आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेचे बीजगोळे ‘माझी कविता’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी दिली जाते खरी, मात्र त्याला विषयाची चौकट घालून दिली जाते. किंवा मुलांना वाचनाचे खूप कमी अनुभव मिळतात, ज्यामुळे लिहिताना त्यांच्या कल्पनांना मर्यादा पडतात. अन‌् मुलांचे लेखन ही केवळ अभिव्यक्ती न उरता एक यांत्रिक क्रिया होऊन जाते. त्यात जिवंतपणा अनुभवाला येत नाही. पालक व शिक्षकांनी यावर विचार करायला हवा.

मूल वाचायला, चर्चा करायला शिकलं की, त्याच्यात लिहिण्याची ऊर्मी जागी होते. रस्किन बाँड म्हणतो की, ‘जितकं अधिक वाचतो तितकं अधिक आपण लिहितं होतो.’ मुलांच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो. मुलं जितकं वाचतील तितकंच लिहायला लागतील. वाचलं त्यावर चर्चा, ते वाचन मूल, शिक्षक किंवा पालक यांनी केलेलं असू द्या, त्यावर चर्चा करायला हवी. त्यातून मूल नेमकं काय वाचावं, वाचलेल्यातून काय घ्यावं, हे समजून घेतं. त्याचा परिणाम त्याच्या लेखनात दिसून येतो.

आपल्याकडे असं फारसं होताना दिसत नाही. मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी दिली जाते खरी, मात्र त्याला विषयाची चौकट घालून दिली जाते. किंवा मुलांना वाचनाचे खूप कमी अनुभव मिळतात, ज्यामुळे लिहिताना त्यांच्या कल्पनांना मर्यादा पडतात. अन‌् मुलांचे लेखन ही केवळ अभिव्यक्ती न उरता एक यांत्रिक क्रिया होऊन जाते. त्यात जिवंतपणा अनुभवाला येत नाही. पालक व शिक्षकांनी यावर विचार करायला हवा.

मंजुषा स्वामी या कविमनाच्या शिक्षिका. नवीन उपक्रम करता करता त्यांनी मुलांना लिहितं केलं अन‌् त्यांच्या रचना एकत्र करून ‘माझी कविता’ भाग १ व २ अशी दोन पुस्तके प्रकाशित केली. दोन्ही पुस्तकांत एकूण ७४ कविता आहेत. यात काही हिंदी व इंग्रजीही आहेत. या कविता या मुलांचे प्राथमिक लेखन आहे, म्हणूनच या लेखाला शीर्षक ‘कवितेचे बीजगोळे’ असं दिलंय. हळूहळू हे बीजगोळे रुजतील अन‌् त्यांचे वृक्ष बनतील. त्यातून लेखक–कवी निर्माण होतील, असा भाबडा आशावाद न ठेवता यातून चांगले विचारी वाचक निश्चित तयार होतील, असं ठामपणे म्हणता येईल. शिरीष पै, प्रवीण दवणे, राजेंद्र अत्रे, बालाजी इंगळे यांनी या संग्रहासाठी प्रस्तावना व शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझी कविता’मधील बहुतांश कविता झाड, शाळा, आई, ज्ञान, शिक्षक, पोपट किंवा इतर पक्षी या विषयांवर आहेत. काही वेगळे विषयही मुलांनी हाताळले आहेत. काही कवितांत तोचतोचपणा आढळत असला तरी मुले एकाच विषयावर कशी भिन्न पद्धतीने लिहू शकतात, याचा हा उत्तम नमुना आहे. मुलांच्या रचना त्यांनी लिहिल्या तशाच घेतल्या असाव्यात, असे एकंदरीत संकलनावरून वाटते. कारण काही ठिकाणी यमक, उपमा, प्रतिमा याबाबत संपादकीय संस्कारांची गरज जाणवली. इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी यात लेखन केले आहे. मंजुषा स्वामी यांनी परिश्रम घेऊन या संकलनाचे काम केले आहे. त्यांच्या मेहनतीचे कौतुक करायला हवे. कारण हे काम वरवर पाहता जरी सोपे वाटत असले तरी ते खूप कष्टदायी असते. 

अर्जुन क्षीरसागर, नूरजहाँ तांबोळी, टेकाळे रेणुका, कोरडे योगेश्वरी, लगास प्रगती, नाईकवाडी प्रथमेश, नन्नवरे अश्विनी, कुर्वलकर गणेश, लोंढे प्रशांत, तांबोळी मुस्कान, काझी मुस्कान, पवार आदेश, फाटक आदित्य, प्रतिक्षा पवार, निकिता शिंदे, आदित्य बोकेफोडे, शिवानी वीर, सुशील नाईक नवरे, देवकर प्रीती, ओम शिंदे, श्वेता शिंदे, प्रगती कदम, नेहा वीर, वाकुरे साक्षी, वैभवी कानडे, आल्फिया शेख, निकिता शिंदे, आदित्य इंगळे, पोर्णिमा बोकेफोडे, आकांक्षा कांबळे या विद्यार्थ्यांनी यात कविता लिहिल्या आहेत. मंजुषा स्वामी यांच्या काही कविता यात समाविष्ट आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांच्या रचना एकत्रपणे आपल्याला इथं वाचायला मिळतात. मुलांनीच केलेलं मुखपृष्ठ अन‌् सुंदर बांधणी असलेली ही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत.

डॉ. प्रा. राजशेखर हिरेमठ यांनी हे पुस्तक प्रकाशित करून एक प्रयोगशील पाऊल टाकलं आहे. शाळाशाळांतून असे प्रयोग व्हायला हवेत. अशा प्रयोगांना वाचकांनी स्वीकारलं पाहिजे. प्रौढांच्या लेखनाला जे स्थान असतं ते किंबहुना त्याहून अधिक महत्त्व मुलांच्या या प्रयोगशील नवनिर्मितीला द्यायला हवं. मंजुषा स्वामी यांच्या पुढील प्रयोगांसाठी शुभेच्छा.
 
- फारूक ए. काझी, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...