आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृतीची उत्तर भारतीय श्रीमंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडने सुरुवातीपासून उत्तर भारतीय कलाकारांना, लेखकांना, कवी आणि रसिकांना स्वत:कडे आकर्षित केले आहे. आता हा वेगळा प्रश्न आहे की, बॉलीवूडचे हे चित्रपट किती ‘हिंदी’ असतात आणि त्यात किती ‘यूपी-बिहार’ झळकतो? गेल्या काही वर्षांत या चित्रपटांतून ज्या लालू स्टाइल बिहारी भाषेचा उपयोग केला जातोय आणि उथळ, सवंग दर्जाचे बिहारी ‘आयटम डान्स’ दाखवले जात आहेत, त्यामुळे बिहारची प्रतिमा अधिकच कलंकित होत आहे. बिहारी भूमिपुत्रांसाठी बनवण्यात येणा-या भोजपुरी चित्रपटांतही अशाच घाणेरड्या पद्धतीचे नृत्य आणि गलिच्छ संवाद प्रेक्षकांसमोर मांडले जात आहेत; त्याचे काय करायचे, हा प्रश्न आहेच. मदर इंडिया, दो बिघा जमीन, गंगा-जमुना आदी चित्रपटांतून उत्तर प्रदेश-बिहारची वास्तववादी प्रतिमा मांडली होती. ‘उपन्यास सम्राट’ मुंशी प्रेमचंद यांच्या ‘गबन’ आणि हीरा-मोती यांसारख्या कथांमधूनही यूपी-बिहारची झलक मिळते. हा विलक्षण योगायोगच मानावा लागेल, की प्रेमचंद यांच्या नावामागे ‘मुंशी’ ही उपाधी मुंबईतच लाभली.
युपी-बिहारच्या अनेक लोकांनी बॉलीवूडला मोठे करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचा संघर्ष आणि त्याग दुर्लक्षून चालणार नाही. यातील काही कलावंतांची नावे घेताना समस्त यूपी-बिहारची मान गौरवाने उंचावते. यांच्यात कमाल अमरोही, किदार नाथशर्मा, एस. एम. नवाब, नौशाद, निम्मी, मीना कुमारी, नर्गिस, रोशन सेठ, नसीर हुसैन, चित्रगुप्त, शैलेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, शेखर सुमन, प्रकाश झा, मनोज बाजपेयी, मुझफ्फर अली, इम्तियाज अली अशा नव्या-जुन्या पिढीतील अनेकांचा समावेश होतो.
याच प्रकारे यूपी-बिहारच्या अनेक साहित्यिकांनी, पत्रकारांनी मुंबई, महाराष्‍ट्रात आपले बस्तान बसवले आणि देशासमोर मुंबई आणि महाराष्‍ट्राची एक उदारवादी, स्वागतोत्सुक प्रतिमा कायम ठेवली. यात होते ‘बॉम्बे क्रॉनिकल’चे संपादक सय्यद अहमद बरैलवी. उत्तर प्रदेशातील बरेलीशी त्यांचा संबंध होता. बरैलवी हे ‘ऑॅक्सफर्ड रिटर्न’ होते, देशप्रेम त्यांच्या हाडामांसात भिनलेले होते. महात्मा गांधी त्यांचे आदर्श होते आणि धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी काँग्रेस त्यांचा आवडता पक्ष. 1924मध्ये त्यांना या ब्रिटिश विरोधी इंग्रजी वृत्तपत्राचे संपादकपद लाभले. ब्रिटिश नीतींचा विरोध करण्यासाठी त्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ उठवला. त्यांच्या सोबत या वृत्तपत्रात इतरही अनेक राष्टÑवादी पत्रकार होते. के. ए. अब्बास यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात याच वृत्तपत्रामधून केली. बरैलवींच्या ‘क्रॉनिकल’ने त्या वेळच्या ब्रिटिश समर्थक ‘टाइम्स ऑफ इंडिया’लाही मात दिली होती. मुंबईतील ओव्हल मैदानासमोर, केसी कॉलेजजवळचा त्यांच्या नावाचा रस्ता आजही यूपीच्या या झुंजार, नीडर पत्रकाराची आठवण जागवतो...
हिंदी-उर्दू पत्रकारितेतही अनेक नामांकित पत्रकार, लेखक तेव्हा कार्यरत होते. उर्दूतील दैनिक ‘इन्कलाब’ 1938पासून विपरीत परिस्थितीतही निघत होते. याचे मालक-संपादक अब्दुल हमीद अन्सारी यांनीही ‘इन्कलाब’च्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान दिले. खालीद अन्सारी या त्यांच्या मुलानेच पुढे ‘मिड-डे’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करून मुंबईतील इंग्रजी पत्रकारितेला एक नवे वळण दिले. 1936 पासूनच यूपीच्या गुलाम अहमद खान यांचे ‘हिंदुस्थान’ हे उर्दू दैनिक निघत आहे. गेली 30 वर्षे त्यांचा मुलगा सरफराझ आरजू याचे संपादन करत आहे. मुंबईत तेव्हा इतर उर्दू पत्रकारितेपासून वेगळी परंपरा चालवणारे एक संपादक होते, उर्दू ‘ब्लिट्झ’चे संपादन हसन कमाल. त्यांनी 25-30 वर्षांतच उर्दू ब्लिट्झला इंग्रजी वर्तमानपत्राच्या बरोबरीत आणले होते. याशिवाय तेव्हा हिंदी ‘ब्लिट्झ’चे प्रसिद्ध संपादक नंदकिशोर नौटियाल होते. ‘धर्मयुग’ या प्रसिद्ध हिंदी साप्ताहिकाचे संपादक, विख्यात लेखक, कवी, दार्शनिक डॉ. धर्मवीर भारती हे मूळचे अलाहाबादचे होते. यांना मुंबईबद्दल इतके प्रेम होते, की निवृत्तीनंतरही ते अलाहाबादला गेले नाहीत. ते म्हणायचे, ‘मुंबई मेरा गांव है।’ केवळ मुंबईतच नव्हे, तर महाराष्‍ट्राच्या अन्य शहरांतही यूपी-बिहारमधून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे, ज्यांनी हिंदीच्या विकासात आपले मोठे योगदान दिले आहे.
खरे तर हे आहे की, कोणत्याही ‘परप्रांतीया’ला मुंबईत जगण्यासाठी आवश्यक गोष्टी कशाही करून मिळतातच. पण आयुष्य हे फक्त अशा गोष्टींनीच जगता येत नाही. कधी कधी त्याला आपल्या असण्याची शाश्वतीही लागते. घुसमटून टाकणा-या वातावरणातून मुक्तीही हवी असते. आंतरिक स्वातंत्र्य हवे असते आणि आपल्या आवडी-निवडीप्रमाणे राहण्याचा, विचार करण्याचा आणि जगण्याचा अधिकारही हवा असतो. सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्तता हवी असते. तसेच काही कपडे, डोक्यावर हक्काचे एक छप्पर हवे असते. आणि यासाठी पैसे मिळवून देणारा एखादा व्यवसाय, नोकरी, धंदा. कामे कुठेही मिळतात, पण याशिवायही काही विशेष जे यूपी-बिहारच काय, देशातल्या कोणत्याही भागात क्वचितच मिळते ते फक्त महाराष्‍ट्रात, मुंबईतच! सामान्य यूपी-बिहारी माणसाची गोष्ट सोडा, सरदार जाफरींसारख्या माणसालाही मुंबईत अशी काही ‘कशीश’ आढळली की, त्यापुढे लखनऊच्या रंगिल्या रात्री आणि बनारसची आध्यात्मिक पहाटही ते विसरले...
(समाप्त)
ashrafin33@yahoo.com