आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटे चरित्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाषा हे केवळ अभिव्यक्तीचं, व्यक्त होण्याचं माध्यम नाही. मूल जन्माला आल्यानंतर त्याला भाषेचं आकलन व्हायला लागतं. तिच्या माध्यमातून ते परिसर समजून घेतं. आसपास जे घडतंय त्याचं त्याला आकलन होतं. मूल आपल्या परंपरा, इतिहास, भूगोल जाणून घेतं. अशा चिकित्सेला सृजनशील साथ मिळाली तर किती सुंदर काम होऊ शकतं, याचा अनुभव नुकत्याच वाचलेल्या एका पुस्तकामुळे आला.

इयत्ता नववीच्या मुलांनी व मुलींनी लिहिलेला हा छोटा चरित्रग्रंथ. ‘झेप!’ खरं तर नावावरूनच कल्पना येते. देखण्या मुखपृष्ठामुळे पुस्तक वाचण्याआधीच प्रभाव पाडून जातं. यातील झेप ही दुहेरी आहे, एक त्या त्या व्यक्तींची ज्यांच्या जीवनाविषयी मुलांनी यात मांडणी केली आहे. आणि दुसरी स्वत: या छोट्या चरित्रकारांची, ज्यांनी वयाच्या या टप्प्यावर आपल्या लेखणीला आजमावून पाहिलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना ही दुहेरी झेप वेगळाच आनंद देते. याचं सारं श्रेय या सर्व लिहित्या हातांना व या हातांना लिहितं करणारे प्रसिद्ध कवी-साहित्यिक बालाजी मदन इंगळे, त्यांच्या ग्रामीण प्रशाला, माडजच्या सर्व टीमला जातं.
 
१५ ऑक्टोबर २०१५ या ‘वाचन प्रेरणा दिनी’ सुरू झालेला चरित्र लेखनाचा प्रवास १५ ऑक्टोबर २०१६ रोजी संपला. मुलांनी सोबत मिळून पूर्वतयारी, मुलाखती, गप्पा इ.च्या माध्यमातून हे पुस्तक आकाराला आणलं. इंगळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी कित्येक विषयांचा अभ्यास या एकाच प्रयत्नात केलाय. शालेय जीवनात हे अनुभव पुढच्या कित्येक अशा प्रयत्नांची पायाभरणी असते. एखाद्या व्यक्तीला भेटून त्यांची मुलाखत घेणे, व्हाॅट्सअॅपवरून संवाद साधून माहिती घेणे, माहितीचे संकलन व मिळालेल्या माहितीची मांडणी करणे या संशोधनाच्या पायऱ्या आहेत. मुलांना हा अनुभव अगदी अद्भुत वाटला असणार, यात शंका नाही. मुलांचा प्रयत्न खूप छान जमून आलाय. ती लहान आहेत आणि त्यांच्या वयाच्या मानाने हा प्रयत्न खूप छान झालाय, असं लिहून त्यांच्या प्रयत्नांना कमी लेखणार नाही. उलट असे प्रयत्न अन‌् उत्साह मुलंच दाखवू शकतात, यावर माझा तरी विश्वास आहे. या कामासाठी लागणारी मेहनत, सातत्य ही बाब फार महत्त्वाची आहे. आणि ते या मुलांनी साध्य करून दाखवलं आहे. 

या चरित्रग्रंथाच्या लेखनात मुलींचा वाटा मोठा आहे, ही एक विशेष आनंदाची बाब. ‘झेप’सारखे प्रयत्न आता होऊ लागले आहेत, हे मराठी साहित्याच्या दृष्टीने आशादायी म्हणायला हवं. मुलं खेड्यातील असून एवढं लिहू शकतात, असा अचंबा यात नाही. कारण प्रतिभा जागा बघून जन्मत नसते, तिला पंख फुटले की ती आपोआप झेप घेतेच. साहित्यिक बालाजी इंगळे हे याचं एक जिवंत उदाहरण. सदर पुस्तकात माडज (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) गावच्या दहा व्यक्तींच्या चरित्राचा आढावा घेण्यात आलाय. हणमंतराव बेलूरकर, पंचप्पा परांडे, संतराम बिराजदार ही तडफदार जुनी पिढी ज्यांनी रझाकारांच्या विरोधात लढा दिला, गावाच्या विकासात मोठी भूमिका निभावली. स्व. नरेंद्र काळे (कर्तव्यदक्ष पोलिस), दीपक गायकवाड (आर्मीमॅन), रमेश पाटील (दहशतवादी विरोधी फोर्स), इंजीनिअर सतीश गहेरवार, कर्तृत्ववान शलाका साधना काळे, धडपड्या बालाजी फुगटे, अश्विनी माने ही जिद्दीने पुढे आलेली इंजीनिअर, या तरुण पिढीचा लेखाजोखा मुलांनी या पुस्तकात मांडला आहे.

या पुस्तकात केवळ या नायक-नायिकांचं चरित्रच येत नाही. त्यासोबत येतो मराठवाड्याच्या एका छोट्या कसब्याचा निजामशाहीतील इतिहास, न्यायासाठी झालेला संघर्ष, रझाकारांचा काळ, मागासलेपणातून विकासाकडे केली गेलेली वाटचाल. सामान्य लोकांचा संघर्ष, दारिद्र्य आणि त्यातूनही संघर्ष करून केलेली यशस्वी वाटचाल. नवीन स्वप्नं आणि त्या स्वप्नांसाठी करावा लागणारी धडपड. हे पुस्तक म्हणजे ‘स्थानिक इतिहासाच्या’ शाखेत दिलेलं मोठं योगदान आहे. स्थानिक लोकांच्या योगदानाला मोठ्ठ्या इतिहासाच्या पानांत न्याय मिळत नाही. त्यात अश्विनी माने हिच्या आई सरोजा यांच्यासारख्या धीरोदात्त आईचाही समावेश करावा लागेल. परंतु मुलांना प्रथम आपल्या गावाचा इतिहास समजला पाहिजे, त्यातून प्रेरणा घेऊन ते सर्व जण गावाचा इतिहास घडवतील. इथं प्रत्येक नायक-नायिका आपल्या गावासाठी, कुटुंबासाठी संघर्ष करताना आढळतात. पर्यायाने ते जिल्हा, राज्य, देश यासाठी संघर्ष करतात. कारण देशाचा विकास व्यक्तीच्याच विकासाशी निगडित असतो. बालाजी इंगळे यांनी खूप प्रेरणादायी कार्य करवून घेतलंय, अन‌् तितक्याच ताकदीने ते मुलांनी पेललंय. प्रमोद मोरे यांनी हे पुस्तक प्रकाशित करून एक अभिनव प्रयोग वाचकांच्या हाती दिलाय. ग्रामीण प्रशाला, माडज येथे शिकून ही पिढी आपल्या गावाचं नाव रोशन करत आहे. प्रशालेतील सर्व टीमचे अभिनंदन आणि आभार. हा अभिनव प्रयोग आपण वाचावा, हे सांगणे न लगे.
 
पुस्तकाचे नाव :   झेप
लेखक     :    ग्रामीण प्रशाला, माडज, ता. उमरगा, जि. उस्मानाबादचे नववीतील विद्यार्थी
संपादक     :    बालाजी मदन इंगळे
प्रकाशक     :    ‘निर्मिती उमरगा,’ प्रमोद माणिकराव मोरे, उमरगा
स्वागत मूल्य :   ~ २०/-
बातम्या आणखी आहेत...