आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाळीबद्दल मुलांना सांगाव्यात अशा पाच गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींना ज्याप्रमाणे पाळी येण्यापूर्वीपासून त्यासंबंधी माहिती देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आईने मुलग्यालाही आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असलेल्या पाळीची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी मुलगा कुमारवयात येईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. आज मुलांच्या हाती वयाच्या दुस-या वर्षापासूनच आपण माहितीचा मोठा स्रोत सोपवत असतो, तेव्हा अशी माहिती गैर मार्गाने गोळा करायला त्यांना फार काळ लागणार नाही, हे ध्यानात घ्यावे.
— शास्त्रशुद्ध माहिती : दोन वर्षांनंतरच मुलांना आईने आपले उदाहरण देऊन मुलींना मासिक पाळीबद्दल पुसटशी कल्पना द्यावी. कुमारवयात मुलांच्या शरीरात ज्याप्रमाणे बदल होतात, त्याचप्रमाणे मुलींच्याही शरीरात काय काय बदल होतात, याची शास्त्रशुद्ध माहिती, मुलगा जसजसा मोठा होत जाईल, तसतशी त्याच्या आकलनक्षमतेनुसार दिली जावी. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होऊ शकते.
— घाssण नव्हे, नैसर्गिक देणगी : मुलींना होणा-या रक्तस्रावाबद्दल कळल्यानंतर मुलांना याबद्दल घृणा वाटू शकते. हे साहजिक आहे. मात्र मुलींचे शरीर निरामय राखण्यासाठी निसर्गाने प्रदान केलेले हे सुंदर रहस्य आहे, हे मुलांना पटवून द्यावे. यात कोणत्याही प्रकारची घाण अथवा पाप नाही, हेसुद्धा समजावून सांगावे.
— शाईसाठी पॅड नव्हेत : ब-याच वेळा टीव्हीवरील सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती वाचून मुले पॅडवर शाई का सांडतात असे प्रश्न विचारतात. पण अशा वेळी ‘ती शाई नसून मोठ्या मुलींसाठी वापरात येणारी एक गोष्ट आहे, मी तुला काही दिवसांनी नक्की सांगेन,’ असे उत्तर द्यावे. योग्य वेळी आणि मुलांनी इतर ठिकाणहून माहिती मिळवण्यापूर्वी त्याला याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.
— मूडही चेंज होतो : पाळीच्या दिवसात आईची होणारी चिडचिड, किंवा घटक्यात बदलणारा मूड आणि वेदनांविषयी मुलांना पूर्ण कल्पना असू द्या. त्यामुळे आई, बहीण, मैत्रीण, मोठं झाल्यावर पत्नी आणि लेकीच्या आयुष्यातील हे नाजूक क्षण कसे हाताळायचे याची जाणीव तो ठेवू शकेल.
—... आणि वेदना : मूड बदलानुसार, पाळीच्या दिवसात काही मुलींना होणा-या त्रासाची जाणीवही मुलांना करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे काल संध्याकाळपर्यंत चांगली असलेली आपली आई, बहीण किंवा मैत्रीण अशी एकाएकी आजारी कशी पडली, असे प्रश्न त्याच्या मनात निर्माण होणार नाहीत.