आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैत्रीच्‍या धाग्‍याला फेसबुकची जोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्री म्हणजे काय, नेमकी काय असते ही मैत्री, हिला कधी कोणी कुठे पाहिलेय का? हे प्रश्न सध्या सगळ्या यंगस्टर्सना पडत आहेत. या प्रश्नांचे हो की नाही असे सोपे उत्तर मिळणे जेवढे कठीण आहे ना, तेवढेच हे समजणे अगदी सोपेही आहे. आपल्या आयुष्यात आपण मैत्रीला नक्की किती स्थान देतो हेसुद्धा कोणीच सांगू शकत नाही. कारण मैत्रीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपण नेहमी ऐकत आलोय की मैत्री हे अतूट नाते असते, कधी न तुटणारे बंधन, एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होणे, फ्रेंडशिप डेला गिफ्ट देणे, ग्रीटिंगमधून भावना व्यक्त करणे याला मैत्री म्हणतात, असेच ना? पण या सगळ्या गोष्टी न करताही, सगळ्या भावना आपल्या मित्रापर्यंत पोहोचवण्याचा फेसबुक सध्या उत्तम पर्याय समजला जातो. सोशल नेटवर्किंगच्या साहाय्याने अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या असून आज सातासमुद्रापलीकडील व्यक्तीही एका खेड्यात राहणा-या माणसाशी जोडली गेली आहे. आपण कोणालाही भेटलो आणि त्याच्याशी अधिक संपर्क वाढवायचा असल्यास आपण आधी त्याला विचारतो की, अरे, फेसबुकवर तू आहेस का? अगदी जवळची आणि घट्ट अशी मैत्री या फेसबुकच्या माध्यमातून होत असते. मग अगदी तू काय जेवलास या प्रश्नापासून सुरुवात होऊन आज माझा मूड खराब होता यार, असे सगळे सांगत आपण नकळत मनातील लपलेल्या, कुठे कोप-यात दडलेल्या भावना त्या व्यक्तीशी शेअर करत असतो. अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही घडते ज्या गोष्टी आपण फक्त मित्रांनाच सांगू शकतो. या वयात खास करून कुटुंबीयांशी खटकते. कोणाला आर्किटेक्ट बनायचे असते तर घरातील मंडळींचा त्याला विरोध असतो म्हणून आपण निराश असतो. तर अनेकदा अचानक कोणी तरी आपल्या मैत्रीवर अविश्वास दाखवते. अशा अनेक प्रकारच्या घडामोडी आपल्या आयुष्यात घडत असतात.
आयुष्यात सहन करून करून डोक्याचा पार खोका झाला असतो. प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे वागण्यातच सगळा वेळ जातो पण मग हे सगळे कोणाला सांगणार, हा विचार करून फेसबुकवर कोणीतरी अनोळखी आॅनलाइन भेटते. त्याच्याशी हाय हॅलो म्हणत आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी आपण त्याला सांगायला लागतो. ही आहे आजची मैत्री. ज्याच्याजवळ आपण मनात लपवून ठेवलेल्या भावना निर्भीडपणे सांगतो. त्याला कोणाचेही बंधन नसते. चॅट करताना पहिल्यांदाच त्याला भेटलो असे वाटत नाही तर तो अगदी पूर्वीपासूनचा मित्र आहे असे भासते. युवावर्गात याचा वापर चांगला आणि वाईटही होतो. पण यात अनोळखी मित्राप्रमाणेच आपल्याला आपले असे जिवाभावाचे मित्रही भेटतात. अनेक वर्षांपासून ज्या मित्राला आपण भेटलो नाही त्याचे नावही पाहिल्यावर होणारा चेह-यावरील आनंद, पूर्वी खूप बारीक असणारी पण आता खूप जाड बेढब दिसणारी जिला दोन मुले झालेली आहेत, अशा मैत्रिणीला पाहिल्यावर प्रकट होणारे भाव. ते क्षणच खूप विलक्षण असतात. एखादी शाळेतील मैत्रीण आपल्याला फेसबुकवर सापडली तर स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी तिला मेसेजमध्ये अगदी शाळेतील शेवटचा दिवस आठवून देताना, अगं, तू मला ओळखलेले दिसत नाही वाटतं. मी तो, मी सातवीत तुझ्या शेजारच्या बेंचवर बसायचो असे सांगत तिला अखेर पटवून देण्याची धडपडही यामध्ये स्पष्टपणे जाणवते. नाजूक कळी उमलून फुलामध्ये तिचे रूपांतर होते तसेच फेसबुक मैत्रीचे आहे. ती एका फ्रेंड रिक्वेस्टपासून क्लोज फ्रेंडशिपपर्यंत जाते.
कधीही विरह न होणारी मैत्री म्हणजे फेसबुकची. ज्यामध्ये शाळेतील मित्रांना खूप वर्षानंतर अचानक भेटल्यावर काय करू आणि काय नाही असे होते; परंतु यामध्ये आपण सतत एकमेकांच्या सान्निध्यातच राहतो. कधीच विरह होत नाही. फेसबुकची ही न तुटणा-या मैत्रीचा प्रवास वर्षानुवर्षे सुरूच असतो. फेसबुक हे एक कुटुंबच होऊन जाते. एका मित्रासोबत अनेक मित्र भेटतात. म्हणूनच फ्रेंडशिपच्या या अतूट धाग्याला फेसबुकची ही जोड काय जुळलेली आहे. न पाहिलेले, कधी न दिसलेले, अनोळखी असे हे नाते कधीच न संपणारे असते...