आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिज़ा : सांप्रदायिक सेक्युलर व्यवस्थेचा जिवंत बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खालिद मोहम्मद दिग्दर्शित 'फिज़ा' या 2000 सालच्या चित्रपटाचे नाव अन्वर्थक आहे. फिज़ा हे यातल्या नायिकेचे नाव आहे आणि फिज़ा या शब्दाचा अर्थ आहे वातावरण. नव्वदच्या दशकात देशात नव्याने पसरलेले सांप्रदायिक दंग्यांचे, परस्पर अविश्वासाचे वातावरण, मुर्दाड राजकारण्यांना आपले डावपेच लढवून नवा स्वार्थ साधायला मिळालेल्या नव्या सांप्रदायिक संधी आणि त्यापायी सामान्य निरपराध माणसांची, होतकरू तरुणांची, कुटुंबांची होणारी ससेहोलपट आणि शोकांतिका या सर्व वातावरणाचे व्यक्तीरूप म्हणजे फिज़ा ही भारतीय मुस्लिम तरुणी.

फिज़ा (करिश्मा कपूर), तिची विधवा आई निशातबी (जया बच्चन) आणि धाकटा भाऊ अमान (हृतिक रोशन) या तिघांचे निम्न मध्यमवर्गीय, पण मानाने जगणारे मुस्लिम कुटुंब. विधवा निशातबीने पतीच्या पश्चात उर्दू शाळेत शिकवून मुलांना वाढवले आहे. ही माणसे पापभीरू आहेत, देवभोळी आहेत, पण धर्मांध वगैरे नाहीत. माणुसकी, माणसांचा परस्परांवरचा विश्वास हीच मूल्ये या दोन्ही मुलांना अम्मीकडून आणि दिवंगत अब्बांकडून मिळाली आहेत. पण एका रात्री शहरातला सांप्रदायिक दंग्याचा आगडोंब त्यांच्या निरागस, समाधानी जीवनाला चूड लावतो.

चित्रपटात प्रत्यक्ष उल्लेख नाही, परंतु चित्रपटाचा निर्मितीकाळ, कथेतला काळ, कथा घडते ते शहर या सर्व गोष्टींत ब्याण्णव साली बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशभर आणि मुंबईत झालेल्या सांप्रदायिक दंग्याचाच संदर्भ आहे. दंगेखोरांनी कुरापत काढून कुणा मित्राला मारहाण करण्यात आली म्हणून अजून मिसरूडही न फुटलेला अमान त्याला वाचवायला घराबाहेर पडतो आणि सांप्रदायिक दंग्यात सापडतो. 'पाकिस्तानात का जात नाही' अशी अपमानकारक संभावनाही या निरागस पोराची केली जाते, मित्राला वाचवताना तोही जखमी होतो, त्याचेही तरुण रक्त उसळते...! अमान परतून घरी येत नाही.

अमानला रस्त्यातून पळताना अम्मीनं आणि फिज़ानं पाहिलं, त्यांनी आकांत करीत त्याला हाका मारल्या, पण तो गेला तो गेलाच. अमानचं काय झालं? तो मारला गेला की पळाला? तो जिवंत आहे की मेला? सहा वर्षं काहीच कळलेलं नाही. दरम्यान फिज़ा बी. ए. होते. नोकरी करायची आणि अम्मीचं ओझं कमी करायचं, अशी या जबाबदार मुलीची माफक आकांक्षा. परंतु तिच्या या वर्तमानाला भावाच्या दंग्यात बेपत्ता होण्याच्या घटनेचं अस्तर आहे. अम्मी विधवा, मध्यमवयीन. अशा आईची सगळी भिस्त असते ती तरुण मुलावर. त्याचा मृत्यूच झाला असेल तर ती सगळी आशा सोडून निराशेत निपचित जगत राहते. पण तो बेपत्ता असेल तर ती ह्यअसेल-नसेलह्णची अनिश्चितता, वांझ आशा तिचा छळ करत राहते. अगदी जेवायला अमुक भाजी करू का, म्हणताच अम्मीला अमानला ती भाजी किती आवडायची, हेच आठवतं.

फिज़ा तरुण आहे. तिला तिचाही वर्तमानकाळ जगायचा आहे, तिला भविष्य घडवायचंय. भूतकाळ उराशी बाळगून राहण्याची ना तिच्या तरुण मनाची प्रवृत्ती असते ना तिला तशी इच्छा. कधी कधी त्यामुळेच तिची चिडचिडही होते. तरीही ती सोशिक मुलगी एकीकडे जगण्याच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी तयारी करत असतानाच अम्मीच्या भावना जपत राहते.

परिस्थितीनं फिज़ाला सावध, व्यवहारी बनवलं आहे. बी. ए. होताच ती नोकरीच्या शोधात फिरू लागली आहे. अम्मीनं दर्ग्यात दहा-दहाच्या नोटा खैरात म्हणून वाटाव्या हे तिला पटत नाही. अम्मीला मात्र मुलगा परत येईल ही आशा लाखमोलाची वाटते. अम्मी जेव्हा तेव्हा अब्बांच्या आठवणी काढते. फिज़ा वैतागून म्हणते, ह्यनहीं सुनना मुझे अब्बा क्या कहा करते थे। खुद मरे और हमें यहाँ मरने के लिए छोड़ दिया।ह्ण या सावध, व्यवहारी मुलीनं आपल्यावर प्रेम करणार्‍या मुलाकडेही जाणूनबुजून दुर्लक्ष केलेलं आहे. तो मुलगा हिंदू आहे, हेही एक कारण आहेच आणि फिज़ाला आपल्या आधीच अस्वस्थ असलेल्या आयुष्याच्या वाटेवर आणखी काटे पसरून ठेवायचे नाहीत. गंमत म्हणजे, अम्मीला फारच सेक्युलर (जणू सेक्युलर म्हणजे निष्पापपणाचं प्रमाणपत्र) दाखवायच्या नादात तिच्याकडून या मुलासाठी सहजपणे, इतकंच नव्हे तर प्रोत्साहनपर पसंती देवविली आहे. अम्मीची व्यक्तिरेखा या नादात जिथे वास्तवापासून फारकत घेते, तिथे फिज़ाची व्यक्तिरेखा वास्तवाच्या जमिनीवर ठाम पाय रोवून उभी दिसते.

अशा फिज़ाला एक दिवस मुंबईतच अमान रस्ता क्रॉस करून रिक्शात बसून जाताना दिसतो आणि तिचं आयुष्य वेगळंच वळण घेतं. अम्मीला आणि तिलाही छळणारा सस्पेन्स तिला दूर करायचा आहे, सतत प्रतीक्षा करत रोज एक मरण मरण्याचा सिलसिला तिला थांबवायचा आहे.

नोकरीच्या शोधाची जागा आता अमानच्या शोधानं घेतलेली असते. ती पोलिसांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करते, वृत्तपत्राच्या संपादकाकडे जाते, तिचा लेख प्रसिद्ध होतो आणि सहा वर्षांपूर्वीची घटना पुन्हा चर्चेत येते. 'जे झालं ते का झालं?'- असा तिचा प्रश्न असतो. इलेक्ट्रॉनिक मीडियाला फिज़ामध्ये नवा टीआरपी दिसतो. तर सिंह आणि सय्यद शेखसारख्या सांप्रदायिक पक्षांच्या नेत्यांना ती अडचणीची वाटू लागते. 'भाऊ परत यायला हवाय तो घर चालवण्यासाठी का?' असा अपमानकारक प्रश्न सिंह हा हिंदुत्ववादी नेता तिला विचारतो. 'आप लोगों ने उधर जाकर अपना एक देश बना लिया', असाही टोमणा मारतो आणि आपल्या पक्षात येण्याबद्दलही सुचवतो. ही नव्यानं प्रसिद्धीस आलेली दंगलग्रस्त मुस्लिम मुलगी त्याच्या पक्षात आल्यानं पक्षाला सेक्युलर झालर लागून मुस्लिम मतं मिळण्याची आशा निर्माण होणार असते. त्याला ती- 'आप लोग' मत कहिए सिंहसाहब। हम उतने ही हिंदुस्तानी हैं जितने आप हैं, म्हणून सुनावते. तिकडे सय्यद शेख 'अमन'चा दांभिक मंत्र जपत तिला भावाला शोधायचा प्रयत्न करून 'कौमचं नुकसान करू नकोस', असा मानभावी सल्ला देऊ पाहतो. निवडणुकीत सिंहच्या हिंदुत्ववादी पक्षाशी गठबंधन करून आणि आपल्यामागे असलेल्या पंधरा लाख मुस्लिम मतदारांचा सौदा करून त्याला गृहमंत्रीपद लाटायचं असतं.

या सगळ्याच भ्रष्टाचार्‍यांशी, दांभिक शिरोमणींशी वाद घालताना फिज़ाचं व्यक्तिमत्त्व अधिकच उजळत जातं. ह्यसच तो यह है कि हरा रंग और भगवा रंग हिंदुस्तान के झंडे का हिस्सा है। उसे हिस्सा ही रहना चाहिए। पूरा झंडा बनने की कोशिश नहीं करनी चांहिए।ह्ण - ती शेखला ऐकवते.

अखेर सीमा भागात भटकत भटकत ती एकटीच अमानला शोधून काढते. कोवळ्या वयाचा, दंग्यातल्या अन्यायानं हादरलेला, जखमी झालेला आणि आपल्या हातून खून झाल्यामुळे अम्मी-आपाकडे न परतण्याचा निर्णय घेणारा अमान त्याला वाचवणार्‍या मुरादभाईच्या जिहादी गटात सामील झालेला असतो. अशा अमानला घरी परत घेऊन येण्याचं आणि अम्मीचा आनंद परत मिळवून देण्याचं अशक्य कोटीतलं काम फिज़ा पार पाडते. परंतु अमान आता फार काळ घरात टिकत नाही. त्याची घुसमट होत राहते. या व्यवस्थेत त्याला सामान्य व्यक्तीचं स्थान मिळत नाहीय, व्यवस्थेचा अन्याय त्याला दिसतो आहे, आपण अम्मी-आपावर ओझं बनून राहतो आहोत, त्या ते प्रेमानं वहन करताहेत, या गोष्टी त्याला अस्वस्थ करतात. अम्मी त्याच्या भूतकाळाविषयी अनभिज्ञ आहे. आपण एक खोटं आयुष्य जगतोय, असं त्याला वाटत राहतं. तो पुन्हा मुरादभाईला भेटतो. फिज़ाला त्रास देणार्‍या गुंडांशी दोन हात करताना अमान नुकतंच मुरादभाईनं दिलेलं पिस्तूल काढून त्यांना मारतो.

अमानचं हे रूप पाहून अम्मीला धक्का बसतो. आपण आपल्या मुलांसाठी काहीच करू शकलो नाही, या वैफल्यापोटी ती आत्महत्या करते आणि फिज़ा आणखी एका नव्या एकाकी पोकळीचा सामना करते. मुरादभाईनं नेमून दिलेल्या कामगिरीनुसार अमान ईदच्या प्रसंगी एकत्र येऊन राजकीय समीकरण मांडू पाहणार्‍या सिंह-सय्यद शेख या दोघांवर गोळ्या झाडतो. त्याला पकडायला येणार्‍या पोलिसांच्या आधी बहीण त्याला शोधते. आणि ह्यव्यवस्थेच्या हातून अपमानाचं मरण येण्याआधी मला तू गोळी घालह्ण म्हणून तो मोठ्या बहिणीजवळ हट्ट धरतो...

कधी काळी अम्मी फिजाची वेणी घालून देताना लाडानं म्हणाली होती, ह्यजिस घर में बेटियाँ पैदा होती हैं उन पर अल्लाह मेहरबान होते हैं।'इकरामुल्लाह कुटुंबावर अल्लाह मेहरबान झाला तो वेगळ्याच प्रकारे. या घरातल्या मुलीनं आपल्या कुटुंबावरच्या प्रेमात कसूर केली नाही की कर्तव्यात केली नाही, भ्रष्ट व्यवस्था वार करत होती तरी तिनं आपल्याला कुटुंबाकडून मिळालेलं चारित्र्य डागाळू दिलं नाही. अम्मीचा मान राखला, तसंच भावाची विटंबना होऊ नये म्हणून त्याच्या हत्येचं पाप स्वत:च्या माथी घेतलं. आणि आता स्वत: न केलेल्या गुन्ह्याच्या, न केलेल्या देशद्रोहाच्या कोणकोणत्या तप्तमुद्रा कपाळी मारून घेणार आहे ती, ते भविष्यच जाणे. पण 'बेटियाँ खिदमत करती हैं, इसलिए ऐसा कहते हैं' हे अम्मीचं पुढचं वाक्यही तिनं खरं करून दाखवलं.

गेली सहा वर्षं ज्या समाजापासून अमान दूर राहिला, त्या समाजातच राहून फिज़ा तिथल्या मानसिक हिंसाचाराला शौर्यानं आणि धैर्यानं तोंड देत आली आणि तरीही हा हिंसाचार, हा वेडाचार तिची स्वत:च्या मूल्यांवरची निष्ठा विस्कटू देऊ शकला नाही. तिचं वास्तवाचं भानही सुटलं नाही, पण त्या वास्तवाला शरण जाऊन तिनं मूल्यांशी तडजोडही केली नाही. ना तिनं राजकारणाचा तिला सहज मिळू पाहणारा आसरा घेऊन आपलं जगणं सुसह्य केलं, ना तिनं अमानप्रमाणे हिंसेचा पुरस्कार केला. अम्मीला वास्तवाचं भान देताना, तिच्या भावना जपताना, समाजातल्या ढुढ्ढाचार्यांना सुनावताना तिनं मागे-पुढे पाहिलं नाही. स्वार्थ पाहिला नाही. अपघातानंच हिंसेच्या मार्गाला लागलेल्या आणि ज्याच्यावर जबरदस्तीनंच धर्माचं लेबल लागलं आहे, अशा भावाला समजावताना, त्याची तगमग बघतानाही तिचा मूल्यविचार कधी ढळला नाही. पण अशा या तरुण भारतीय मुस्लिम मुलीचा अंत...? तो दिग्दर्शकानं अध्याहृत ठेवलाय. पण तरी तो अटळ आहे...! व्यवस्थेला अशी माणसं सहन करता येत नाहीत. त्यांच्या माघारी ह्यअसं का झालं?'या प्रश्नाचं उत्तर ती कधी देत नाही, कुणाला देऊ देत नाही आणि तशा त्या होण्याचा 'सांप्रदायिक सेक्युलर' राजकारणासाठी उपयोग मात्र त्या व्यवस्थेला करायचा असतो. इशरतजहाँचा होतोय तसा?...