आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलखेचक कलाबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बर्फी’ चित्रपटाने आज वयाच्या चाळिशी-पन्नाशीत असलेल्या अनेकांच्या मनातील ‘मर्फी’ रेडिओ आणि कॅलेंडरच्या आठवणी जागवल्या. आताचा जमाना ‘किंग फिशर’टाइप कॅलेंडरचा असला तरीही एकेकाळचे हे सर्वात लोकप्रिय कॅलेंडर होते. शिवाय गरोदरपणात सुदृढ बालकाचे चित्र घरातल्या भिंतीवर लावायचे, असाही त्या वेळी प्रघात होता. गंमत म्हणजे, ‘मर्फी’ बॉयचा तो कॅलेंडरवरचा फोटो नव्हता तर ते एक चित्र होते.

राजा रवीवर्मापासून ‘मर्फी’पर्यंत लोकप्रिय असलेली कॅलेंडर ही स्वस्त, सहज हाताळता येणारी आणि भिंतीच्या शोभेत भर घालणारी वस्तू होती. कॅलेंडर आर्टची लोकप्रियता लक्षात घेऊन अनेक चित्रकारांनी त्याच्या शैलीचा आणि प्रतिमांचा वापर अभिजात चित्रकलेत केला. या कॅलेंडर शैलीला ‘किच’ असे म्हटले जाते. ‘किच’चा ऑक्सफर्ड डिक्शनरीतला अर्थ आहे, ‘अभिजनांच्या शैलीचे अनुकरण करणारी गावठी कला.’ अर्थात, सर्वच कॅलेंडर आर्टमध्ये ‘हात की सफाई’ दाखवण्याचा प्रयत्न असतो. ही आर्ट कॅलेंडरपुरती मर्यादित नसते. सलूनवर असलेला शाहरुख खानचा चेहरा, टेलरिंग स्कूलच्या किंवा टेलरिंग शॉपच्या बोर्डावर असलेले नाना पाटेकरचे चित्र, 80-90 पर्यंतची पोस्टर्स, अशा किती तरी गोष्टी ‘किच’ म्हणजे कॅलेंडर आर्टमध्ये मोडतात. आपल्याकडे भूपेन कक्कर, अतुल दोडिया इत्यादींनी कॅलेंडर आर्टचा वापर आपल्या चित्रकलेत केला आहे. तर परदेशातील मोठे उदाहरण आहे डेव्हिड सालचे. त्याने कॅलेंडर आर्टमधल्या प्रतिमा सढळ हस्ते वापरल्या. त्याबद्दल त्यावर कॉपीराइट भंगाचे खटलेही भरण्यात आले आहेत.

15 जुलै 1972 रोजी 3.32 मिनिटांनी उत्तर आधुनिकतेचा काळ सुरू झाला, असे मानण्यात येते. यात अनेक शैलींचा संकर होतो. म्हणजेच, आधुनिक पद्धतीने बांधलेल्या इमारतीचे स्तंभ गॉथिक पद्धतीचे असू शकतात. आणि मग ती रचना उत्तर आधुनिक रचना म्हणून मानली जाते. त्याच पद्धतीने लोकप्रिय चित्रकलेची शैली प्रामुख्याने बडोद्यातल्या अनेक चित्रकारांनी हाताळलेली दिसते. कॅलेंडर आर्टचे मोठे उदाहरण पु. ल. देशपांडे यांनी ‘पानवाला’मध्ये दिलेले आहे. पानवाल्याकडची चित्र इराणी रेस्टॉरंटमधल्या चित्रांसारखी असतात. ज्यात खाली राधा-कृष्ण उभे असतात, तर वर हेलिकॉप्टर भिरभिरत असते. अलीकडे प्रदर्शित झालेल्या अक्षयकुमार अभिनित ‘राऊडी राठोड’चे पोस्टरही कॅलेंडर आर्टशी नाते सांगणारे आहे. बाबा कदम, श्रीकांत सिनकर इत्यादींच्या कथा-कादंब-यांना जोशी आर्ट्सची मुखपृष्ठे असत; तीही कॅलेंडर आर्टच. तर अर्नाळकरांच्या कादंबरीची पृष्ठे काळ्या हिरव्या किंवा काळ्या जांभळ्या शेडमध्ये असत; तीही कॅलेंडर आर्टच. ट्रकवरील डिझाइन ते साऊथ इंडियन चित्रपटांची पोस्टर आणि जत्रेतील फोटो काढून घेण्यासाठी मागे बनवलेले देखावे हे सारे कॅलेंडर आर्टमध्ये मोडते. प्रामुख्याने चित्रकलेचे रीतसर शिक्षण न घेतलेल्या चित्रकारांनी कॅलेंडर आर्ट रंगवलेले असते.

भडक रंगसंगती आणि शेडिंगचा भरपूर वापर ही कॅलेंडर आर्टची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील. विष्णूच्या बेंबीतून निघालेल्या कमळाच्या दाक्षिणात्य चित्राचा वापर अतुल दोडियाने त्याच्या पेंटिंगमध्ये मोठ्या खुबीने केलेला आहे. एकेकाळी हिंदी सिनेमाची पोस्टर हाताने रंगवली जात. शोले, काला पत्थर, दिवार अशा किती तरी चित्रपटांची पोस्टर्स एका विशिष्ट शैलीत असत. ती शैली म्हणजे, चेहरा रेघारेघांनी रंगवायचा; थोडासा स्केचप्रमाणे. आज पोस्टर्स फोटोवरून छापले जातात, त्यामुळे या कॅलेंडर आर्टला आपण पारखे झालो आहोत. एकेकाळी विविध प्रकारच्या आगपेट्या मिळायच्या. त्यात छोटी-छोटी चित्रे असत. हेलिकॉप्टर, विमान, बदक अशी अंकलिपीसारखी चित्र असत. नंतर ‘शिप बँड’च्या माचिसांनी घाऊक उत्पादन करून ती गंमत घालवून टाकली. जसजसे जग विकसित होत गेले तसे छपाईचे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचत आहे. साहजिकच, स्थानिक चित्रकारांनी केलेली कलेची निर्मिती रोडावली आहे आणि त्यामुळेच कॅलेंडर आर्टचे उत्पादनही कमी झाले. पण कलेतील अभिजनांमध्ये कॅलेंडर आर्टचा वापर मात्र वाढतो आहे, ही विसंगती लक्षात घेण्यासारखी आहे.
shashibooks@gmail.com