आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किलबिलत्‍या पाखरांच्‍या किलबिल गोष्‍टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या किलबिल गोष्टीसंग्रहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील मुलांच्या स्वत:च्या भाषेत आलेल्या तीन कथा. उत्तर भारतातून आलेल्या कोमल वर्माची ‘हम यही राहबय’ ही कथा तिच्या ‘कुर्मी’ भाषेत येते, तर ‘मी अभय बोलतो’ ही अभय पवार या पारधी समाजातील मुलाने लिहिलेली कथा वाचताना पारधी समाजाचा एकंदरीत जीवनपट आपल्यासमोर उलगडत जातो.

नामदेव माळी. साहित्यिक म्हणून ओळख असणारे अन‌् आता नव्या पिढीने जोमाने लिहिले पाहिजे, असा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व. एक अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्दही खूप धडपडीची आहे. अशा नामदेव माळी यांनी मिरज तालुक्यातील छोट्या किलबिलणाऱ्या हातांना लिहितं केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आजवर चार विद्यार्थी साहित्य संमेलने आयोजित करून महाराष्ट्रातील साहित्य चळवळीला एक वेगळाच आयाम दिला आहे. अशा साहित्यिकाच्या तालमीत तयार झालेल्या मुलांच्या कथांचा संग्रह वाचताना सर्वांचीच मेहनत दिसून येते.
 
‘किलबिल गोष्टी’ असे या कथासंग्रहाचे नाव आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या साहित्य चळवळीतील अग्रगण्य संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. दमसासचे अध्यक्ष विजय चोरमारे सुरवातीलाच आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात. ती समजून घेऊन या क्षेत्रात काम होणे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणतात, “कार्यशाळांच्या माध्यमातून चांगले लेखक-कवी तयार होतील, असा आमचा भाबडा समज कधीच नव्हता. गंभीरपणे लिहिणारा एखादा लेखक तयार झाला तरी पुरे, त्याचबरोबर अनेक चांगले वाचक तयार व्हावेत, हाच आमचा उद्देश आहे.” मुलांचे लेखन करवून घेताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात, याबाबत नामदेव माळी म्हणतात, “मी एकदा लिहिलं त्याला तोड नाही, असा विचार केला की संपलं. आपलं लेखन वारंवार आशय आणि भाषेच्या दृष्टीने तपासून घ्यायला पाहिजे. पूर्ण समाधान होईपर्यंत लिहिले पाहिजे.” मुलांच्या लेखनातही ही गोष्ट पाळली गेली पाहिजे.
 
एकूण २३ कथांचं संकलन यात आहे. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व काही माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या कथा यात आहेत. किशोर अन‌् कुमारवयात मुले अन‌् मुली यांच्यात काही भावनिक बदल होत असतात. या भावनांना विवध पैलू असतात. मृदुता, माया, प्रेम यांचा उद्रेक होऊ शकतो. या वयात मुलांना दुर्बलांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना मदत करणे अशा गोष्टींचे कमालीचे आकर्षण असते, अशी वाचताना जाणीव व्हायला लागते.
 
हुशार राम (मंजुषा कोळी), खरी मैत्री (किशोरी पाटील), शहाणे गाढव (अमृता कोष्टी), गोष्ट दहा रुपयाची (प्रियांका नरुटे), द्राक्षडोळा (शिवानी चौगुले) या कथांतून मुलांना गरिबी, द्रारिद्र्याशी झुंजणाऱ्यांविषयी असलेली कणव दिसून येते. गरीब मुलांना टाळले जाण्यासारखे प्रसंग काही कथांतून आले आहेत. मुले आसपासच्या निरीक्षणातून हे मांडत आहेत, की समाजात असेच असते असा काही त्यांचा ग्रह आहे, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे ठरते. समाजाच्या निरीक्षणातून हे येत असेल तर आपण समाज म्हणून आपल्या मुलांना घडवण्यात कसूर करतो आहोत, सामाजिक संकुचित वृत्ती निर्माण करत आहोत. मुलांचे साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो, हे यावरून आपल्या लक्षात येईल.
 
‘माझे स्वप्न’ ही विनायक रसाळ लिखित कथा विशेष आवडली. अंधत्वाकडे झुकू लागलेल्या विनायकचे स्वप्न आहे गायक होण्याचे. त्याची मांडणी अत्यंत साधी परंतु पटकन लक्ष वेधणारी आहे. ‘अंधश्रद्धा’ ही साक्षी ओमासेची कथा वेगळी वाटली. या कथेतले ‘आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करावे’ हे वाक्य काहीसे कृत्रिम वाटायला लागते. अशी वाक्ये टाळता आली पाहिजेत. ‘पावसाची मजा’ ही सुमरन जमादारची कथा सुंदर मांडणीमुळे लक्षात राहते. त्यात काही भाग विस्ताराने यायला हवा होता, असे वाटत राहते.
 
‘गोष्ट दहा रुपयांची’ ही प्रियांका नरुटे हिने लिहिलेली कथा सल्ले देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून मार्ग दाखवते. मोठे लोक मुलांना सतत सल्ले देत असतात, त्यांनी ही कथा आवर्जून वाचायला हवी. ‘बसस्टॉपवरची गंमत’ (सायली चव्हाण) व ‘आजीचा आशीर्वाद’ (वेदांत शहा) या काही मनोवेधक कथाही यात वाचायला मिळतात.
 
या संग्रहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील मुलांच्या स्वत:च्या भाषेत आलेल्या तीन कथा. उत्तर भारतातून आलेल्या कोमल वर्माची ‘हम यही राहबय’ ही कथा तिच्या ‘कुर्मी’(मूळ नाव कुरमाली - उत्तर भारतातील एक हिंदी बोली) भाषेत येते. तिची ही अभिव्यक्ती खरंच कौतुकास्पद आहे. ‘मी अभय बोलतो’ ही अभय पवार या पारधी समाजातील मुलाने लिहिलेली कथा वाचताना पारधी समाजाचा एकंदरीत जीवनपट आपल्यासमोर उलगडत जातो. त्याच्याच मोठ्या भावाची ‘लई शिकणार मी’ ही कथा पूर्ण पारधी भाषेत आहे. त्या त्या भाषेचे सौंदर्य अन‌् नावीन्य यात अनुभवायला मिळते. नसीमा मुजावर यांनी ही कथा मराठीत अनुवादित करून वाचकांची सोय केली आहे. मुलांच्या लेखणीतून आलेले हे भाषिक धन आपण मनसोक्त लुटायला हवे. अनुक्रमणिकेपासून एक वेगळेपण यात जपले गेले आहे. नामदेव माळी यांनी संपादित केलेले हे पुस्तक दमसासने प्रकाशित केले आहे. आतील चित्रे मुलांनीच काढलेली असून अत्यंत देखण्या बांधणीत हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. यासाठी सर्वांना धन्यवाद द्यायला हवेत.
 
}  पुस्तकाचे नाव: किलबिल गोष्टी
}  संपादक: नामदेव माळी
}  प्रकाशक: दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
}  मूल्य :     रुपये १००/-
 
farukskazi82@gmail.com
बातम्या आणखी आहेत...