आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षण शाळेतले (वाचक प्रतिसाद)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहावीची परीक्षा झाल्यावर, मनात आलेल्या भावना मांडल्यात या तरुण मैत्रिणीने

दिनांक ३ मार्च २०१५ या दिवशी सकाळी सर्वात आधी उठल्यानंतर याची जाणीव झाली की, आज दहावीचा पहिला पेपर आहे. त्या दिवशी मन स्थिर नव्हतंच. अगदी असं वाटत होतं, कधी एकदा तो पेपर आपल्या हातात येतो. शेवटी कसाबसा तो पेपर हातात पडला.

पेपर खूप सोपा होता. हळूहळू सर्व पेपर एकामागून एक होत गेले. जर कोणी परीक्षेला जात असेल तर आपण त्याला शुभेच्छा देतो. किती मोठी जादू असते ना त्या शब्दांत. फक्त Best of Luck कोणी म्हटलं तर मन हलकं होतं.

शेवटी दिनांक २० मार्च २०१५ या दिवशी दहीसाखर खाऊन मी दहावीच्या शेवटच्या पेपरसाठी सज्ज झाले. परीक्षा एकदाची संपली! आता, दहावीनंतर काय, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.

आता पुन्हा आपल्याला शाळेत जाता येणार नाही, आता आपण काॅलेजला जाऊ, ही भावना माझ्या मनात घर करत होती. आपली पावलं शाळेच्या वाटेपासून दूर गेली आहेत, हे कळू लागले. शाळा पुन्हा कधी भेटेल का? ते मित्र, मैत्रिणी भेटतील का, असे हजारो प्रश्न मनात उभे राहिले.
याच शाळेत मी अनेक गोष्टी मिळवल्या आहेत.
स्वप्नातला पाऊस नेहमी कोरडा
मग तो मृगाचा का असेना
सावलीचा रंग नेहमी काळा
मग ती गोऱ्या व्यक्तीची का असेना
आकाश नी धरती नेहमीच वेगळे
मग ते क्षितिज का असेना
आपली मैत्री नेहमीच निखळ
मग ती नवी- जुनी कशी का असेना...

असं म्हणत मैत्रीचे ते प्रत्येक क्षण मी जगले. भांडण, रुसवे-फुगवे सर्व त्यामध्ये होतं. पण ते सर्व पुन्हा मिळणार नाही. आता प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या असतील. आम्ही सर्व पाखरांप्रमाणे वेगवेगळ्या दिशांना उडण्याचा प्रयत्न करणार, भविष्यासाठी धडपडणार. खऱ्या अर्थाने जीवनाची सुरुवात होणार.

फक्त लक्षात ठेवलं पाहिजे ‘दु:ख’ डिलिट केलं पाहिजे, ‘आनंद’ सेव्ह केला पाहिजे, ‘मैत्री’ डाउनलोड केली पाहिजे अन ‘स्मितहास्य’ सेन्ड केल पाहिजे. मग बघा आयुष्याची रिंगटाेन किती मधुर वाजते ते.