आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचय कृष्‍णामूर्तींचा : पालक आणि प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘तुमची मुले जर तुमच्या वासनेतून जन्माला आली आहेत...ती जर खरंच प्रेमातून जन्माला आली असती तर आजचे जग खूपच वेगळे असते...’’ हे कृष्णमूर्तींचे विधान वाचल्यावर त्यातला आघात थेट अंगावर येतो. इतके थेट पालकांना आजवर कुणीच सुनावले नसेल. पालकांच्या मुलांवरील प्रेमाची बकबक क्षणार्धात बंद होऊन जाते. आपण आपल्या मुलांवर सध्या जे करतो ते प्रेम आहे, हे कोणताच पालक कृष्णजींच्या धारदार नजरेला नजर देऊन सांगू शकला नसता...
कृष्णजी तर पुढे जावून असेही म्हणालेत की, आई-वडील होणे म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पालकांनाही योग्य ते शिक्षण मिळाले पाहिजे ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. हे वाचल्यावर ते पालकत्वाकडे किती गंभीरपणे बघत होते हे लक्षात येते.
आपले आपल्या मुलांवर प्रेम नाही तर आपण केवळ मालकीहक्काने मुलांकडे बघतो. आपल्या अपेक्षापूर्तीची साधने म्हणून म्हातारपणाच्या परावलंबित्वाचा आधार म्हणून बघतो. त्यासाठी गोडीत बोलण्याला, वागण्याला आपण प्रेम म्हणतो. हे वास्तव कोणीच पालक मान्य करणार नाही, पण कृष्णजी ज्याला प्रेम म्हणतात त्या निकषावर खरंच किती पालक टिकतील...ते म्हणतात, ‘‘ आई-वडील आपल्या मुलांना अशा शाळेत पाठवतात की जेथे महत्त्वाकांक्षा असते, स्पर्धा असते, प्रेमाचा लवलेशही नसतो आणि म्हणूनच आपल्या समाजासारखा समाज सतत नाश पावत असतो. त्यात सतत कलह असतो. ’’ ते पालकांना विचारतात, ‘‘ सध्याच्या समाजापेक्षा सर्वस्वी वेगळा समाज अस्तित्वात आणण्यास तुमच्या मुलांनी साह्य करावे, असे मुलांवरील प्रेमामुळे तुम्हास कधी वाटले नाही का... ज्या समाजातून द्वेष, वैर यांचे उच्चाटन झाले आहे, असा नवा समाज आपल्या मुलांनी निर्माण करावा, अशी प्रेरणा तुमच्या प्रेमाने तुम्हाला दिली नाही का... जर तुमच्या मनात तुमच्या मुलांविषयी प्रेम आहे तर ते तुम्हाला कार्यप्रवण करण्याइतके शक्तिशाली नाही का...’’ असा निरूत्तर करणारा प्रश्न कोणत्याही पालकाला मुळापासून हलवून टाकील...’’
कृष्णजी केवळ पालकांनाच हे सुनावत नाहीत तर प्रेमाविषयी मुलांशीही बोलतात. मुलांशी चर्चा करताना ते म्हणतात ‘‘तुमच्या आई-वडिलांना आणि शिक्षकांना बहुधा प्रेम म्हणजे काय ते माहीत नाही. त्यामुळेच त्यांनी हे भयंकर जग निर्माण केले आहे. आंतरिक संघर्षाने ग्रस्त झालेला आणि इतर समाजाशी झगडणारा समाज निर्माण केलेला आहे. त्यांचे धर्म, त्यांची तत्त्वज्ञाने आणि त्यांचे सिद्धांत सगळे खोटे आहे. कारण त्यांच्या ठिकाणी प्रेम नाही. जीवनाचा फक्त एकच भाग ते पाहतात. ते एका अरुंद खिडकीतून बाहेर पाहतात. त्यातून जीवनाच्या विशालतेचे दर्शन होत नाही... आत्यंतिक प्रेमभाव असल्याशिवाय तुम्हाला संपूर्णतेचे दर्शन होणे शक्य नाही...
या सर्व चर्चेवरून त्यांच्या मांडणीचा सारांश हा प्रेम आहे. ते प्रेम कशाला म्हणत नाहीत हे जसे सांगतात तसे प्रेमाची लक्षणेही सांगतात. जगातील सर्व संघर्ष संपवून वेगळे जग निर्माण करण्याची ताकद त्या प्रेमात असल्याचेही ते सांगतात.
असे प्रेम पालकांमध्ये निर्माण करण्याचे कोणतेही गणिती सूत्र कृष्णमूर्ती सांगत नाहीत. कारण पालक त्याचाही हिशेब आणि बाजार मांडतील. कृष्णजी नेति नेति पद्धतीने प्रेम नसणे म्हणजे काय हेच सांगत राहतात... अंतर्मुख करत राहतात... पालकांना आपण जे करतो आहोत ते प्रेम नाही तर केवळ मालकी आहे. व्यवहार आहे. हे कळण्याचा क्षण हा प्रेमाकडे प्रवास सुरू होण्याचा असतो. स्वत:च्या स्वार्थी मालकीच्या भावनांचे निरीक्षण करतानाच त्या भावनांपासून मुक्ती होते. मुलाकडे आसक्तीविरहित बघताना कोणतीही अपेक्षा न ठेवताच आपल्याला नकळत निरपेक्ष प्रेमाची झलक मिळू लागते.
प्रेम काहीच मागत नाही. पकडून ठेवत नाही. हिशेब करत नाही. काहीच समोरच्यावर लादत नाही. केवळ समोरच्याचे हितचिंतक होऊन राहते. मी माझ्या मुलांच्याबाबत असा होऊ शकेल का....