आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मितीच्या डोहाळ्यांचा शब्दोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांचं स्वत:चं एक भावविश्व असतं. आसपास घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी ते पाहात असतात. आपल्या कुवतीप्रमाणे समजून घेत असतात. त्या गोष्टींचं आकलन अन‌् त्यांचा सृजनशीलतेच्या पातळीवर जाऊन विचार करण्याची क्षमता मुलांमध्ये असते. ‘मुलांना काय समजतं?’ असं आपण सतत म्हणत असतो. मुळात एका मोठ्या भ्रमात आपण वावरत असतो, याची प्रचिती ‘सृजनपंख’ वाचताना आपल्याला प्रकर्षाने होते.

प्रा. स्वाती काटे व साहित्यिक पृथ्वीराज तौर या बालसाहित्यात विशेष रुची असणाऱ्या रसिक अभ्यासकांनी महाराष्ट्रातील अंगणवाडी ते महाविद्यालयीन मुलीमुलांच्या कविता व चित्रांचं संकलन करून ‘सृजनपंख’ आपल्यासमोर ठेवलं आहे. पंख उंच भारारी घेतात अन‌् सृजनत्व त्यात नावीन्य आणतं.
 
 लहानग्या मनात फुलणारं काव्य सर्वांसमोर यावं, यासाठी केलेला हा प्रयत्न. पुस्तकाच्या सुरुवातीला संकलनकर्त्यांनी आपली भूमिका व एकंदरीत बालसाहित्याविषयी स्पष्ट विवेचन केले आहे. हा कवितासंग्रह वाचत असताना आपण कधी हसतो, कधी अवाक होतो, तर कधी वर्तमानावर गंभीर होतो. 
 
यात मुलांची व्यक्त होण्याची तीव्रता स्पष्ट जाणवते. यमक जुळवणे हा हेतू नसून मला जे वाटते ते व्यक्त करणे, ही महत्त्वाची भूमिका यात आहे. त्यामुळे हा ‘खुल्या अभिव्यक्तीचा मंच’ वाटतो. लिहिता लिहिता कवींनी जी शब्दचमत्कृती साधली आहे, ती पाहता “भन्नाट!” एवढी एकच प्रतिक्रिया बाहेर पडते. ‘कोडे’ या कवितेत गौरी कुलकर्णी ‘कुंकुल्याली पूर्व’ असा शब्द वापरते. 
 
गौरी टिळक ‘माझे बाबा’ कवितेत म्हणते,‘तुम्ही काळजी करू नका भविष्यकाळाची, मी आहे ना ‘तुमचा मुलगा.’गौरी इथे मुलगी असून आधार बनण्याची ग्वाही देते, त्याच वेळी  समाजाच्या दांभिकतेवरही कोरडे ओढते. आता आमच्या या उगवत्या पिढीनं, सांगा कोणाकडे पाहून चालावे? एवढीच वाटते खंत. 
 
या ओळी वाचताच मेंदू बधीर होतो अन‌् जयश्री गायकेच्या या रचनेला “सही!” ही दाद देण्याशिवाय पर्यायच उरत नाही. ही वैचारिक प्रगल्भता अशा कवितांचा आत्मा आहे. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे ‘प्रगती’ या रश्मी भुरे हिच्या कवितेतील ओळी,खूप केले सहन अन्याय आता उठून जागे झाले पाहिजे.
 
स्त्रीने काळोख झटकून प्रकाशद्वाराकडे गेले पाहिजे. वैचरिक, निसर्ग, वर्तमानातील विविध समस्या, आई-बाबा अशा अनेक विषयांवर मुली-मुलांनी भरभरून लिहिले आहे. त्यांना साजेशी चित्रंही यात येतात. मर्यादांचा विचार करता हा एक मोठा प्रकल्प आहे, याची आपल्याला खात्री पटायला लागते. मुलांच्या या अनुभवविश्वाला किती कंगोरे आहेत, याची प्रचिती पानोपानी येते. काही ठिकाणी अनुकरण जाणवत असलं तरी प्रत्येकाने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. 
काही उदाहरणे पाहू.

- माणसे जगणार कशी? हिंमत जगण्यात नाही, माणूस माणसास मारी, जगण्यास रीत नाही ! (जग – शीतल शिंदे)
 
- जीवनाविषयी, एकंदरीत सामाजिक परिस्थितीविषयीचे निरीक्षण सूक्ष्मपणे मांडण्याचं कसब इथं कवींनी दाखवलं आहे.
 
- जेव्हा जळेल हिंसेची होळी, तेव्हाच होईल खरी दिवाळी. (खरी दिवाळी : निधी उंदिरवाडे)
 
- मुलं नेहमी सुंदर भविष्याची स्वप्नं पाहात असतात. अखिल विश्वात शांती नांदो अन‌् प्रत्येक मानव सुखाने जगो, अशा अपेक्षा घेऊन मुलं वाढत असतात. तीच भावना त्यांनी शब्दांत व्यक्त केली.
 
- आई म्हणजे व्यक्तिमत्त्व अफाट, न मागताही सुखे आणणारी पहाट (आई – स्नेहल गोसावी) आईविषयी व बाबाविषयी कवींनी लिहिलं आहे. 
 
- पृथ्वीच्या मतदारसंघात देवांनी सुरू केले इलेक्शन, इंद्रदेवाला जडले पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे टेंशन (देवांचे इलेक्शन– सुमेधा जोशी)
 
निवडणूक विषय घेऊन सूक्ष्मपणे केलेली ही भन्नाट कविता. एकीकडे मार्मिक विनोद आहे तर दुरीकडे आत्महत्या करणाऱ्यांसाठीही एक सुंदर कविता यात आहे. काटे पाहून जगण्याची आशा सोडू नका, आपुले मंगल जीवनगाणे मध्येच संपवू नका. (जीवन असे जगावे – ऐश्वर्या गोरे)
 
‘लढा प्रकल्पग्रस्तांचा’ ही कविता सरळ भिडते. त्यातले बारकावे मनाला गदगदून सोडतात. गरिबी, गरिबांचं जीवन यावर कवींची लेखणी अंतर्मुख करते. कवींनी विद्यार्थी या नात्याने आपल्या शिक्षणपद्धतीवर कडाडून हल्ला चढवलाय. परीक्षा, गणिताचं काठिण्य, शाळा अन‌् अभ्यास या विषयावर कविमंडळी व्यक्त झाली आहे. 
 
वास्तवाचं भान यातून स्पष्ट होतं. नव्या पिढ्या बदलांचं प्रतिनिधित्व करतात, याची या कवितातून खात्री पटते. शिवाजी अंबुलगेकर यांनी पाठ्यपुस्तकातील काही निवडक कवितांचा ‘गोरमाटी’ व ‘अहिराणी’ या संवादभाषांत मुलांकडून करून घेतलेला अनुवाद हे या संग्रहाचं एक वैशिष्ट्य. यासोबत मूळ मराठी कविता दिल्या असत्या तर अजून मज्जा आली असती.
 
 एक ठोस वैचारिक भूमिका घेऊन हे संकलन केलं गेलं असल्याने, बालसाहित्यात अशा प्रयोगांना एक बैठक प्राप्त झाली आहे. या पुस्तकावर प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संकलकांची भूमिका पाहता मुलांचं साहित्य म्हणजे एकदम पातळ केलेला विषय नव्हे तर जबाबदारपणाने करायचं काम आहे, हे स्पष्ट होतं. आवर्जून वाचावं असंच हे  ‘सृजनपंख’ तुम्हाला निश्चित एका वेगळ्या अन‌् हव्याहव्याशा जगात सैर करून आणेल, यात कसलेच दुमत  नाही.
 
पुस्तकाचे नाव  :  सृजनपंख
संपादक            :  प्रा. स्वाती काटे, डॉ. पृथ्वीराज तौर   
प्रकाशन            :  सायन पब्लिकेशन प्रा. लि., पुणे
मूल्य                :  Rs.125/-

(farukskazi82@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...