आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिलं घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व खेळ मांडून त्याच्याशी तासन्तास खेळण्यात कोजागिरी रममाण व्हायची. सर्व खेळ तिच्यासाठी सजीव असायचे. ती त्यांच्याशी कित्येक वेळा बोलत बसायची. बाईची तंद्री लागलीय म्हणून ब-याच वेळा शांता फक्त कानोसा घ्यायची; पण व्यत्यय आणायची नाही. व्यत्यय न आणण्याच्या या भानगडीत एकदा बराच वेळ आपण कानोसा घ्यायचे विसरलोय याचे भान शांताला राहिले नाही. पाहते तर कोजागिरी दोन्ही पाय पसरून खाली वाकून काही तरी करत होती. दुस-या सेकंदाला झालेला प्रकार लक्षात आला. कोजागिरी गोंधळली होती. आपण काही तरी चुकीचे केले हे तिच्या लक्षात आले होते. तिचे वय असे अर्धवट होते. शांताला तिच्या डोळ्यातून सर्व काही समजत होते. शांताने प्रेमाने तिला जवळ घेतले होते.


या घटनेनंतर काही दिवसांनी कोजागिरीने विचारले होते. ‘आई, आपल्याला शू कुठून होते हे मला दिसत का नाही, सांग न?’ या प्रश्नाला कसे उत्तर द्यावे याची जुळवाजुळव करायला थोडा वेळ लागला. ‘हे बघ कोजा, आपल्याला ऐकू येते, कान आपण पाहू शकतो का? फक्त आरशात पाहू शकतो. तसेच तू माझे कान आणि मी तुझे कान पाहू शकते. तसे या भागाचे होत नाही. शिवाय आपल्याला सर्वच गोष्टी दिसतात असे नाही. बघायचा प्रयत्न केला तर दुखापत होते. आपल्या डोळ्यातून पाणी येते. नेमकं कुठून येतं हे कुठे दिसतं. हे सर्व कळण्यासाठी शरीरशास्त्र शिकाव लागतं. आता मी तुला सर्व भागांची मला जमतील तशी चित्रं काढून दाखवते.’ असे म्हणून शांताने शरीराच्या विविध भागांची चित्रं काढून दाखवली. त्यासाठी तिच्याकडील एका पुस्तकाची मदत घेतली. कोजागिरीचे प्रश्न संपत नव्हते. प्रश्नांमधून नवे, गहन प्रश्न निर्माण होत होते. शांताला मजा वाटत होती. ‘आईच्या पोटात एक छानशी गादी असलेली पिशवी असते. त्यात बाळ तयार होते. ब-याच गोष्टी शिकल्यावर मग ते या वाटेतून बाहेर येते. पोटात ते छान वाढते.’ गोष्ट पुढे चालू राहिली. ‘मीही तुझ्या पोटात अशीच हातपाय जवळ घेऊन झोपले होते का?’ पुस्तकातील चित्रावर बोट ठेवून कोजागिरी विचारत होती. कोजागिरीला परीकथेच्या जगात गेल्यासारखे वाटत होते.


‘आई, तू माझी गोष्ट नीट सांग नं, मला खूप आवडते ऐकायला,’ असे वेगवेगळ्या वेळी कोजागिरी म्हणायची. बाळाचे आईच्या पोटातले घर कसे छान उबदार, मऊ मऊ असते. ते बाळाचे पहिले घर असते. खूप अंधार असला तरी भीती वाटत नाही. कारण आईच्या पोटात असते बाळ. शांताला अशा पद्धतीने कोजागिरीला परीकथेच्या जगात न्यावे लागायचे. एकदा कोजागिरीने कमाल केली. ‘आई, मला आता तुझ्या पोटात पुन्हा जायचे आहे. मला पाहायचे आहे, माझे तुझ्या पोटातले पहिले घर. किती मजा येईल ना?’ ‘वेडाबाई, असे केव्हाही आईच्या पोटात शिरता येत नाही. त्यासाठी तुला शरीरशास्त्र शिकावं लागेल,’ असे म्हणत असताना शांताला कोजागिरी खरोखर तिच्या पोटात शिरतेय असे वाटत होते. एवढीशी चिमुरडी असे पोटात शिरून स्वत:च्या जन्माचे रहस्य समजावून घेत होती.


लहानपणची परीकथेत रमणारी कोजागिरी मोठी झाली. शिक्षणासाठी परगावी गेली. पण ते कुतूहल कायम राहिलं होतं. त्या काळात, खूप वर्षांनी कोजागिरीने शांताला बजावले होते, ‘आई, तुझे हिस्टेरेक्टोमीचे ऑपरेशन माझ्या मोठ्या सुटीत करायचे. ऑपरेशनच्या वेळी मी हवीच.’ बहुधा आपली काळजी वाटत असणार असे वाटून शांता म्हणाली, ‘अगं, एवढे घाबरायचे कारण नाही. हल्ली सर्व सोयी आहेत. माझे दवाखान्यात राहण्याचे दहा दिवस मी आधीच संपवून घेते. म्हणजे तू सुटीला घरी आलेल्या वेळी मी घरी असलेली बरी. घरी तू मला सर्व मदत कर.’ त्यावर कोजागिरी म्हणाली, ‘मी घाबरत नाही गं. मदत तर मी तुला करीनच; पण मला माझं पहिलं घर पाहायचंय!’