आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची परीक्षा देताना...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बोर्डाची परीक्षा म्हणून येणारा मानसिक तणाव हा अभ्यासावर आणि शरीरावर परिणाम करीत असतो. त्यामुळे तणाव कमी करून अभ्यास कसा करायचा व मानसिक-शारीरिक स्वास्थ्य या काळात कसे टिकवायचे याबाबत काही गोष्टी जाणून घेऊयात.

परीक्षा आता सुरू झाली असेल. परीक्षेबरोबर उन्हाळादेखील वाढत चालला आहे. वाढत्या उन्हाबरोबर परीक्षेविषयीची अतिरिक्त भीतीदेखील मनात वाढत जाते. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी लागणारी एकाग्रता कमी होते.
सर्वप्रथम परीक्षा सुरू आहे याचे भान ठेवून अधिकाधिक उजळणीवर भर द्या. अभ्यासातल्या आपल्या चांगल्या बाजू कोणत्या आहेत व उणिवा काय आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या विषयातील कुठले प्रकरण तुम्ही चांगले समजून घेऊ शकला नाहीत हे ध्यानात घ्या. चांगला अभ्यास झालेल्या प्रकरणांवर जरी भर देत असलात तरी शक्यतो कुठलेच प्रकरण आॅप्शनला टाकायचे नाही यावर भर द्या. परीक्षेत नेमक्या त्याच प्रकरणावर जर अधिक गुणांचे प्रश्न विचारले गेले तर किमान ते प्रश्न प्राथमिक पातळीवर तरी सोडवता आले पाहिजेत याची तयारी ठेवा.
अभ्यास एके अभ्यास हेच धोरण ठेवू नका. अभ्यासासाठी निर्धारित वेळ काढा. दिवसभराचे साधारण नियोजन करा. जेवणाच्या वेळेत परीक्षेच्या वेळेप्रमाणे बदल करून त्याची सवय करून घ्या, म्हणजे परीक्षेच्या वेळी त्रास होणार नाही. अभ्यासाआधी किंवा सकाळी उठल्यावर किमान 15 मिनिटे मेडिटेशन करा. मन त्यामुळे स्थिर व शांत राहण्यास मदत होते. आहारात पित्तजनक, कफजनक कुठलेही पदार्थ निदान परीक्षेच्या काळात खाऊ नका. जेणेकरून शरीरस्वास्थ्य नीट राहिल्याने त्याचा अभ्यासावर व परीक्षेवर परिणाम होणार नाही. शरीराचे टाइमटेबल पाळल्यास त्याचा परीक्षेवर परिणाम होत नाही.

स्वत:ला थोडे मनोरंजनपर कार्यक्रमांमध्ये गुंतवा. केवळ अभ्यासच करीत राहिल्याने मनावरचा ताण वाढत जातो. त्यामुळे कुटुंबीयांसमवेत रमणे, मित्र-मैत्रिणींबरोबर प्रत्यक्ष काही वेळ गप्पा मारणे, संगीत ऐकणे अशा गोष्टीदेखील थोडा वेळ करू शकता.

या काळात बौद्धिक ऊर्जा अधिक खर्च होत असते. त्यामुळे मेडिटेशन, योग वा एरोबिक्स केल्याने तसेच पौष्टिक आहार घेतल्याने मन:स्वास्थ्य ठीक राहते.

परीक्षेच्या काळात ऊन वाढत असल्याने भरपूर पाणी प्या. पाण्याने जसे शरीर चांगले राहते तसेच मनदेखील शांत राहते. पाण्यात ग्लुकोज टाकल्यास अधिक उत्तम.
काय अनिवार्य आहे, काय वापरण्यास अजिबातच परवानगी नाही याची परीक्षेदरम्यान खात्री करून घ्या. एक रीतसर यादी करून ती तुमच्या खोलीत भिंतीवर चिकटवा. परीक्षेचे वेळापत्रकदेखील मोठ्या अक्षरात चिकटवा जेणेकरून तारखा व वेळांमध्ये गोंधळ होणार नाही.

परीक्षेचे नियम एकदा शांतपणे वाचून घ्या. पेपरला जाताना आपण सगळे आवश्यक साहित्य बरोबर घेतले आहे याची खात्री करून घ्या. अनेकदा नीट न तपासल्याने ऐनवेळी पेन मिळत नाही वा स्केल मिळत नाही, त्यामुळे त्यात पेपर सोडवण्याचा वेळ जाऊ शकतो.

आपली परीक्षेची तयारी नीट झाली आहे ना याबाबत एकदा नीट आत्मपरीक्षण करा. खरेपणाने स्वत:ला तपासा व जेवढी तयारी झाली आहे त्या तयारीवर आपल्याला पेपर देता येईल हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
या काळात पालकांनीदेखील काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. पाल्यावर मार्कांचे दडपण आणू नये, त्यांना सतत अभ्यासावरून टोकू नये. त्यांची मानसिकता स्थिर कशी राहील, घरात ताणतणाव कसे निर्माण होणार नाहीत याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. या काळात टीव्हीचा अतिरेक टाळला गेला पाहिजे.
विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे परीक्षेआधीच निरसन करून घेतले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना वा त्यातील मार्गदर्शकांना विचारले पाहिजे.

काही विषयांमध्ये लेखनाचा वेग चांगला असणे आवश्यक असते. त्यामुळे अशा विषयांचा परीक्षापूर्व अभ्यास करताना शक्यतो लेखन पद्धतीनेच अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास लेखनाचा वेग वाढवता येऊ शकतो. तसेच पेपरमध्ये जे लिहाल ते विचार करून लिहा, म्हणजे खाडाखोड कमी होईल.
उजळणी एक दिवस आधी करताना
*पाठांतर टाळा
*विषयांचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन त्यांने पुन्हा अवलोकन करा
*शॉर्ट नोट्स लिहिण्याचा प्रयत्न करा
*विश्लेषण पद्धतीच्या प्रश्नांना अधिकाधिक वेळ द्या
*एनसीईआरटीचीच पाठ्यपुस्तके वापरा
*पाठ्यपुस्तकातील अ‍ॅप्लिकेशन्स, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा
*जागरण टाळा
*अति झोप येईल असे खाणे टाळा
*गणित, विज्ञानाचा अभ्यास करताना नेहमी तज्ज्ञांना म्हणजे शिक्षकांनाच विचारा, कुणाही त्या विषयात पारंगत नसलेल्या व मोघम ज्ञान नसलेल्या व्यक्तीला विचारू नका, त्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता असते.
मेडिटेशन करताना
*अनुलोम-विलोमवर भर द्या
*श्वसनावर लक्ष केंद्रित करा
*खोलवर श्वास घ्या
*योग जर शास्त्रशुद्ध येत असेल तरच करावा.
पेपर सोडवताना
*प्रश्नपत्रिका नीट वाचून घ्या.
*कुठलाही प्रश्न सोडवताना अर्थ लक्षात येण्यासाठी तो तीनदा वाचा.
*प्रश्न हा ट्रिकी तर नाही ना याची खात्री करून घ्या.
*जे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येण्यासारखे आहेत ते आधी सोडवा.
*अवघड प्रश्नांवरच जरुरीपेक्षा जास्त विचार करत बसू नका.
*पेपर सोडवताना जवळ पाणी व इतर साहित्य पटकन हाताशी लागेल असे ठेवा.
*विज्ञानासारख्या पेपरमध्ये आकृत्यांवर अधिक भर द्या. आकृत्यांवर आधारित उत्तरे मुद्द्यांमध्ये लिहा व महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करा.
*साधे, कम्फर्ट वाटतील असे कपडे घाला
*अफवांवर विश्वास ठेवू नका
*पेपरच्या वेळी ऐन वेळेचा अभ्यास करू नका.
*मित्र-मैत्रिणी उपस्थित करीत असलेल्या ऐन वेळच्या शंकांनी, प्रश्नांनी विचलित होऊ नका.


suchitra03128@gmail.com