आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extract From Yashoda Padgaonkar's Book, Madhurima Divya Marathi

कुणास्तव कुणीतरी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिया राधन चालू असताना स्त्री ही केवळ एक प्रेयसी असते. त्या वेळी तिच्याकडून फारशा अपेक्षा केल्या जात नाहीत. उलट तिला खूश ठेवण्यासाठी प्रेम आणि सहानुभूती यांचा वर्षाव केला जातो. ज्या दिवशी ती कायदेशीर लग्न होऊन घरात येते, त्या एका क्षणात ती प्रेयसीची पत्नी होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून तिच्यावर हक्क सांगितला जातो. त्या घरात चौकटीत बसेल असं तिचं वागणं असावं लागतं. सर्वांचं समाधान होईल, सर्वांचा अादर राखला जाईल, नवऱ्याला सतत खूश ठेवलं जाईल, आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्ट त्याच्या संमतीनं केली जाईल, अशी मोठी अपेक्षा केली जाते. तसं न घडल्यास तिला समजावणी दिली जाते. हा एका रात्रीत झालेला बदल पेलवणं मनाला फार भारी पडतं. विशेषत: तो जर आंतरधर्मीय विवाह असेल तर फारच मन मारून राहावं लागतं. आणि वाटतं अरे, आपण आपलं सगळंच स्वातंत्र्य घालवून बसलो आहोत. पूर्वीच्या अशिक्षित स्त्रियांची तुलना पन्नास वर्षांपूर्वी पदवीधर झालेल्या स्त्रीशी कशी करता येईल? शिकलेल्या मुलींना आपल्या शिक्षणाची, कर्तृत्वाची आणि स्वातंत्र्याची पूर्ण कल्पना आलेली होती. अशा वेळी गमावलेल्या स्वातंत्र्याचं दु:ख जन्मभराचंच दु:ख होऊन बसतं. उलट बायको शिकलेली आहे म्हणून, घरातली सर्व पडतील ती कामं करून (नोकरी सोडून) बाहेरची सर्व कामं तिच्यावर टाकून नवरा पूर्णपणे स्वत:ला मोकळा करून घेऊ शकतो.

संसार दोघांचा आहे, हे विसरून चार पैसे खर्चायला दिले की आपलं कर्तव्य संपलं, असं अजून कितीतरी पुरुषांना वाटतं. घराबाहेर पडून केलेल्या नोकरीची पैशांच्या रूपानं किंमत मिळते. पण घरात राहून रात्रंदिवस मरमर केलेल्या कामाची, कमी पैशात सर्व कुटुंबाला पोटभर जेवू घालताना केलेल्या कष्टाची व मानसिक ओढाताणीची किंमत तर मिळत नाहीच. पण अवहेलना पदरात पडते. कारण ते काम कमी प्रतिष्ठेचं समजलं जातं. हा केवढा मोठा अन्याय समाजानं स्त्रीवर केलेला आहे.

त्याच्या कवितेत, गाण्यात, कुठं सूचक जरी माझा उल्लेख अाला तर तेव्हा मला आनंद वाटायचा. पण लगेच निसर्गातला दृष्टांत पुढे आला की मी त्याला म्हणायची, ‘लगेच निसर्गाकडं का जातोस? फक्त माझ्यावरच पूर्ण कविता लिही ना.’ तो म्हणायचा, ‘मला तसं करता येणार नाही. हीच माझी स्टाईल आहे.’ मला खूप वाईट वाटायचं. गाण्याच्या बाबतीतही तसंच झालं. असा बेभान हा वारा, कशी येऊ, कशी येऊ? किंवा जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रिती... वगैरे किती तरी गाणी कशी तयार झाली, हे फक्त मलाच ठाऊक आहे. अशा वेळी आनंदाचे, तृप्तीचे पुष्कळ प्रसंग येत असत. तेव्हा त्यानं लिहिलेली प्रत्येक कविता असो, गाणं असो, तो मलाच वाचून दाखवत असे. माझं मत विचारत असे आणि मगच फेअर करत असे. असं खूप वर्षं चालू होतं. पुढं पुढं संसार वाढला. अडचणी, पैशांची तंगी मनाला खच्ची करायला लागली. काळजीनं मन अस्वस्थ होऊ लागलं. त्यामुळं शरीराच्या विशेषत: पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या. घरातून लक्ष उडून कविता जास्त सामाजिक, राजकीय, उपरोधिक किंवा विनोदी अशा होऊ लागल्या.

तेव्हा मात्र मी गडबडले. आणि नकळत आम्हा दोघांची दोन वेगवेगळी विश्वं होताहेत, हे माझ्या लक्षात येऊ लागलं. मी कसल्यातरी काळजीत आहे. शरीरात वेदना होत आहेत. हातानं काम करत आहे. अशा वेळी तो कविता वाचून दाखवायला आला की माझा मूड सोडून मी त्याच्या मूडमध्ये जाऊ शकत नव्हते. माझ्या मनात द्वंद्व चालू होई. हा जे काही लिहितोय ते माझ्या काळज्यांशी, माझ्या स्वास्थ्याशी, माझ्या मुलांच्या गरजांशी सुसंगत नाही. त्या माझी आर्थिक गरज भागवू शकत नाहीत. मला म्हणजे माझ्या संसाराला त्यातून काहीच मिळत नाही. मला गरज आहे अधिक सहवासाची, अधिक संभाषणाची, थोड्या अधिक पैशांची, प्रेमाची, थोड्या सहानुभूतीची आणि थोड्या आपलेपणाची. कवितेतल्या काल्पनिक गोष्टी माझा संसार सोपा करणार नव्हत्या. त्यात मन रमेनासं झालं. रसिकांना हे मान्य होईलच असं नाही. किंबहुना होणारही नाही-कलावंताची कला दैनंदिन व्यावहारिक गोष्टीतून व्यक्त होत नाही. ती अभिव्यक्त होत असते त्याच्या मनात चाललेल्या आंदोलनांतून, तो आपली निर्मिती करत असताना त्याचं मन वेगळ्याच जगात जाऊन पोहोचलेलं असतं, हे मी अर्थात जाणू शकते.
पण एवढ्या जाणिवेनं माझी व्यक्तिगत सोडवणूक होऊ शकत नाही.

अशा वेळी मी मंगेशला म्हणत असे, ‘थांब जरा. मग ऐकते कविता.’ त्याचा त्याला राग येई. त्याच्या आवेगाला तेव्हाच वाट मोकळी व्हायला हवी असे. त्याच सुमारास श्री. पु. भागवत सायनला राहायला आले. त्यांची मैत्री होतीच-ती वाढत गेली. आणि अलिप्तपणं कविता ऐकण्याचं काम श्री. पु. भागवत करू लागले. त्याच्या कवितांवर त्यांची अनुभवी, मार्मिक प्रतिक्रिया देऊ लागले. आणि मंगेशला वडीलकीच्या नात्यानं कवितेबद्दल सल्ला देणारा, प्रेमानं चुका दाख‌णारा आणि न कंटाळता त्याचं म्हणणं चिवटपणं एेकून घेणारा गुरू मिळाला. आता तर प्रकाशकही तेच आहेत. हा तर दुग्धशर्करा योग घडून आला आहे की मणिकांचनयोग? काहीही म्हणा.

मी बाजूला पडलेच होते. ती दरी रुंदावत गेली. तरी पण आधी म्हटल्याप्रमाणं, संसार समृद्ध व संपन्न होत गेला. मंगेशला यशाचं शिखर गाठता आलं. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली सुधारत गेली. आणि सुखी संसाराचं परिपूर्ण चित्र तयार झालं, हे खरं आहे.

मी मनाजोगा जोडीदार निवडला. तरी जोडीदार मात्र वृत्ती-प्रवृत्तीनं जगावेगळा. अशा व्यक्तीशी समरस होत असताना जे वाट्याला आलं ते आपलं म्हणत, स्वीकारत यावं लागलं. त्या वाटचालीत स्वत:विषयीचं भान हळूहळू अधिक जागं होत गेलं.

मी कशी जगत आले याविषयी मोकळेपणानं-अलिप्तपणानं लिहावं, एवढीच या लिहिण्यामागची ऊर्मी होती.