आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुयोग्य शेवट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मावशी काही प्रेमविवाहाच्या विरुद्ध नव्हती. ती आणि काका राजूला भेटले. त्यांना राजू आवडला आणि हे लग्न ठरलंही. अदिती मृदुलावर खुश झाली. अदितीची पदवी परीक्षा झाल्यानंतर लग्न करायचं असं ठरलं. आता राजू अधूनमधून अदितीकडे येऊ लागला. मृदुलाचीही त्याच्याशी ओळख झाली. कधी कधी ती त्याच्याशी गप्पा मारत असे. एकदा राजूचा मित्र पराग त्याच्याबरोबर आला. त्याचा हसरा स्वभाव, थट्टामस्करीची सवय, यामुळे की काय; पण मृदुलाला तो पहिल्या भेटीतच आवडला. एकदोनदा हे दोघे मित्र अदितीला भेटायला कॉलेजात आले, तेव्हा मृदुलाचीही भेट झाली. खरं म्हणजे, परागला मृदुला प्रथमदर्शनीच आवडली होती. तो तिच्या प्रेमातच पडला होता. म्हणून तिला भेटायचा मुद्दाम प्रयत्न करत होता.


आपण परागच्या प्रेमात पडत आहोत, हे लक्षात येताच मृदुलाने मात्र त्याला टाळायला सुरुवात केली. तेवढ्यात तिची टीवाय बीकॉमची परीक्षा आली. तिचा अभ्यास करता करता भराभर दिवस गेले. परीक्षा होताच ती गावी गेली.
मृदुलाने पदव्युत्तर शिक्षण इकडेच घ्यावं, असं अदितीला वाटत होतं. पण मृदुलाने परागला टाळण्यासाठी गावीच एमकॉमसाठी प्रवेश घेतला.


इकडे परागला मृदुलावाचून चैन पडेना. त्याने अदितीसमोर आपल्या भावना व्यक्त करून मृदुलाचा फोन नंबर मागितला. तेव्हा ती म्हणाली, ‘मृदुला फार चांगली मुलगी आहे. पण तिच्यावर चार वर्षांपूर्वी फार वाईट प्रसंग गुदरला. त्यामुळे ती तुझ्याशीच काय पण कोणाशीही लग्न करेल असं आता तरी मला वाटत नाही. तू तिचा नाद सोड.’
पराग म्हणाला, ‘मला मृदुला अगदी मनापासून आवडलीय. काहीही असो, मी तिच्याशी लग्न करीन. असं काय घडलंय तिच्या आयुष्यात?’


‘तू एवढा मागे लागलाहेस म्हणून सांगते. सुमारे तीन वर्षांपूर्वी म्हणजे ती जेमतेम बीकॉमच्या पहिल्या वर्षाला असेल, तेव्हा एकदा तिची आई, म्हणजे माझी मावशी बरीच आजारी होती. अशी संध्याकाळी घरात ती आणि आई दोघीच होत्या. तिच्या लक्षात आलं की, आईची औषधं संपलीत. म्हणून ती औषधं आणायला बाहेर पडली.
रस्ता नेहमीचा पायाखालचा होता, पण अगदी सुनासुना झाला होता. तिच्या ते लक्षात आलं नाही; पण ती घरून निघाल्यापासून बहुतेक तीन-चार जण तिचा पाठलाग करत होते. तिने औषधे घेतली आणि घराकडे परतली. जरा पुढे येते तो त्या चांडाळांनी तिला धरली. तिचं तोंड बंद केलं आणि तिला दूर नेऊन तिच्यावर-तिच्यावर... मग तिला त्यांनी रस्त्यावर फेकून दिलं, तेव्हा ती बेशुद्ध झाली होती.


इकडे घरी मावशी काळजी करत होती की अजून ती घरी का आली नाही. मग काका, तिचा भाऊ हर्ष घरी आले. त्यांनी तिच्या मैत्रिणींकडे फोनाफोनी करून शोधाशोध सुरू केली. शेवटी रात्री पोलिसांत तक्रार दिली. तर पोलिसांना ती रस्त्यावर रडत बसलेली आढळली. ती सारखी रडत होती.


पुढे महिना-दोन महिने ती फारच बेचैन होती. मी पण तिकडे जाऊन तिची समजूत घालून आले. पण छे! ती तर घराबाहेरसुद्धा पडायला तयार नव्हती. मावशी म्हणाली, मृदुला, तुझं शिक्षण चालू राहायला हवं तर तुला कॉलेजला जायला हवं. तर ती म्हणाली, ‘मला नाही शिकायचं.’ ‘अगं, शिकल्याशिवाय तुला नोकरी कोण देईल?’ असं मावशीनं बरंच समजावलं. मग ती म्हणाली, तो रस्ता बघितला की ती बेचैन होते. म्हणून मग आम्ही तिला आमच्याकडे शिकायसाठी घेऊन आलो.


मध्यंतरी त्या मवाल्यांवर कोर्टात फिर्याद केली. त्या केसचा निकाल नुकताच लागून त्यांना चांगली शिक्षा झाली. आता तू सांग, जिच्यावर चार जणांनी बलात्कार केलाय; जिला ‘सेक्स’ शब्दाची घृणा वाटते, अशा मुलीशी तू करशील लग्न?’


‘अदिती, बरं झालं तू मला सगळं सांगितलंस. या सगळ्यात तिचा काय दोष? मी करीन तिच्याशी लग्न.’
‘उगाच भावनेच्या भरात तू काही तरी बोलू नकोस. तिला किती सांभाळून घ्यावं लागेल, तुला कल्पना नाही. इतकी वर्षं आम्ही तिच्या मनाला कसं जपलं आम्हालाच माहीत. जरी ती लग्नाला तयार झाली, तरी सेक्सचं काय?’
‘हे बघ अदिती, त्या बाबतीत तू निश्चिंत राहा. मी लग्नानंतर सेक्सची मुळीच घाई करणार नाही, तिच्या कलाकलाने घेईन, असं कबूल करतो मी तुला. मग तर झालं? आता मला तिचा पत्ता दे. मी तिच्या गावी जाऊन तिला भेटतो.’
‘तू असं कर. घरी जा. या सगळ्याचा आठ-दहा दिवस विचार कर. हवं तर आईला विश्वासात घे. कारण कोणतीही गोष्ट घरातल्यांपासून लपवून ठेवण्यात अर्थ नसतो. सत्य शेवटी बाहेर पडतंच. पण बरेचदा ते वेगळ्याच स्वरूपात बाहेर येतं. त्यानंतरही तुझा निश्चय ठाम असेल तर उत्तम. मग मी तुला तिचा पत्ता देईन.’
पण आठ दिवसांनी पराग पुन्हा अदितीकडे आला. म्हणाला, ‘मला तिचा पत्ता दे. मी तिच्या गावी जाऊन तिचे मन वळवतो. माझा तर इरादा पक्का आहे.’


परागला असं अवचित घरी आलेलं पाहून मृदुलाला आश्चर्यच वाटलं. तिचं त्याच्यावर मन जडलं होतं खरं, पण जेव्हा त्याने तिच्याजवळ आपलं मन व्यक्त केलं तेव्हा ती म्हणाली, ‘मला नाही वाटत या माझ्या विटाळलेल्या देहाने मी तुलाही विटाळावं. शिवाय सेक्स या प्रकाराची मला शिसारी आलेय. मी नाही तुला सुख देऊ शकणार.’
‘मृदुला, देह कसला विटाळला? काही तरीच बोलू नको. तू त्या चांडाळांना कोर्टात खेचलंस. लोक काय बोलतील याची पर्वा न करता त्यांच्या हातून अशा अत्याचारांनी इतर मुलींना होणारं नुकसान टाळलंस, याबद्दल मला तुझा अभिमानच वाटतोय.’
मग त्याने तिला खूप समजावलं. शेवटी ती लग्नाला तयार झाली.
वाचकहो, पुढच्या महिन्यात आपल्याला या आगळ्यावेगळ्या जोडीच्या लग्नाला जायचंय.

(समाप्त)