आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘परीक्षा पुन्हा सुरू करा. परीक्षा नसतील तर मुले अभ्यास करणार नाहीत’’ अशी याचिका न्यायालयाने नुकतीच फेटाळली. नापासची भीती असेल तरच मुले अभ्यास करतील अन्यथा नाही, असा एकूण युक्तिवाद होता. आजच्या मूल्यमापन पद्धतीत दोष आहेत. त्यात वस्तुनिष्ठता आली पाहिजे. पण आज भीती नसेल तर शिक्षण होऊच शकणार नाही, अशी शिक्षक व पालकांची समजूत आहे. घरात आणि शाळेत भीती असेल तरच मुले चांगली वागतील किंवा शिकतील यावर शासन, शाळा, घर या सर्वांचे एकमत आहे. कायदे अधिकाधिक कडक करण्याची शासनाची भूमिका तीच असते आणि धर्मसुद्धा नरकाची मृत्यूनंतरच्या जीवनाची भीती दाखवून माणसांना चांगले वागण्याचा दम देतो... भीती असेल तरच माणसे चांगली वागतील असे समाजमनाचे गृहीतक आहे...
कृष्णजी सातत्याने भीतीविषयी बोललेले आहेत. आपण भीतीचे परिणाम खूप ढोबळपणे चर्चितो, पण ते भीतीचा खूप खोलवर धांडोळा घेतात. त्यांना भीती ही माणसाची सर्जनशीलता कुरतडणारी गोष्ट वाटते. भीती असेल तर शिकण्याची प्रक्रियाच होऊ शकत नाही, असे त्यांचे प्रतिपादन आहे.
पण वास्तवात मात्र आमची संपूर्ण शिक्षण प्रक्रियाच मुळी भयावर आधारलेली आहे. भीती हाच शिक्षणाचा पाया आहे. नापाशी शाळांमधील कठोर शिक्षा, मुलांच्या आत्महत्या, धाक, स्पर्धा ही सारी भयाचीच रूपे आहेत. तरच मुले शिकतील असा सर्वांचाच समज आहे. कृष्णमूर्ती भीतीचे खूप दुष्परिणाम सांगतात. हळूहळू भीतीमुळे तुम्ही कोमेजून जाता, विघटित होत जाता हे लक्षात घ्यायला हवे. भीती व र्‍हास या परस्पर संबंधित गोष्टी आहेत. ते म्हणतात, भीती हा रोगच आहे. ती चिघळत जाणारी जखम आहे. ती तुमच्या संवेदनशीलतेला, तुमच्या बौद्धिक-नैतिक गाभ्याला कुरतडून खाऊन टाकत असते. म्हणून भीतीची समस्या सोडवली की मानवी र्‍हासाचाही प्रश्न निकालात निघू शकतो.
कृष्णमूर्तींना भीती ही म्हणूनच आक्षेपार्ह वाटते. शाळेतील शिक्षणात भीती अजिबातच नसावी असेच त्यांचे म्हणणे होते. ते म्हणतात, ‘‘भीती नसेल तरच मुले शिकू शकतात. केव्हातरी तुम्ही शिकत असताना स्वत:चे अवलोकन करून बघा. त्या वेळी तुम्ही कोणत्या मन:स्थितीत असता? जेव्हा तुम्हाला भीती वाटत नसते तेव्हाच तुम्ही शिकू शकता... प्रश्न असा आहे की, गणित किंवा दुसरा कोणताही विषय तुम्ही अधिकाराशिवाय आणि म्हणूनच निर्भय स्थितीत कसा शिकवाल... स्पर्धा म्हटली की तीत भीती आलीच आणि भीती आली की शिक्षण बंद पडते. तेव्हा भीती घालवणे, यांत्रिकपणा न येऊ देणे व त्याच वेळी ज्ञानही देणे हे शिक्षणाचे कार्य आहे.’’ कृष्णमूर्ती नेमकेपणाने शिक्षणाचे कार्य स्पष्ट करतात.
याच भूमिकेतून कृष्णमूर्ती शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकत्रच राहतात, एकत्र जेवतात, एकत्र खेळतात. शिक्षकाची मुलांना भीती वाटत नाही. या शाळेत स्पर्धा नसते.
राजघाटला परीक्षा नसेल तर मुले शिकतील की नाही या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘जेव्हा एखाद्या विषयात गोडी लागते व जेव्हा आनंदी असता तेव्हा तुम्ही त्याचा तुम्ही चांगला अभ्यास करता... पण जेव्हा तुलनेची भीती असते तेव्हा तुम्ही शिकत नाही. परीक्षा, कौतुक, तुलना आणि परीक्षा यांनी जगात कोणतीच सृजनशील माणसे निर्माण केली नाहीत. या पद्धतीतून यंत्रवत काम करणारे कारकून हिशेब ठेवणारी निस्तेज मनाची माणसेच निर्माण झाली...’’
तेव्हा थोडक्यात ते भीतीने तो विषय शिकवण्याच्या हट्टापेक्षा त्या विषयात गोडी लावण्याचा आग्रह धरतात. हे उत्तर दीर्घकालीन असल्याने शिक्षक-पालक धाकाने ती बाब मुलांकडून करवून घेतात. मुलांचे मनपरिवर्तन करण्याचा वैताग वाटतो.
तेव्हा मुलांना भीतीमुक्त वाढवण्याचा मुद्दा कृष्णमूर्ती मांडतात. शिक्षकांना ते म्हणतात, ‘‘विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भयमुक्त होण्यास तुम्ही कशी मदत कराल... जिव्हाळ्याने विद्यार्थ्याला निर्भय करण्याची प्रत्येक संधी उपयोगात आणा... त्याला भीतीची कारणे स्पष्ट करून सांगा... आणि त्याला भय कसे वाटते ते प्रत्येक प्रसंगी दाखवून द्या... भीतीचे भान ठेवायला सांगून त्याला अंतरंगाकडे वळण्यास मदत करा...’’