आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला क्रियापद कोश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंग्रजी भाषेचे अभ्यासक दिलीप खांडेकर यांनी संकलित व संपादित केलेले खांडेकर्स न्यू एज व्हर्ब डिक्शनरी हे नुसतेच क्रियापद शब्दकोश पुस्तक नसून एक विद्यार्थी वा समाजहितैषी प्रकल्प आहे. क्रियापदे हा इंग्लिश भाषेचा शक्तिरूप गाभा आहे आणि क्रियापदांच्या अभ्यासाने आपण इंग्लिशची शक्ती ग्रहण करतो. व त्यानंतरच इंग्लिशचा वापर अधिक जोरकसपणे व आत्मविश्वासाने करू लागतो. क्रियापदांनी सुरवात करून विशेषणे, क्रियाविशेषणे, नामे आदींचा अभ्यास रंगतदार होतो हे लक्षात घेऊन हा मराठी भाषिक विद्यार्थी व इंग्रजीच्या जाणकारांसाठी अत्यंत उपयुक्त असा क्रियापद संग्रह काढण्यात आला आहे. यात क्रियापदांचा अर्थ व त्याचा वापर यावर मुख्यत्वे भर दिला आहे. मराठी भाषकांमध्ये इंग्रजीची आवड निर्माण करण्यासाठी हा क्रियापद संग्रह अत्यंत उपयुक्त असून हा एक वेगळा प्रयोग आहे. यामुळे इंग्रजी शिकणे सुलभ होईल व तमाम इंग्रजी शिकणा-यांना याच लाभ होईल.

खांडेकर यांनी दहा वर्षांपूवी इंग्रजी-मराठी क्रियापद कोश (व्हर्ब डिक्शनरी) या नावाने अत्यंत प्राथमिक स्वरूपात कोशाची निर्मिती केली. त्या कोशाच्या विक्रीच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षांत आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने वाचकांच्या आलेल्या सूचना विचारात घेऊन श्री. खांडेकर यांनी आता खांडेकर्स न्यू एज व्हर्ब डिक्शनरी : इंग्लिश-मराठी- इंग्लिश हा कोश संकलन व संपादन करून स्वत: प्रकाशित केला आहे. या कोशात त्यांनी इंग्लिश क्रियापदांच्या विविध अर्थछटा, केवळ अव्ययांच्या प्रयोगाने होणारे अर्थातील बदल सोप्या इंग्लिश व मराठीमध्ये स्पष्ट केले आहेत. उदा. to read - वाचणे, वाचून दाखवणे, to stand- उभे राहणे, उभे करून ठेवणे, उभे असणे, आदी.कोशाची मांडणी अतिशय सुटसुटीत असून मूळ आणि पदबंध क्रियापदे मिळून सुमारे दहा हजार क्रियापदांचा हा संग्रह आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रांत व्यावसायिक यश हे संवाद कौशल्यावर अवलंबून असते. त्यामुळे इंग्लिशवर प्रभुत्व असणे गरजेचे झालेय. त्यामुळे या कोशात संगणक, अभियांत्रिकी, वैद्यक, कायदा व सुव्यवस्था अशा विविध क्षेत्रांत वापरल्या जाणा-या महत्त्वाच्या क्रियापदांचा समावेश केला आहे. एकाच शब्दाला अनेक समानार्थी शब्द, प्रत्येक शब्द वेगळा असला तरी तो कसा वापरायचा याची उदाहरणासह माहिती, वाक्यामध्ये विविध शब्दांचा उपयोग कसा करायचा याचे ज्ञान होते, इंग्रजीबरोबरच पर्यायी मराठी शब्दसाठाही वाढतो, प्रत्येक शब्दाला समर्पक शब्द कसा वापरायचा याचेही ज्ञान यातून सहज मिळते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हसतखेळत वाचन केले तरी माहिती मिळते, कंटाळवाणे वाटत नाही आदी अनेक वैशिष्ट्यांसह शब्दसाठा व शब्दसामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने हा कोश उपयुक्त आहे.

संकलक - संपादक- प्रकाशक : दिलीप खांडेकर,
पृष्ठसंख्या : 748, मूल्य : 250 रुपये.