आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधि केलेचि पाहिजे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी मागे सांगितल्याप्रमाणे स्त्रीचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र असणे गरजेचे आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, राहणीमान आणि मानसिकता असे चार प्रमुख भाग करता येतील. आत्तापर्यंत पहिल्या तीन विषयांबद्दल आपण बोललो आहोत, आता यापुढील लेखांमधून आपण मानसिकतेचा सकारात्मक विकास कसा व्हायला हवा, याविषयी चर्चा करणार आहोत.
मानसिकता म्हणजे नेमकं काय याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. कारण मानसिकतेत अनेक गोष्टी अनुस्यूत आहेत. प्रामुख्याने तुमची विचार करण्याची पद्धत, विचारांची अभिव्यक्ती, विचारांची मांडणी आणि सर्वात मुख्य म्हणजे त्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला परिणाम या गोष्टी येतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मानसिकता हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या मानसिकतेतून किंवा स्वभावातूनच खरे म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व तुमच्या सहवासात आलेल्या माणसाला समजू शकते. तुमची लोकप्रियता अनेक अंशी तुमच्या मानसिकतेवर किंवा स्वभावावरच अवलंबून आहे.
आपण एकूण 10 मुद्दे या भागात पाहणार आहोत. त्यापैकी आज पहिला मुद्दा.


परिस्थितीचा आनंदाने स्वीकार :
मानसिकतेमधील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वीकार. जी परिस्थिती आपल्याला प्राप्त झाली आहे ती नकारात्मक असेल तर तिच्यात बदल हा करायचाच असतो, पण तो बदल करण्यापूर्वी त्या मूळ परिस्थितीचा स्वीकार करून मग त्यात सावकाशपणे व विचारपूर्वक बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे. एखाद्या माणसाच्या नशिबात जर अठराविश्वे दारिद्र्य आहे व त्याला ती परिस्थिती बदलायची असेल तर सर्वप्रथम त्याने कष्ट करून, उत्पन्नाचे अनेक मार्ग विचारात घेऊन प्रयत्न करायला हवेत. तो जर परिस्थिती बदलण्यासाठी अविचाराने दरोडे-चो-या करू लागला तर ते किती अयोग्य होईल. त्याच बरोबरीने हताश होऊनही बसणे गैर आहे. अनेक स्त्रिया त्यांच्या वर्तमानकालीन परिस्थितीवर प्रचंड चिडलेल्या आणि वैतागलेल्या असतात, ते सर्वथा अयोग्य आहे. खरोखरच परिस्थितीत बदल घडवून आणण्याची तुमची क्षमता असेल तर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यात बदल होण्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न करायचे आहेत किंवा मग आहे त्या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करायला हवा. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, नव-याचे स्वभावदोष, सासरच्या मंडळींच्या समस्या, मुलांचे प्रश्न या सर्वांवर तर्कशुद्ध उपाययोजना असतात. मात्र त्या उपाययोजना अमलात आणण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही डोके शांत ठेवणे अतिशय गरजेचे असते. एखाद्या स्त्रीच्या घरात कौटुंबिक समस्या असतील तर तिने नुसती चिडचिड करून, संताप करून परिस्थितीत बदल होणार नसतो तर त्यासाठी तुम्ही कौटुंबिक सदस्यांशी विचारविनिमय करणे, इतर नातेवाइकांचा सल्ला घेणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

अनेक स्त्रिया एकतर प्रचंड संतापतात, चिडतात, काही स्त्रिया तर रागाच्या भरात स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करून घेतात. काही केवळ देव-देव आणि व्रतवैकल्ये करून परिस्थितीत बदल होईल अशी आशा ठेवतात आणि नंतर हताश होतात. देवावर विश्वास ठेवून व्रतवैकल्ये अवश्य करावीत, पण त्यासोबत तर्कशुद्ध व्यावहारिक प्रयत्नही तितकेच गरजेचे आहेत. देव प्रयत्नवादी माणसाच्याच पाठीशी उभा राहतो. आर्थिक परिस्थितीमुळे हताश होऊन वैतागणा-या स्त्रिया बघितल्या की मन खरंच विषण्ण होतं. घरची आर्थिक परिस्थिती वाईट असूनही आनंदाने दिवस घालवणारी आपली आधीची पिढी बघितली की त्यांचा अभिमान वाटतो. आजकाल तर हजारो रुपये महिना उत्पन्न असलेल्या घरातही आर्थिक ओढाताणीवरून वाद सुरू असतात. या समस्यांचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात येईल की तुमची आर्थिक नियोजनाची बाजू कमकुवत होत आहे. प्रचंड अवास्तव खर्च, कर्ज काढून इतरांपेक्षा श्रीमंत आहोत हे दाखवण्याचा अट्टहास, बचतशून्य बजेट अशा गोष्टींमुळे आर्थिक समस्याच निर्माण होतात. प्रत्येक स्त्रीकडे उत्तम नियोजनकौशल्य बरेचदा नैसर्गिकरीत्याच असते. त्याचा वापर करून घरची आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या आधीच्या पिढीतील अनेकांची आर्थिक परिस्थिती खरंच वाईट होती. पण म्हणून तुमची आजी, आई कधी खचून गेल्या नाहीत. वैतागल्या नाहीत. त्या जशा आनंदाने परिस्थितीचा स्वीकार करून राहत होत्या, तशा आनंदाची गुरुकिल्ली तुमच्यातही दडलेली आहे. तिचा शोध घ्या...

(क्रमश:)