आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍त्रीवाद मुरलेली कविता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहाची असो वा साठीची, बाई हक्काने भोगायची
प्रेमाला नकार दिला तर, प्रेयसीसुद्धा जाळायची
जगताना दुस-यालाही, थोडे जगू द्यायला शिका
आलाच आहात माणसाच्या जन्माला
तर थोडे माणसासारखे जगून बघा.
अश्विनी धोंगडे यांच्या या ओळी. अश्विनी धोंगडे हे नाव तसं साहित्यक्षेत्रात स्त्रीवादी लेखिका म्हणून परिचित आहे. प्रा. द. के. बर्वे यांची ही कन्या. लेखिका म्हणून जडणघडण होताना वडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले तर स्त्रीवादी खंबीर मन आईच्या अनुभवातून आकाराला आले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. लेखनाच्या सुरुवातीला विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रज यांच्या कवितेने प्रभावित झालेले मन हळूहळू समज-उमज आल्यानंतर वेगळ्या वाटेवर येऊन पोहोचले आणि नंतर कायमचे तिथेच स्थिरावले. पुढे पारंपरिक जीवनपद्धती आणि बदलत्या जीवनजाणिवांचा संघर्ष हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला.


स्त्रियांच्या जीवनातील गद्यमयता, तोचतोचपणा, कंटाळवाणेपणा, तिची दुय्यम भूमिका, हुंडाबळी, शरीराचं भांडवल करून फायदा मिळवण्याची वृत्ती अशा अनेक विषयांवरील कविता ‘स्त्रीसूक्त’, ‘अन्वय’, ‘अपौरुषेय’ या काव्यसंग्रहांतून भेटतात. त्यांचे ‘स्त्रीवादी समीक्षा’, ‘संदर्भ : स्त्री-पुरुष’ हे समीक्षाग्रंथ प्रकाशित आहेत. तसेच ‘वर्तमान’, ‘जगणे सुंदर व्हावे म्हणुनि’ हे ललितसंग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यातून ‘मी कोण?’ आणि ‘मला काय हवं आहे? या प्रश्नांच्या अंगाने स्त्रीजाणिवांचा विचार उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विविध वाङ्मयप्रकार हाताळूनही त्यांचं पहिलं प्रेम कवितेवर आहे आणि त्याचं कारण देताना त्या म्हणतात, ज्यांच्यासाठी मी कविता लिहिली त्यांच्यापर्यंत थेटपणाने जाऊन ती पोहोचते. त्यामुळेच कविता हा वाङ््मयप्रकार श्रेष्ठ आहे. कवितेची ही भिडण्याची क्षमता माहीत असल्यामुळेच स्त्रियांच्या प्रश्नांना समोर ठेवून जाणीवपूर्वक स्त्रीवादी कविता त्यांनी मोठ्या प्रमाणावर लिहिली.
स्त्रीवाद म्हणजे काय किंवा स्त्रीवादी कविता कशी असते या प्रश्नांची उकल करताना त्या लिहितात, ‘स्त्रिया उदंड कविता लिहितात, पण त्या कविता स्त्रीवादी असतातच असं नाही. काहीएक विशिष्ट भूमिका स्वीकारून कविता लिहिणा-या फार थोड्या कवयित्री आहेत. स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या, अन्यायाला-अत्याचाराला वाचा फोडणा-या एक-दोन कविता लिहिल्या म्हणून कुणी स्त्रीवादी होत नाही. स्त्रीवाद ही एक चळवळ आहे. तो वृत्तीत आणि कृतीत मुरावा लागतो. म्हणजे मग कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. ‘तळ्यात आणि मळ्यात’ असं एकाच वेळी दोन्हीकडं राहता येणार नाही ही भूमिका पक्की झाली की साहित्यनिर्मिती आपोआप त्या दृष्टीने होते.’


माझ्या देहासाठी कुणी देह झाले
कुणाच्या देहासाठी मी देह झाले
देह देहातुनि अशी शृंखला
मी फक्त या साखळीतील दुवा झाले
मी ‘फक्त’ साखळीतील दुवा झाले ही खंत जेव्हा ‘स्व’ची ओळख करून देते, प्रस्थापित पुरुषी मानसिकतेला नाकारून ती बंड करून उठते तेव्हाच ख-या अर्थाने स्त्रीवादाला सुरुवात होते. ‘स्त्रीवाद’ ही कुणा प्रांताची, राज्याची, घराण्याची, शिक्षणाची, खेड्याची, शहराची मक्तेदारी नाही. ती एक वृत्ती आहे. त्याला स्थळ-काळाच्या मर्यादा नसतात तर परिस्थितीच उद्गाती असते.


कुणी तळ्यात-कुणी मळ्यात, पण सगळ्याच जाळ्यात, कुणी शिकलेल्या कुणी अडाणी, पण सगळ्यांचीच बंद वाणी
असे चित्र सर्वत्र असल्यामुळेच सोशिकतेसाठी अजरामर असलेली खेड्यातली दीनदुबळी, लाचार बाई एक मर्यादा संपल्यानंतर हातातली काकणं मागं सरकवून कमरेला पदर खोचते आणि त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार करून ठणकावून (ये तुला दाखवतेच इंगा) उभी राहते. मला वाटतं, तिथंच स्त्रीवाद सुरू होतो आणि हाच स्त्रीवाद साहित्यात अपेक्षित आहे. स्त्रीमध्ये संकटात समस्येसमोर उभे ठाकण्याचे बळ निर्माण करणे, मी बाई असले तरी माणूस (बाईमाणूस) आहे हा विचार निर्माण करणे, सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवणे, ना की परिस्थितीला शरण जाऊन तडजोडी करत राहणे. या विचाराचे बीज रोवणे म्हणजेच स्त्रीवाद आहे आणि हे मूल्य घेऊन येणारी कविता म्हणजे स्त्रीवादी कविता होय.


या विधानाला समर्पक असे लेखन अश्विनी धोंगडे यांनी आजपर्यंत सातत्याने केले आहे. अगदी अलीकडेच त्यांचा ‘बाई डॉट कॉम’ हा कवितासंग्रह आला आहे. त्यात त्यांनी निवडक 56 कविता घेतल्या आहेत. बालवयापासून म्हातारपणापर्यंतच्या जीवनप्रवासातील एका स्त्रीच्या जीवनातील घटनाक्रम त्यात आहे. मुलगी, सासू, सून, आजी, नात, मैत्रीण, पत्नी, लेखिका अशा विविध भावभावनांच्या कल्लोळात एक स्त्री कशी व्यापून आहे आणि शेवटी कशी या सर्वांपासून एकटी, अलिप्त आहे अशी मोठी मनोहारी पण चुटपुट लावणारी कविता त्यांनी लिहिली आहे.
ती कोरडी झाली, तसे त्याचे शब्द आटत गेले
कातडी सुरकुतली तेव्हा, संभाषण मुके झाले.
कुठल्याही बाईच्या आयुष्यातील हे महत्त्वाचे प्रसंग आहेत. नावीन्याने रसरसून जगलेले, तारुण्याचे दिवस कुतूहलाचे नि कौतुकाचे ठरलेले भरजरी क्षण फुलपाखराचे पंख लावून उडून गेल्यानंतर उरतात त्या फक्त आठवणी आणि वस्तीला कायमचे येते अबोलपण, मिचमिच डोळ्यांतून वाहणा-या पाण्यासोबत सर्वांगावर सुरकुत्या जेव्हा जाळं विणतात तेव्हा हसतेखेळते जगसुद्धा तिच्यासाठी दूरस्थ परके बनून जाते. अशाच आशयाची ‘एका लेखिकेची संध्याकाळ’ ही कविता म्हाता-या झालेल्या पण एकेकाळी सभा-संमेलने गाजवणा-या व हारतु-यांच्या फुलांमध्ये गुदमरून जाणा-या तरुणपणाची आठवण जपत म्हातारपण अनुभवणा-या संवेदनशील मनाची तगमग व्यक्त करणारी आहे. वेगवेगळ्या वयोगटांतील स्त्री जगणे कसे व्यापून आहे, याचे प्रत्ययकारी चित्र अश्विनी धोंगडेंनी उभे केले आहे.