आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळपाटीवरच्‍या कविता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धूळपाटीवर लिहिणारी लेकरं जेव्हा कागदावर लिहू लागली तेव्हा त्याची ‘शाळकरी मुलांची कविता’ झाली. एकूण ४६ कविता या संग्रहात आहेत. या संग्रहाचं वैशिष्ट्य हे की, यातील मुखपृष्ठासह आतील सर्व चित्रं वेगवेगळ्या शाळांच्या (जिल्हा परिषदेच्या) मुलांनीच काढली आहेत. त्यामुळे मुलं पुस्तक हातात घेऊन वाचयला आतुर होतात. 


अलीकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागलीय. मुलांच्या लिखाणात केवळ शब्दचमत्कृती साधून चालत नाही. मुलांना त्यासाठी अनुभवांचं भांडवल जमवावं लागतं. शब्दानुभव, वाक्यानुभव यांसोबतच त्यांना आशयानुभव द्यावा लागतो. आताशा ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते आहे. मुलांसाठी लिहिताना मुलांच्या भावविश्वाला जगता आलं पाहिजे. तेव्हा मुलं त्या साहित्याला आपलं मानतात. अन्यथा ते साहित्य बालसाहित्य कधीच ठरत नाही.


नामदेव माळी साहित्यिक आहेत. मिरजचे गटशिक्षणाधिकारी असताना त्यांनी मुलांना लिहितं करण्याचा प्रयत्न केला. चार विद्यार्थी साहित्य संमेलनेही घेतली. त्यातून मुलांच्या कार्यशाळा सुरू झाल्या. मिरज तालुक्यातील विद्यार्थ्यांची  ‘अनुभवलेखन’ या विषयावर मीही कार्यशाळा घेतली होती. अनुभवलेखन हा कथालेखनाकडे वळण्याचा एक मार्ग आहे. कथाप्रकाराप्रमाणे त्यांनी कविताही हाताळून पहिल्या. मुलांच्या या कवितांचा सुंदर संग्रह ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर’ या साहित्य क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून पाहणाऱ्या संस्थेने प्रकाशित केला आहे. संपूर्ण रंगीत आणि देखणा संग्रह असं त्याचं रुपडं आहे. दयासागर बन्ने या कविमित्रांनी यात संपादक म्हणून भूमिका पार पाडली आहे.


धूळपाटीवर लिहिणारी लेकरं जेव्हा कागदावर लिहू लागली तेव्हा त्याची ‘शाळकरी मुलांची कविता’ झाली. एकूण ४६ कविता या संग्रहात आहेत. या संग्रहाचं वैशिष्ट्य हे की, यातील मुखपृष्ठासह आतील सर्व चित्रं वेगवेगळ्या शाळेतील (सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या) मुलांनीच काढली आहेत. त्यामुळे संग्रहाची मज्जा अजूनच वाढली आहे. मुलं पुस्तक हातात घेऊन वाचयला आतुर होतात.


प्राणी, पक्षी, निसर्ग, जीवन, कीटक इत्यादी विषय तर यात येतातच, सोबत येतात काही नावीन्यपूर्ण विषय - जसे अशिक्षित मुलीचे मन - सुप्रिया कोळी, जगू कसा मी - विनायक पाटील, मी – आकाश पाटील, डास - प्रतीक्षा देवरमनी, माझं चंचल मन - गायत्री पाटील, मैत्रीण हवी - अश्विनी पाटील, दिवाळीचे बोबडगीत - श्वेता शिंदे. या आणि अशा काही कविता वाचकाला एक वेगळा अनुभव देतात. संपादक नामदेव माळी यावर लिहितात, ‘आतल्या कलावंताला बाहेर येण्याची संधी देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. चांगला माणूस बनविण्याची पूर्वतयारी आहे.’


चिऊताई चिऊताई
तुझे किती पाय छोटे
आकाशी झेप घेणारे
मन तुझे मोठे.


किशोरी पाटील ‘चिऊताई’ या कवितेत चिमणीच्या धैर्याचं कौतुक करताना त्याला मोठ्या मनाची उपमा देते आहे. इथं किती सहज-सोपी उपमा दिलीय तिने. हे शब्दांचं आणि आशयाचं सौंदर्य होय. 


माझं गाव
वारणेच्या कुशीत वसलेलं.
निसर्गानं नटलेलं,
कवठेपिरान म्हणून गाजलेलं.


‘माझे गाव’ ही श्रीधर जाधवची कविता मातीत वसलेल्या कवितेची सय आणते. ग्रामीण भागात बैलगाडी चालवताना, नांगरणी, औत चालवताना शेतकरी शब्दांना साद घालत असतो. तेव्हा

 

अशा सुंदर रचना बाहेर पडतात, 

ज्यात त्यांचं जगणं नांदत असतं.
घासाला घास द्यायला,
घरातल्या गोष्टी शेअर करायला.
चेष्टेने भांडायला,
खोटे खोटे रुसायला,
एक तरी मैत्रीण हवी.


‘मैत्रीण हवी’ या अश्विनी पाटील हिच्या कवितेत तिने धम्माल केली आहे. माणसाची व्यक्त होणं ही अत्यंत महत्त्वाची गरज. त्यासाठी कुणीतरी हक्काचं माणूस हवंच की. मित्रमैत्रिणी जगण्यातल्या महत्त्वाच्या जागा व्यापतात. ‘शेअर करायला’ या शब्दाची जादू तिने अगदी चपखल पकडलीय. शब्दांशी असंही खेळता आलं पाहिजे. कारण आपण भाषेच्या अंगाखांद्यावर खेळत असतो, आणि भाषा आपल्या जीवनातून समृद्ध होत असते. 


बाप माझा गेला देवा
जगू कसा मी.
गावाने तर वाळीत टाकलं,
आईला तर वाईट वाटलं.
जगू कसा मी...


अवघ्या १३-१४ वर्षांचा विनायक पाटील असलं दाहक लिहितो तेव्हा मेंदू सुन्न होऊन जातो. वडील वारल्यानंतरची त्याची घुसमट तो शब्दांत मांडतोय. अशा कविता एका दाहक अनुभवाची मांडणी तर असतेच, त्याचसोबत समाज नावाच्या एका मोठ्या व्यवस्थेला दिलेलं आव्हान असतं. शब्दांत किती सामर्थ्य असतं ते ही कविता पटवून देते.

 
पाऊस आला की खूप छान वाटते,
चिंब चिंब भजायला लई झ्याक वाटते.


‘पाऊस’ कवितेत साक्षी बामणे ‘लई झ्याक’ हा शब्द कितीतरी शब्दच्छटा विखरून जाते.


नदीला पाहून ओहोळ हसले
आईच्या कुशीत बाळ शिरले.


‘ओहोळ’ ही योगेश यादवची अत्यंत सुंदर कल्पना मांडणारी कविता. ओहोळाचा प्रवास खूप सुंदर रीतीने तो मांडतो. 


अशा एकाहून एक सुंदर अनुभवांसाठी आपण हा कवितासंग्रह वाचायलाच हवा. कारण बऱ्याचदा सौंदर्य शब्दांत पकडता येत नाही. असा हा सुंदर कवितासंग्रह आपणास हवा असेल तर ‘दमसास’चे कार्यवाह गोविंद पाटील यांच्याशी संपर्क करावा. (९८८१०८१८४१) 


-फारूक काझी, सोलापूर
farukskazi82@gmail.com

बातम्या आणखी आहेत...