आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियाचा ‘पर्दा’फाश!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटांत पत्रकार हे पात्र ठळकपणे पडद्यावर आले ते गुलजार दिग्दर्शित ‘आँधी’ या चित्रपटात. त्यात निवडणुकीसाठी स्थानिक वर्तमानपत्राचा वापर करून मतांचे मॅनिप्युलेशन करताना दाखवण्यात आले होते, तर ऐंशीच्या उत्तरार्धात आलेल्या ‘न्यू दिल्ली टाइम्स’ या रोमेश शर्मा दिग्दर्शित चित्रपटात राजकारणी आणि मीडिया यांच्यातील भ्रष्ट संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला होता. एक अत्यंत प्रामाणिक पत्रकार आपले गाव सोडून राजधानीच्या शहरात येतो, स्वत:चे वृत्तपत्र सुरू करतो आणि एका राजकीय खुनाचा शोध घेता घेता भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग होऊन बसतो. त्या वेळी या चित्रपटाचा धाडसी कथाविषय बघून वितरकांनी तो प्रदर्शित करण्यालाच नकार दिला होता, परंतु त्यानंतर याच चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जाणकारांची वाहवा मिळवली होती. अर्थातच या चित्रपटातील पत्रकारांचे चित्रण वास्तवाशी नाते सांगणारे होते. त्याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘मैं आझाद हूँ’ या चित्रपटातील पत्रकाराच्या पात्राने असेच लक्ष वेधून घेतले होते.

‘मैं आझाद हूँ’ चित्रपटातला एक बातमीदार ‘आझाद’ हे काल्पनिक पात्र निर्माण करत 26 जानेवारीला भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ इंडिया गेट येथे तो आत्महत्या करणार असल्याची खोटी बातमी तयार करतो आणि चित्रपटातील सरकार हादरते. एक तितकीच संवेदनशील व हुशार पत्रकार झालेली शबाना आझमी अमिताभ बच्चनला या ‘आझाद’ नावाच्या पात्राची जागा घ्यायला सांगते, खरोखरच आत्महत्या करावी लागणार नाही याचेही आश्वासन देते. आझाद म्हणून जगत असताना सामान्य माणसाच्या वेदना त्याला कळत जातात, भ्रष्ट व्यवस्थेशी सामना करताना त्याला होणारा त्रास त्याला जाणवत जातो आणि सरतेशेवटी तो निराशेच्या भरात आत्महत्या करतो. वृत्तपत्र खपण्यासाठी बातमी जन्माला घालणारा पत्रकार आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत दाखवत प्रसारमाध्यमांच्या नैतिक मूल्यांसंदर्भात ‘आझाद’मध्ये भाष्य केले गेले, तर याच प्रसारमाध्यमांद्वारे सामाजिक भान जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो, हेदेखील दाखवले गेले. पण सामाजिक भान जागृत करताना, भ्रष्ट व्यवस्थेला जागे करताना काल्पनिक घटना प्रसारमाध्यमांद्वारे घडवल्या जातात, हे आजचे वास्तव दोन दशकांपूर्वीच्या या चित्रपटात दिसले.

दरम्यान, काळानुसार चित्रपटांचेही स्वरूप बदलत गेले. प्रसारमाध्यमे समाज जीवनाचा अविभाज्य भाग होऊ लागली. प्रसारमाध्यमांवर वास्तव भाष्य करणारे आणि प्रसारमाध्यमांना अतिरंजित स्वरूपात पेश करणारे दोन गट चित्रपटांमध्ये तयार झाले. मात्र कल्पना आणि वास्तवाचा समतोल मात्र अभावानेच ‘न्यू दिल्ली टाइम्स’सारख्या एखाद्या चित्रपटामध्ये साधला गेला.

अलीकडच्या काळात येऊन गेलेल्या ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ या चित्रपटात शाहरूख खानने पत्रकाराची भूमिका साकारत स्टिंग ऑपरेशन पद्धतीचा वापर करत कथेप्रमाणे गुन्हेगारांचा पर्दाफाश केल्याचे दाखवण्यात आले होते. ‘लक्ष्य’ या चित्रपटाची कथा प्रसारमाध्यमांभोवती केंद्रित नसली, तरी त्या वेळी आपल्या कारगिल रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या बरखा दत्तचा लूक घेत प्रिटी झिंटाने ग्लॅमरस पत्रकाराची भूमिका साकारली होती. ‘फिजा’ या चित्रपटात करिश्मा कपूरने आपल्या भावाला शोधण्याकरता राजकारण्यांबरोबर प्रसारमाध्यमांचा आधार घेतल्याचे दाखवले होते.

रामगोपाल वर्माचा ‘रण’ असो वा मणिरत्नमचा ‘गुरु’ चित्रपट असो; या दोन्ही चित्रपटांमधून प्रसारमाध्यमे सामाजिक जबाबदारीपेक्षा बाजारू बातम्यांचे दुकान मांडू पाहात आहेत, असे दाखवले गेले. अशा अनेक चित्रपटांमधून प्रसारमाध्यमांवर विविध पद्धतींनी विविध अंगांनी फोकस होत राहिला, मात्र बहुसंख्य चित्रपटांनी प्रसारमाध्यमांची उथळ नि सवंग अशी ‘इमेज’ निर्माण केली. थोडे वेगळेउदाहरण म्हणजे ‘नो वन किल्ड जेसिका’. राणी मुखर्जीने एका ग्लॅमरस पत्रकाराची भूमिका यात साकारली. न्यूज चॅनेलला एक शक्ती म्हणून एक सामाजिक घटनेतील समस्या सोडवण्यासाठी एकीकडे वापरले खरे, पण दुसरीकडे न्यूज चॅनेलचे आतले स्वरूप अत्यंत अतिशयोक्त दाखवले गेले. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटातही विद्या बालनच्या भूमिकेद्वारे प्रसारमाध्यमांवर अत्यंत वेगळी अशी मते मांडली गेली.

‘पा’ या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चनने बातम्यांचा वापर केल्याचे दाखवले गेले. प्रसारमाध्यमे वास्तव घटनांना आपल्या पद्धतीने अर्थ काढत जो आकार देतात; तोच समाज पाहतो व लक्षात ठेवतो, त्यानुसार प्रतिसाद देतो. या एका घटकाचा आधार घेत त्याने चित्रपटातील स्वत:ची राजकीय नेत्याची भूमिका वठवली. ‘दिल्ली 6’ या चित्रपटातही अंधश्रद्धेला कळत-नकळत प्रसारमाध्यमे कसे खतपाणी घालतात, हे प्रेक्षकांवर बिंबवले गेले.

2010-11मध्ये आलेला ‘पीपली लाइव्ह’ हा सगळ्या चित्रपटांवरची कडी ठरला. मीडियाने एका गावातील शेतक-याच्या आत्महत्येचा टीआरपीपुरता वापर करून, फेकून दिल्याचे दाखवले गेले. अत्यंत उपहासात्मक पद्धतीने आमिर खानने हबीब तन्वीरच्या नया थिएटरच्या कलाकारांना घेऊन प्रसारमाध्यमांवर ओढलेले ताशेरे त्यानंतर बराच काळ प्रसारमाध्यमांना झोंबले. अर्थात, या मीडियाची अद्याप विश्वासार्हता ब-यापैकी टिकून आहे, हेही दाखवायला आमिर विसरला नाही.
‘पेज थ्री’ या चित्रपटामधून मधुर भांडारकरने प्रसारमाध्यमांमधील व्यावसायिकता, सवंगपणा, गॉसिप बाहेर काढले, ‘फॅशन’मध्येदेखील प्रसारमाध्यमांना स्वतंत्र पात्र म्हणून उभे केले आणि ‘हिरॉईन’मध्ये तर सरळ सरळ प्रसारमाध्यमांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले. ‘राजनीती’ चित्रपट असो वा ‘दबंग 2’ असो, मीडियामधला अतिरंजित हीरोइझम, तात्कालिक ग्लॅमर, फसवेगिरी, नाटकीपणा नेहमी पुढे येत गेला.
priyanka.dahale@dainikbhaskargroup.com