आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काचबिंदू एक शांत दृष्टिचोर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काचबिंदू या संज्ञेमध्ये वेगवेगळ्या नेत्रविकारांचा समावेश होतो. दृष्टी चेतातंतूला (ऑप्टिक नर्व्ह्ज) होणारी इजा हा यामधील समान धागा आहे. काचबिंदूमध्ये सुरुवातीला फारशी लक्षणे जाणवत नाहीत. किंवा कधी कधी काहीच लक्षणे जाणवत नाहीत आणि कोणतीही पूर्वसूचना न मिळता चोरपावलांनी दृष्टीचा ºहास होतो. खरतर काचबिंदू असणार्‍या बर्‍याच जणांना आपल्याला काचबिंदू आहे. हे माहितीच नसते. जर काचबिंदूचे निदानच झाले नाही आणि त्यामुळे त्यावर काही उपचारच झाले नाही तर त्यामुळे अंधत्व येऊ शकते.

काचबिंदूचा आजार कशामुळे होतो : - काचबिंदूची शक्यता दर्शविणारा एक महत्त्वाचा धोकादायक घटक म्हणजे डोळ्याच्या आतल्या पाण्याचा वाढलेला दाब. निरोगी डोळ्यात डोळ्याचे अंतर्गत पाणी किंवा द्रव डोळ्यातून बाहेर निघून जाते म्हणजेच त्याचा निचरा होतो. ही निचरा करणारी यंत्रणा तुंबली आणि आवश्यक त्या नेत्ररसाचा निचरा सर्वसाधारण गतीने झाला नाही तर डोळ्याच्या आतला दाब वाढतो. दृष्टिसुद्धा जाऊ शकते.

काचबिंदूची शक्यता कोणाला असते :-
ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे, मधुमेह आहे.
ज्याच्या कुटुंबात पूर्वी काहीना काचबिंदू झालेला आहे.
ज्यांनी दीर्घकाळ स्टेरॉयड्स घेतले आहे.
ज्यांच्या डोळ्यांना दुखापत झालेली आहे.
काचबिंदूंचे निदान कसे केले जाते:-नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची बारकाईने तपासणी करून घेणे हा काचबिंदूंचे निदान करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. डोळ्याच्या आतील पाण्याचा दाब तपासणे ही एक महत्त्वाची चाचणी आहे.

कांचबिंदूवरील उपचार:- काचबिंदू कायमचा बरा होत नाही. नेत्रतज्ज्ञाने शिफारस केलेले औषध (आय ड्रॉप्स) नियमितपणे डोळ्यांत घालणे अशा परिणामकारक औषधांच्या साह्याने या आजारावर उपचार होतो.त्यामुळे डोळ्यांच्या आतील दाब कमी करून दीर्घ काळापर्यंत तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.काही रुग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रियासुद्धा करावी लागते. शस्त्रक्रियोनंतरही नियमित औषधोपचारची गरज असते. डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांचा नियमित उपयोग करणे आणि नियमितपणे डोळ्याच्या तपासणी करून घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेळोवेळी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे व नियमित औषधोपचार करण्याने काचबिंदू नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.