आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फर्स्ट लेडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘यहां फोटो खींचना मना है’ असे लिहिलेल्या फलकाशेजारी पंडित जवाहरलाल नेहरू उभे आहेत, असे एक दुर्मिळ छायाचित्र पाहायला मिळते. साक्षात भारताच्या (पहिल्या) पंतप्रधानांच्या देखत नियम मोडून त्यांचेच छायाचित्र काढणारी, ही जिगरबाज छायाचित्रकार म्हणजेच भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट होमाय व्यारावाला! स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात एकमेव स्त्री छायाचित्रकार म्हणून होमायबद्दल गांधी, नेहरू घराण्याला आदर होता. तसेच त्या एकमेव फोटोजर्नलिस्ट होत्या, ज्यांना राजकीय नेत्यांच्या विश्वात मुक्त वावर होता. ‘पंडित नेहरू फारच फोटोजेनिक होते.’ असे सांगणा-या होमाय यांच्या संग्रहातील बहुसंख्य छायाचित्रे नेहरूंची आहेत, हे ओघाने आलेच. त्यामुळेच व्यारावाला यांनी लहान मुलांसोबत रमलेले चाचा नेहरू, बागेत फेरफटका मारत सैलावलेले नेहरू, भारतभेटीवर आलेल्या जॅकी केनेडीचे स्वागत करणारे प्रसन्न चेह-याचे नेहरू, खळखळून हसणारे तसेच दु:खी झालेले पंडित नेहरू अशा अनेक छटा छायाचित्रात बंदिस्त केल्या. इतकेच काय, विमान प्रवासात शेजारी बसलेल्या त्या वेळच्या उपउच्चायुक्तांच्या पत्नी मिसेस सिमन यांची सिगारेट पेटवून देतानाचे पंडितजींचे छायाचित्रही होमाय व्यारावाला यांनी टिपले.


होमाय व्यारावाला केवळ अनेक महत्त्वपूर्ण घटनांच्या साक्षीच राहिल्या नाहीत, तर त्यांच्या कॅमे-याने त्या कृष्णधवल छायाचित्रांतील रंगीत आठवणींना जतन करून ठेवले. ब्रिटिश राजवटीचा अस्त आणि लॉर्ड माउंटबॅटन यांचे जाणे, स्वतंत्र देशाचे पहिले झेंडावंदन, लाखोंच्या संख्येने आनंद साजरा करणारा रस्त्यावर उतरलेला स्वतंत्र नागरिक, महात्मा गांधी यांची अंत्ययात्रा, लालबहादूर शास्त्रींचे अंत्यदर्शन, इंदिरा गांधी यांचे पंतप्रधान होणे, वर्तमानपत्रांना उपयोगात येणारी छायाचित्रे आजही इंटरनेट, अनेक दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनात पाहायला मिळतात, ते केवळ होमाय व्यारावाला यांच्यामुळेच!


1913 ते 2012 असे 98 वर्षांचे आयुष्य जगलेल्या व्यारावाला यांनी स्वातंत्र्यापूर्वीचा आणि नंतरचा असा भारतील तब्बल 40 वर्षांचा काळ कृष्णधवल छायाचित्रांच्या चौकटीत कायमचा बंदिस्त करून ठेवलाय. एरवी पंडित नेहरू, महात्मा गांधी यांचे चार-पाच फुटांवरूनही छायाचित्र टिपण्याची व्यारावाला यांना मुभा असायची. मात्र, इंदिरा गांधींच्या कारकीर्दीपासून छायाचित्रकारांनी 12-15 फुटांवरून छायाचित्र घेण्याची अट घालण्यात आली, त्यानंतर फोटोजर्नलिस्ट असणे हे राजकारण्यांना धोकादायक वाटत असल्याच्या भावनेने होमाय व्यारावाला यांनी फोटोग्राफी करणे सोडून दिल्याचे, त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.


ज्या काळात मुलींचे विश्व उंबरठ्यापर्यंतच मर्यादित होते, त्या काळात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकत पहिली महिला फोटोजर्नलिस्ट होण्याची हिंमत दाखवलेल्या होमाय व्यारावाला यांनी त्याच हिमतीने फोटोग्राफी न करण्याचा निर्णय घेतला. उमेदीच्या काळात राजघराण्यांच्या घडामोडी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात घालवलेल्या होमाय वृद्धापकाळी मात्र एकट्याच राहत होत्या. व्यारावाला यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा एकत्र संग्रह असलेले ‘कॅमेरा क्रॉनिकल्स’ हे पुस्तक आणि भारत सरकारतर्फे सन्मानाने दिला जाणारा पद्मविभूषण, तसेच जीवनगौरव हे मानसन्मान व्यारावाला यांना वृद्धापकाळातच लाभले. बदलत्या काळानुरूप मोठा फ्लॅश असलेला होमाय व्यारावाला यांचा ‘रोलेफ्लिक्स’ कॅमेरा जाऊन डिजिटल कॅमेरा आला. आता होमाय व्यारावालाही काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या आहेत. केवळ काही मानसन्मान देण्यापुरतीच भारत सरकारने त्यांची आठवण ठेवली. ‘लोक गांधीजींना विसरले, मी अशी कोण मोठी लागून गेले आहे?’ असे होमाय व्यारावाला यांचे शब्द खरे ठरले आहेत...