Home | Magazine | Madhurima | first-anniversary-marriage-seema

दारात रांगोळी आणि सासूबाईंनी घरी बनवलेला केक...

सीमा गोखले, माहीम मुम्बई | Update - Jun 04, 2011, 12:09 PM IST

सासर म्हटलं की कटू आठवणीच जास्त. मात्र, आता परिस्थिती हळूहळू बदलतेय. चला तर मग, लग्रानंतर सासरी झालेल्या पहिल्या वाढदिवसाचे काही गोड- काही हळवे क्षण वाटून घेऊया, सासरचा पहिला वाढदिवस या सदरातून....

  • first-anniversary-marriage-seema

    पूर्वीच्या काळी होत असे तसेच माझे लग्न झाले. म्हणजे कांदे-पोहे, चहा आणि प्रश्रोत्तरे वगैरे. मी माहेरची देशस्थ, तर 'हे' पक्के कोकणस्थ. लग्न झाल्यावर हा फरक तीव्रतेने जाणवायचा. सासरे आता काय करत आहेत, यावरून घड्याळात किती वाजले आहेत, याचा अंदाज यायचा. घरी सर्वांनाच वाचनाची आवड. त्यात मी ग्रंथपाल असल्याने मलाही छान वाटले. आमचे हे रोज बॅडमिंटन खेळतात, पण मी मात्र कॅरमवाली.
    लवकरच मी नवीन घरी स्थिरावले. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण असायचेच. ते सर्व रीतिरिवाजाप्रमाणे होत असत. बघता बघता माझा वाढदिवस आला. आईने विचारले, तुमचा काय प्लॅन आहे वाढदिवसाचा. इकडून काहीच विषय निघाला नव्हता त्यामुळे मी तिला आम्ही तिकडे जेवायला येऊ असे सांगितले. माझा थोडा मूड ऑफच झाला होता पण स्वत:हून विषय कसा काढावा, हेही कळेना. आईने फोनवरून आम्ही दोघे आणि सासू-सासरे सर्वांनाच दुपारी जेवायला बोलावले. अनायासे रविवारच होता त्यामुळे सगळ्यांनीच ते मान्य केले. पण, जास्त वेळ थांबायला जमणार नाही, एवढेच सासूबाईंनी आईला सांगितले. इकडच्या लोकांनी सकाळी एकदा मला फक्त हॅपी बर्थ डे म्हटलं होतं, काही देण्याघेण्याचा प्रश्रच नव्हता. रविवारी अकराच्या सुमारास सगळे माहेरी जेवायला गेलो. गप्पाटप्पा, जेवण झाले. आईने छान साडी घेतली. जेवून आम्ही लगेच घरी आलो. तर एकदम कायापालट होता. नणंदा आणि त्यांची मुले, यांचा एक खास मित्र त्याच्या बायकोबरोबर स्वागताला हजर होते. दारात रांगोळी, घरी केलेला फुलांचा हारा. आम्ही जाताच सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केल्याने एकच गलका झाला. सासूबाईंनी घरी केलेला त्यांचा स्पेशल बनाना केक कापला. मग औक्षण, नाव घेणे असे कार्यक्रम झाले. मामी, अब एक साल के बाद आप की आप के पतिदेव के बारे में क्या राय है, असे विचारून भाच्यांनी भंडावून सोडले. या सर्व प्रकारात आमचे सख्खे शेजारीही सामील झाले होते. आणि अचानक मला लक्षात आले की यांचा कुठेच पत्ता नव्हता.
    त्यामुळे या सगळ्या हास्यविनोदात माझी एक नजर दारावर होती. थोड्या वेळाने हे आणि त्यांचा मित्र टॅक्सीतून उतरले ते भलामोठा चॅम्पियन बोर्ड हातात घेऊनच. आता रोज आम्हा म्हाता-यांशी कॅरम खेळायचा हं, माझ्या सास-यांनी सांगितले. आणि मला रडूच फुटले. कोणालाच काही कळेना मी रडू का लागले ते. पण मी सावरून म्हटले की, अहो, हे आनंदाश्रू आहेत. तुम्ही मला एकावर एक असे धक्के दिलेत मी मलाच कळेना काय होतंय ते. नणंदा लगेच म्हणाल्या, बघ बघ नवरा किती आवड जपतोय तुझी. आम्हाला विसरला हो अगदी दादा. नंतरही अनेकदा वाढदिवस झाले, छान भेटी मिळाल्या, पण हा पहिला वाढदिवस लाजवाब होता.


Trending