आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भातील बाल-कुमारांच्‍या आमच्‍या गोष्‍टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एक्क्याचा बैल’ असो किंवा ‘बाहुलीचे अश्रू’ , ‘पुरस्काराचे गुपित’  किंवा मग ‘जगाची ओळख’ ‘वादळ’ यांसारख्या सुंदर कथांचा गोफ म्हणजे, ‘आमच्या गोष्टी’ हे नरेंद्र लांजेवार संपादित छोट्यांचं  पुस्तक. 


खेड्यापाड्यातलं मूल वाचतं व्हावं, त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचावीत यासाठी प्रयत्नरत असणाऱ्यात एक नाव आवर्जून घ्यावं लागतं; नरेंद्र लांजेवार यांचं. पेशाने ग्रंथपाल असणारे नरेंद्रदादा, खरंतर ग्रंथपाल हा शब्द त्यांच्यासाठी खूप छोटा आहे, कारण त्यांनी केवळ ग्रंथ सांभाळले नाहीत तर ते वाचत्या हातात पोहोचते केले. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुलांसाठीची वाचनालये मुलांच्या मदतीने सुरू केली. असे नरेंद्रदादा मुलांना लिहितं करण्याच्या प्रयत्नांतही मागे नाहीत. उलट महाराष्ट्रात मुलांचं लिखित साहित्य पुस्तकरूपात सर्वांसमोर आणण्याचा मान त्यांनाच जातो. ‘ही एक चळवळ आहे फारूक. ती आपल्याला वाढवायची आहे. मुलांना पुस्तकं वाचायची असतात. पण आपण कमी पडतो,’ असं ते नेहमी म्हणतात. विदर्भातील मुलांना कथा लिहिण्याचं आवाहन केलं गेलं तेव्हा काही कथा एकत्र झाल्या. त्यात कथा कमी व निबंधच जास्त होते. म्हणजेच मुलांना अजूनही कथा प्रकार फारसा उमजलेला नाही, असं मत ते व्यक्त करतात. अशा अकरा कथांचा हा छोटेखानी संग्रह.


‘आमच्या गोष्टी’ची भूमिका मांडताना लांजेवार म्हणतात, ‘बालसाहित्याच्या नावावर मनोरंजन, सामान्य ज्ञानावर आधारित माहितीचे संकलन करून रुक्ष आणि टुकार पुस्तकांमुळेही बालवाचक पुस्तकापासून दूर जात आहेत. प्रबोधन आणि संकारवादी बालिश संकल्पनांच्या आवरणाखाली लहान मुलं अगदी गुदमरू लागली आहेत. बलकुमारांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, बालप्रतिभेचे बीजांकुरण त्यांच्यात विकसित व्हावे यासाठी विदर्भातील बाल कुमारांनी लिहिलेल्या बालकथांचा संग्रह संपादित करत आहोत.’ अकरा कथा आणि त्यांतील शाश्वत जीवनमूल्ये यांची सुंदर गुंफण इथं केलेली दिसते. काही कथा वाचताना या केवळ बालकथा नसून अत्यंत दमदार मांडणी केलेल्या प्रौढ कथा वाटतात. हे त्या लेखकांचे श्रम. ‘एक्क्याचा बैल’ ही संपदा पाटील हिची कथा. एका बैलाची व त्याच्या निर्दयी मालकाची कथा. ऐन बैलपोळ्याला त्याचं मरण चटका लावून जातं. काही प्रश्नही बाकी राहतात. मानवी मूल्यांच्या एकंदरीत ऱ्हासाची कथा ती यातून मांडण्याचा प्रयत्न करताना दिसते. ‘बाहुलीचे अश्रू’ ही स्वप्नील लकडे याची एक अप्रतिम कथा. एकंदरीत कथेची रचना आणि मांडणी, शेवट या गोष्टी अत्यंत सुंदर झाल्या आहेत. अशा कथा पाठ्यपुस्तकात असायला हव्यात, असं राहून राहून वाटत होतं. ‘पक्षीमित्र चंदू’ ही स्नेहल मोरे हिची कथा. तसं पाहता ही एक बोधकथाच आहे. यातून लेखिका जे मांडते त्यात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. मात्र सर्व काही छान व्हावं ही एक मानवतावादी दृष्टी इथंही आहे. मुलांना सुखात्मक शेवट हा प्रकार सुखावतो. याच्या मुळाशी आहे ते हे की, मुलं शांतीप्रिय असतात. ती सलोखा अपेक्षित असतात. त्यांच्यातील हिंसेला समाज खतपाणी घालत असतो. 


‘वादळ’ हे केतन गीते याची कथा. भवतालाचं निरीक्षण आणि त्याच्याशी असलेली एकरूपता, त्यातून पीडितांसाठी काही करण्याची भावना हे मानवी मूल्य इथं अधोरेखित होतं. मुलाच्या मनातलं आंतरिक द्वंद्व इथं पाहायला मिळतं. ‘राजाची किंमत’ या कथेत श्रुतिका शेकोकार तार्किक गोष्ट मांडते. राजासमोर त्याची शून्य किंमत सांगण्याचं धाडस, बंडखोर वृत्ती हे सर्व या वयाचं वैशिष्ट्य. ते पुरेपूर या कथेत उतरलंय. मुलांचं स्वत:चं असणं, वयाची वैशिष्ट्ये अशी साहित्यात उतरायला हवीत. तेव्हा ते अधिक वाचनीय व कालसुसंगत होतं. ‘पुरस्काराचे गुपित’ ही पूजा काळे हिची सुखांत शेवट असणारी छोटीशी बोधकथा. यात पूजाने मुलाला खूप सोज्वळ दाखवलंय. मुलांनी असं असायला हवं अशी तर तिची इच्छा नाही ना, असंही क्षणभर वाटून जातं. ‘जगाची ओळख’ यात अभिषेक जोशी आपल्या मोठ्यांना एक सणसणीत चपराक लगावतो. हो! हे सत्य आहे. ‘जग म्हणजे स्वत:च जगणे आणि जन्मदात्यांना सुखाने जगू न देणे,’ अशी व्याख्या तो जगाची करतो. एक लहान मूल जेव्हा जगाकडे पाहतं तेव्हा, त्याची दृष्टी आणि दृष्टिकोन विशाल व्हावा असा  समाज आपण बनवून ठेवलाय का? असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहू. हे एक आव्हान आहे, आपण मोठ्यांनी लहानांसाठी खरंच एका छानशा जगाची रचना केलीय का? तर उत्तर ‘नाही’ असेच येईल.


जिवाचे मोल - अभिजीत अवचट, धाडशी सुमन - सुकन्या देहाडे या दोन लघुकथा आणि बोधकथा यात आहेत. सूर्य-चंद्र आणि चांदण्या ही उमेश राऊत याची लोककथा यात आहे. अवकाशाचा आणखी थोडा अभ्यास करून ही कथा अधिक कल्पक करता आली असती. कारण आजच्या कल्पना उद्याचं सत्य ठरण्याची अधिक शक्यता असते. अशी भन्नाट कल्पकता मांडली गेली पाहिजे.’सत्यमेव जयते’ ही अशीच एक बोधकथा. राजा-पोलीस-ऑफिस या गोष्टी मेळ खात नाहीत, मात्र सत्याचा विजय होतो हे शाश्वत मूल्य या कथेतून पाहायला मिळतं.


अशा या वेचक, निवडक कथा. निश्चित खूप चांगला अनुभव देतात. यात काही त्रुटी जरी दाखवल्या असल्या तरी हा अत्यंत सुंदर प्रयोग आहे यात वाद नाही. कारण यामागे एक ठोस भूमिका आहे. हे केवळ संकलन नाही. ही गोष्ट इथं आवर्जून नमूद करीन. मुलांनी लिहावं म्हणून झटणाऱ्या प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपणही आवर्जून वाचा व मुलांना वाचून दाखवा.


पुस्तकाचे नाव : आमच्या गोष्टी., संपादक : नरेंद्र लांजेवार
प्रकाशन : मैत्री प्रकाशन, बुलडाणा. मूल्य : ३० रुपये.

- फारुक काझी, सोलापूर
 

बातम्या आणखी आहेत...