. यापेक्षा काही वेगळे, नवे पाहायला मिळणे हे दुर्मिळ आहे आणि म्हणूनच खास वाटणारे. श्यामलनच्या जातकुळीचे, म्हणजे लोकप्रिय फँटसी चित्रप्रकारांना मिनिमलिस्ट शैलीत आणून सादर करणारे एक नवीन नाव हल्ली पुढे येताना दिसतेय; ते म्हणजे नाचो विगालोन्दो या स्पॅनिश दिग्दर्शकाचे. काही वर्षांपूर्वी मोजकी स्थळे आणि पात्रे यांना अतिशय चतुराईने कालप्रवासाच्या भुलभुलैयात अडकवणारा ‘टाइमक्राइम्स’ हा त्याच्या स्वस्त आणि मस्त शैलीचा पहिला नमुना होता. ‘एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल’ हा गेल्या वर्षीचा चित्रपट दुसरा. शैलीत तुलना होऊ शकली तरी श्यामलन आणि विगालोन्दो यांच्या शैलीत एक महत्त्वाचा फरक आहे. श्यामलनच्या चित्रपटांचा सूर हा अतिशय गंभीर, आशयगर्भ; परंतु शेवटावर मदार ठेवणारा असतो, तर विगालोन्दोचा चित्रपट आशयात तुलनेने सामान्य, मात्र गुंतागुंतीची रचना मांडतानाही सतत करमणूक करताना दिसतो. या स्पॅनिश चित्रपटाला कोणत्या चित्रप्रकाराला आपले लक्ष्य बनवायचेय, हे नावातच स्पष्ट होणारे आहे. परग्रहवासीयांचा पृथ्वीवरला हल्ला दाखवणारा हा चित्रपट असावा असे हे नाव आणि चित्रपटाची जाहिरात, हे दोघेही सुचवतात आणि त्या सुचवण्याला जागून इथे एक भलेथोरले अवकाशयानदेखील लवकरच पाहायला मिळते. मात्र, त्या पलीकडे जाऊन..., पण नको. सध्या आपण या यानात न शिरलेलेच बरे. एवढेच म्हणेन, की इथले परग्रहवासीयांचे आगमन हे प्रत्यक्ष घटना घडवण्यापेक्षा त्या विशिष्ट पद्धतीने घडाव्यात यासाठी पार्श्वभूमी तयार करणारे आहे. ते प्रमुख कथानकाचा भाग नाही, तर सेट अपचा एक भाग ठरणारे आहे. मग प्रमुख कथानक काय आहे? तर ते आहे फार्स आणि रोमँटिक कॉमेडी यांच्या मधले काहीतरी. परग्रहवासीयांच्या आगमनामुळे रिकाम्या करण्यात आलेल्या निर्मनुष्य शहरात (त्यातही बराच काळ त्यातल्या एका इमारतीत) घडणारे.
चित्रपटाचा नायक हुलिओ (हुलिआन विलाग्रान) एके सकाळी जागा होतो तो एका परक्या घरात. त्याला बहुधा रात्री काय झाले हे फारसे आठवत नसावे. तरुण घरमालकीण हुलिआदेखील (मिशेल जेनर) त्याला पाहून थोडी हैराण, बरीचशी काळजीत. रात्री दोघांमधे नक्की काय घडले असावे याबाबत कोणीच फार तपशिलात जाऊ इच्छित नाही. मात्र, तो आपल्या घरी जायला निघण्याआधी त्यांच्या लक्षात येते की, ते झोपेत असताना बाहेर काहीतरी वेगळे घडलेय. रस्ते निर्मनुष्य आहेत, फोन बंद आणि टीव्हीलाही सिग्नल नाही. मग त्यांना दिसते ते शहरावर तरंगणारे भले थोरले अवकाशयान. हुलिआचा चोंबडा आणि तिच्या प्रेमात असलेला शेजारी एंजल (कार्लोस आरेसिस) त्यांना जुजबी माहिती पुरवतो. लवकरच हुलिआचा चालू (म्हणजे सध्याचा या अर्थी) बॉयफ्रेंडदेखील येऊन टपकतो आणि गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होतात. विगालोन्दो इथेही टाइमक्राइम्सप्रमाणे एक विशिष्ट परिस्थिती तयार करतो आणि त्या परिस्थितीत आपल्याकडे असलेल्या पात्रांना हाताशी धरून काय काय करता येईल, असा एक्सरसाइज असल्याप्रमाणे पटकथेकडे पाहतो. या पात्रांना बाहेरचा एक संदर्भ देण्यासाठी तो टीव्हीवरून बंडखोरी करणारे एक पात्र (मिगेल नुगेरा) तयार करतो, जे समोरचा कॅमेरा बंंद आहे असे समजून नाही नाही ते बोलून दाखवते. सरळ विनोदी म्हणण्याजोगे हे एकच पात्र इथे आहे, मात्र तरीही संपूर्ण चित्रपट विनोदाच्या अंगाने गेला आहे. परिस्थितीने तयार होणारी ही अ‍ॅब्सर्डिटी आहे आणि एरवी पडद्यावरले विज्ञानपट ज्या लार्जर दॅन लाइफ सिच्युएशन्स पटापट स्वीकारून त्यावर उपाययोजना करताना दाखवतात, त्या किती अवास्तववादी आहेत, हे दाखवणारा हा टोलादेखील आहे. टाइमक्राइम्स ज्याप्रमाणे कालप्रवासाच्या संकल्पनेला थेट हात घालतो, तसा एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल परग्रहवासीयांच्या हल्ल्याला घालत नाही. मात्र, एलिअन इन्वेजनशी संबंधित अनेक लोकप्रिय संकेतांना मात्र तो इथे वापरताना दिसतो. अशा हल्ल्यात अपेक्षित असणारी परग्रहवासीयांची व्यूहयोजना, अवकाशयानाच्या फोर्सफिल्डमुळे संभवणारे बदल, बंडखोरांच्या युद्ध पुकारण्याच्या विविध योजना, बॉडी स्नॉचर्स या लोकप्रिय चित्रपट संकल्पनेप्रमाणे परग्रहवासीयांनी केलेली संभाव्य वेषांतरे असे अशा चित्रपटातले अनेक मुद्दे तो कथेत बेमालूमपणे समाविष्ट करतो. इतक्या बेमालूमपणे की, आपल्याला परग्रहवासीयांचे अस्तित्व खरोखर जाणवायला लागावे.
पण हा सारा सायन्स फिक्शनचा बाज उतरवल्यावर लक्षात येईल की, अंतिमत: ही एक प्रेमकथा आहे. अचानक गाठ पडलेल्या तरुण-तरुणींची, ज्यांना आपले एकमेकांवर खरे प्रेम आहे की नाही हे जाणून घ्यायलाही पुरेसा वेळ झालेला नाही. त्यांचे एकमेकांकडे आकर्षित होणे, दूर जाणे, पुन्हा जवळ येणे, आपल्या नात्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे, हे या चित्रपटाचे मूळ आहे आणि हे नाते आपल्यापर्यंत किती प्रमाणात पोहोचते यावर हा चित्रपट आपल्यापर्यंत किती प्रमाणात पोचतो, हे अवलंबून असेल. विगालोन्दोचा हा चित्रपट प्लॉटिंगमध्ये टाइमक्राइम्सहून कमी वाटला तरी अर्थाच्या दृष्टीने अधिक पटणारा आणि सर्वांना पाहण्याजोगा झाला आहे. अर्थात, सायन्स फिक्शन पाहायला मिळेल ही अपेक्षा बाजूला ठेवणे आवश्यक.